1) पनामा किंवा मर रोग: या रोगामुळे पनामा केळीचा संपूर्णपणे नाश झाल्यामुळे त्याला मर (रोग पनामा) रोग म्हणतात. पुणे जिल्ह्यातील सोनकेळीवर हा रोग मोठ्या प्रमाणावर येऊन केळीच्या बागांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आम्लयुक्त जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. हा रोग जमिनीतील कवकांमुळे होतो. केळीच्या पिलांना तसेच मोठ्या खुंटांना हा रोग झाल्यामुळे ती मरतात. ग्रोमिशेल ही जात या रोगास जास्त बळी पडते.
रोगाची लक्षणे : प्रथम खुंटावरील साल पिवळी पडून सुकते. नंतर केळीची पाने डेरे पिवळी होऊन सुकतात. खुंटाभोवती पाने लोंबतात व नुसते खोड उभे राहते. मुख्य खोड सुकून त्याचा पानांपर्यंतचा भाग चिरलेला दिसतो. रोगट खुंट फळधारणेपूर्वीच मरतो. परंतु केळी निसवल्यानंतर हा रोग पडल्यास केळीची वाढ सारखी होत नसून ती अवेळी पिकतात. रोगट खुंटाच्या खालच्या गड्ड्यात काळ्या रेषा दिसतात. रोगकारक बुरशी मुळांवरील अन्नवाहिन्यांमध्ये वाढते. परिणामी, अन्नरसाचा वरचा मार्ग खुंटतो. अशा खुंटाच्या गड्ड्या लगतच्या पिलांच्या कांद्यातही रोगकारक कवक जाऊन तेथे रोगाचा उपद्रव होतो.
उपाय : ज्या जमिनीत हा रोग झाला असेल अशा जमिनीत केळी लागवड टाळावी. तसेच केळी लागवडीकरता रोगमुक्त अशा बेण्यांचा वापर करावा. या रोगास प्रतिकारक अशा बसराई, हरीसाल यासारख्या जातींची निवड करावी. रोगट बेणे मुळासकट काढून त्याचा नायनाट करावा. जमिनीला पाणी दिल्याने कवकाचा प्रादुर्भाव कमी होतो. सेरेसान 1 किलो व 1000 लिटर पाणी मिसळून तयार झालेले द्रावण प्रत्येक झाडास 5 लिटर याप्रमाणे दिल्यास रोगाचा प्रसार थांबतो. एक-दीड महिन्याने पुन्हा एकदा वरीलप्रमाणे सेरेसान द्यावे.
2) पर्णगुच्छ (बोकड्या): गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील वसई भागात या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झालेला असून शेकडो एकरांवरील केळीच्या बागा नाश पावल्या आहेत. हा रोग घातक बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : प्रथमच पानाच्या खालील बाजूवर, मुख्य शिरेवर, देठावर व बारीक शिरेवर अतिशय लहान, अनियमित लांबीचे, गडद हिरव्या रंगाचे लांबट चट्टे दिसतात. ही पाने लहान राहतात. या पानांच्या कडांमधील हरितद्रव्यांचा नाश झालेला आढळून येतो. त्याच्या कडा नागमोडी होऊन पिवळ्या पडतात. पाने ठिसूळ होऊन त्वरित सडतात व वाळतात. पानांचा देठ वाजवीपेक्षा जास्त लांबीचा राहतो. अशा प्रकारच्या पानांमुळे झाडाची वाढ खुंटते. या रोगाचे अखेरच्या अवस्थेतील लक्षण म्हणजे पानांची लांबी व रुंदीकडील बाजूने वाढ कमी होते. पाने तलवारीच्या पात्यासारखी दिसतात. ती ताठ व सरळ उभी राहतात. अशा पानांचा झुबका शेंड्यावर तयार झालेला दिसतो. म्हणूनच या रोगास बंची टॉप असे म्हणतात. यापैकी कोवळ्या पानांमधून सूर्यप्रकाशाकडे पाहिले असता पानांवर गर्द हिरव्या किंवा काळसर रंगाच्या तुटक रेषा स्पष्टपणे दिसतात. रोगट झाडातून सहसा घड बाहेर पडत नाही. पडल्यास केळी लहान आकाराची येतात.
उपाय : मुनवे व गड्डे रोगमुक्त प्रदेशातून आणावे. बोकड्या रोगाचा प्रतिकार करण्यास लहान पानांच्या खुर्या व रोगट झाडांच्या खोडात छिद्र पाडून कोणतेही तणनाशक 50 ग्रॅम 300 मि.ली. पाण्यात विरघळून हे द्रावण त्या छिद्रावाटे आत ओतावे, म्हणजे काही दिवसांनी हे झाड मरते. अशी मेलेली झाडे नंतर उपटून त्यांचा नाश करावा. गड्डे ऑरिओफगीनच्या द्रावणात (6 ग्रॅम 135 लि. पाण्यात) 90 मिनिटे बुडवल्यास व नंतर सात दिवस कडक उन्हात सुकवून लागवड केल्यास पीक या रोगापासून मुक्त राहते.
