आत्मविश्वासाचा अभाव
मराठवाड्यात खताचा वापर 18 किलो प्रति हेक्टर्स आहे. यात देखील ऊस, कापूस अशी नगदी पिके आणि गहू व उन्हाळी भुईमूग वगळल्यास हे प्रमाण नगण्य ठरेल. त्यामागे मराठवाड्यातील अत्यल्प आणि अल्पभूधारकांची आर्थिक स्थिती आणि अनिश्चित पाऊसमान हेही कारण आहे.
मराठवाड्यातील शेतीचे जवळजवळ 90 टक्के कोरडवाहू प्रमाण लक्षात घेता आर्थिक शाश्वतीसाठी पूरक उद्योग स्थापनेसाठी सुविधा आवश्यक आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, मधुमक्षिका पालन, रेशीम कीड संगोपनासारख्या असंख्य क्षेत्रात शेतकर्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे.
विज्ञानाभिमुख शेतीचे सूत्र गवसेना आज शेती विज्ञानाभिमुख उद्योग व्यवसाय झाला आहे.
मराठवाड्यात हा बदल कळला असला तरी त्या दिशेने अजूनही येथील शेतकरी वळलेला नाही हे मागासपणाचे लक्षण आहे. कृषी शिक्षणात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कृषी विभागातील शासकीय, तसेच निमशासकीय सेवांमध्ये मराठवाड्यातील लोकांचे अत्यल्प प्रमाण आहे. परिणामस्वरुप सर्व स्तरावर प्रतिनिधित्व अल्पसंख्य असल्यामुळे या विभागावर कायमस्वरुपी अन्याय होतो
शेती उत्पादन वाढल्यास उत्पादक शेतकर्यांच्या नफ्यात वृद्धी होतेच असे नाही. किंबहुना बहुतांशी हे प्रमाण व्यस्त असते याची प्रमुख कारणे म्हणजे, शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती, वाहतुकीचा अभाव आणि मुख्य बाजारपेठेपासून बरेच अंतर असल्यामुळे अडलेला शेतकरी पडेल त्या भावाने माल चिल्लर व्यापारी, दलाल किंवा आडत्यास विकतो. कापूस, तेलबियांसारख्या कच्च्या मालांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सोयी व भांडवल उपलब्ध नसल्यामुळे मध्यस्थ श्रीमंत झाले आणि गरीब शेतकरी अधिक गरीब झाला.
उत्पादनाचे दर एकरी मूल्य मराठवाड्यात सर्वात कमी
नांदेड, परभणी जिल्ह्यात केळी व औरंगाबाद, बीड, उस्मानाबादेत मोसंबी, आंब्यासारखी फळे घेण्याची क्षमता राज्यातील अन्य जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. शेतकरी वाहतूक सुविधेअभावी माल बागवानास विकतो. बागवान स्वतःचा एक पैसा किंवा परिश्रम न करता केवळ माल ट्रकमध्ये चढवणे आणि मुंबईसारख्या बाजारात उतरवण्यासाठी 50 टक्केपेक्षा अधिक नफा मिळवतो. थोड्याफार फरकाने हाच प्रकार अन्य शेती संलग्न क्षेत्रातही आहे.
सुविधा, सवलतींच्या अभावी राज्यातील एकूण शेती उत्पादनाचे दर एकरी मूल्य मराठवाड्यात सर्वात कमी मिळत आहे. याची मुख्य कारणे अत्यल्प सिंचन सुविधा, रस्ते व विजेचा अभाव ही आहेत.