3) केळीचा पोंगासड रोग (हार्ट रॉट) : या रोगाचा प्रादुर्भाव जळगाव व परभणी जिल्ह्यात हिवाळा व उन्हाळा या दोन्ही ऋतूंत झाल्याचे आढळून आले आहे. झाडाचे मुख्य पान सडणे, पोंगा मर होणे आणि पानांवर पिवळे चट्टे दिसणे असे या रोगाचे बाह्यस्वरूप असते. गाभ्याचा भाग वरून खालपर्यंत कुजलेला आढळतो. कुजण्याची अथवा सडण्याची क्रिया वरच्या भागापासून सुरू होत असून ती गड्ड्यापर्यंत पोहोचून झाडांचा नाश करते. रोगट झाडे सडल्यानंतर त्यांचा उग्र वास येतो. सडण्याची क्रिया फक्त हिवाळ्यात दिसून येते. उन्हाळ्यात मात्र सडण्याची क्रिया आढळून येत नसून फक्त पानांवरच पिवळे चट्टे दिसतात. त्यामुळे उन्हाळ्यात रोगट झाडे चटकन लक्षात येत नाहीत. रोगट झाडापासून रोगट तशीच निरोगी पिलेही येऊ शकतात. या रोगाचा प्रसार निसर्गत: केळीच्या तणांमध्ये आढळून येणार्या मावा किडीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : या रोगाची लक्षणे पहिल्या प्रथम कोवळ्या पानांवर दिसून येतात. साधारणत: अर्धा इंच रुंदीचे पांढरट अथवा पिवळ्या रंगाचे पट्टे पानांवर आढळतात. हे पट्टे पानांच्या कडांपासून वाढत जातात. पानांच्या वाढीबरोबरच या पट्ट्यांचा रंग तांबूस होत जातो. पानांच्या कडा आतल्या बाजूने गुंडाळल्या जातात. सर्वसाधारणपणे झाडाच्या मधल्या कोवळ्या पानांवर ही लक्षणे स्पष्ट दिसतात.
उपाय : प्रथम रोगट झाडे कापून गोळा करून समूळ नष्ट करावी. या रोगाचा प्रादुर्भाव नसेल अशाच बागेतून बेणे आणावे. ज्या ठिकाणी केळीचा गाभासड ही ज्वलंत समस्या आहे. अशा ठिकाणी केळीत असणार्या मावा किडीचा कीटकनाशके फवारून समूळ नाश करावा. परिणामी, या रोगाच्या प्रसाराचा चांगलाच पायबंद बसतो. केळीबागेत काकडीवर्गीय, उदा. काकडी, भोपळा, इ. वगैरे वेलवर्गीय पिके घेऊ नयेत.
4) फळावरील काळी बोंडी रोग (सिगार अँड रॉट) : या रोगास इंग्रजीत जळका चिरूट असे म्हणतात. अगदी अलीकडे जळगाव जिल्ह्यातील केळीच्या कांदाबागेत या रोगाचा नव्यानेच प्रादुर्भाव सुरू झाला आहे. हा रोग फक्त घडांवरील केळांवरच आढळतो. केळीच्या घडामधील काही फळांची खालची टोके प्रथमच काळी पडतात व कुजू लागतात. ही कुजण्याची क्रिया हळूहळू वाढत जाऊन कुजलेला भाग वाळू लागतो. केळीच्या खालच्या टोकाकडून 35 सें.मी.पर्यंतच्या भागावर शुष्क कूज होते. कुजलेल्या भागावर आडव्या, गोलाकार रेषा वलयाप्रमाणे पडलेल्या आढळतात. त्यामुळे अर्धवट पेटलेल्या चिरुटाप्रमाणे केळे झालेले दिसते. या वाळलेल्या टोकावर रोगकारक कवकाच्या बिजाणूंमुळे करड्या रंगाच्या राखेसारखा थर आढळतो. रोगट फळांचा हिरवा भागही लवकरच लिबलिबीत होऊन कुटल्यामुळे आतील गर उघडा पडून तो गळतो. अशा स्थितीनंतर केळी काळी पडून वाळतात. अशा फळांना बाजारपेठेत काहीच किंमत येत नाही.
उपाय : केळीच्या घडांची तपासणी करून, रोगट फळे काढून त्यांचा नाश करावा. बागेत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. केळीच्या घडावर ताम्रयुक्त औषधांची फवारणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात उष्ण व दमट हवामान असताना करावी. 250 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 50 टक्के तीव्रतेचे अथवा डायथेन एम-45, 0.25 टक्के तीव्रतेचे द्रावण तयार करून फळांवर फवारावे. पहिली फवारणी बागेतील केळीचा निसवा 50 ते 60 टक्के झाल्यानंतर करावी. यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पुन्हा दोन फवारण्या द्याव्यात.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.