आंतरपीक पद्धती
आंतरपीक पद्धती किंवा मिश्र पीक पद्धतीची शेती म्हणजे काही नवीन तंत्रज्ञान नाही. आज शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन जर ठेवला तर आर्थिक नियोजन आणि नफा-तोटा या सर्व गोष्टी पर्यायाने बघाव्या लागतात. सर्वच शेतकरी बंधू, हल्ली शास्त्रीय पद्धतीने आंतरपीक/मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत आंतरपीक पद्धती आणि मिश्र पिकांचा उद्देश एकच आहे. परंतु, अवलंब करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत मिश्र पीक पद्धतीमध्ये पेरणीच्या वेळी मुख्य पिकाच्या बियाण्यात ठराविक प्रमाणात दुय्यम पिकाचे बियाणे मिसळवून ते ओळीत पेरले जाते, त्यामुळे एकाच ओळीत मुख्य पिकाची आणि दुय्यम पिकाची रोपे उगवतात आणि पुढे आपला जीवनक्रम पूर्ण करतात. शास्त्रीय पद्धतीने मुख्य पिकात दुय्यम पीक किंवा आंतरपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या ठराविक ओळींनंतर स्वतंत्ररित्या दुय्यम किंवा आंतरपिकाच्या ठराविक ओळी पेरतात. यालाच आंतरपीक पद्धती असे म्हणतात. शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून प्रयोगा अंती मुख्य पिकाच्या किती ओळींनंतर आंतरपिकाच्या किती ओळी पेराव्यात म्हणजे अधिक आर्थिक नफा मिळतो, याचे संशोधना अंती निष्कर्ष काढले जातात आणि अधिक आर्थिक नफा देणाऱ्या आंतरपीक पद्धतीची शिफारस केली जाते. अशा पद्धतीने पेरणी केलेल्या शेताचे जवळपास ७० ते ८० टक्के क्षेत्र मुख्य पिकाखाली तर २० ते ३० टक्के क्षेत्र आंतरपिकाखाली असते.
आंतरपीक पद्धतीनुसार करा तूर लागवड :
तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार जातींची निवड करावी. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. सुधारित अंतराने लागवड करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खताची मात्रा द्यावी.
विविध पिकांसोबतच्या आंतरपीक पद्धतीत तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी 165 ते 190 दिवस कालावधीत तयार होणाऱ्या आशा, बी.एस.एम.आर. 736, मोराती, बी.एस.एम.आर. 853, पीकेव्ही तारा, एकेरी 8811 आणि विपुला या वाणांची निवड करावी.
ऑक्टोबर आणि त्यापुढे पाऊस न आल्यास किंवा कमी आल्यास मध्यम आणि हलक्या जमिनीवर तुरीला फुलोऱ्यानंतर पाण्याचा ताण पडतो. त्याचा उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. अशा ठिकाणी 135 ते 150 दिवसांत तयार होणाऱ्या वाणांची लागवड करावी. साधारणपणे आपल्याकडे 125 ते 130 दिवसांत तयार होणारे आय.सी.पी.एल. 87 (प्रगती), टी.एटी.-10 आणि टी विशाखा-1 हे वाण विकसित करण्यात आले आहेत. ए. केटी. 8811 हा वाण पाऊसमानाप्रमाणे 145 ते 165 दिवसांत तयार होतो. कमी पाऊस झाल्यास याचे 135 ते 140 दिवसांत उत्पादन मिळते. असे वाण मध्यम ते हलक्या जमिनीत लागवडीसाठी वापरावेत.
खतांची कमतरता लक्षात घेता शेतात निंदणाचा, तसेच इतर काडीकचरा आणि पालापाचोळा जमिनीतच कुजवण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
तुरीला माती परीक्षणानुसार पेरणीपूर्वी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 40 कि. स्फुरद द्यावे. —–रायझेमीयम——– आणि पी.एस.बी. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यास नत्र, स्फुरदाची मात्रा 50 टक्के दिली तरी उत्पादनात फारसा फरक पडत नाही. असे प्रयोगात दिसून आले आहे. माती परीक्षणात गंधक आणि जस्ताची कमतरता आढळल्यास नत्र आणि स्फुरदयुक्त खतासोबत हेक्टरी 20 किलो गंधक आणि दोन ते पाच किलो झिंक सल्फेट द्यावे. नत्राची मात्रा अमोनिअम सल्फेटद्वारा आणि स्फुरद खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे दिल्यास गंधकाची मात्रा या दोन्ही खतांद्वारे मिळू शकते. तसे केल्यास वेगळे गंधक देण्याची गरज नाही.
तुरीच्या पेरणीसाठी सरी ओरंबा पद्धतीचा अवलंब करून बी सरीवर टोकल्यास सपाट पेरणीपेक्षा सुमारे 15 टक्के जादा उत्पन्न मिळते असे प्रयोगांत आढळले आहे. चिबड जमिनीत ओरंब्यावर उगवलेल्या रोपांच्या मुळांना अतिपावसामुळे हानी होत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी ओरंब्यावरची पेरणी जास्त उपयुक्त ठरते.
बियाणे पेरण्यापूर्वी थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेमुळे रोगाला आळा बसतो आणि उगवण चांगली होऊन रोपांची जोमदार वाढ होते.
घरचे बियाणे पेरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी. त्यासाठी कुंडीमध्ये 100 किंवा 200 बी मोजून मातीने झाकावे. त्याला चार ते पाच दिवस ओले राहण्याकरिता रोज पाणी घालावे. सहा दिवसांनंतर उगवलेल्या बिया मोजून उगवण्याची टक्केवारी काढावी. अशाचप्रकारे टीपकागदामध्ये (ब्लॉटिंग पेपर) किंवा ओल्या कापडामध्ये उगवणशक्ती मोजता येईल. उगवण शक्ती 80 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात बियाण्याचे प्रमाण पेरताना वाढवावे.
रासायनिक बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम जिवाणू संवर्धक आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक लावल्यानंतर ते बियाणे त्याच दिवशी थोडे सुकवून पेरणीस वापरावे.
आंतरपीक पद्धतीचे फायदे :
१) मुख्य पिकामध्ये कडधान्यवर्गीय पिकाचे आंतरपीक किंवा मिश्र पीक घेतल्यास बहुतेक कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळांवर असलेल्या गाठींद्वारे वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण होते. त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढून नत्रयुक्त रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येते, तसेच जमिनीची सुपीकता टिकवता येते.
२) मुख्य पिकाची आणि आंतरपिकाची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरांत वाढत असल्यामुळे आणि प्रत्येक पिकाची अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असल्यामुळे अन्नद्रव्ये, ओलावा इ. साठी तसेच उंची वेगवेगळी असल्यामुळे सूर्यप्रकाशाकरिता स्पर्धा होत नाही.
३) मुख्य पीक आणि आंतरपीक किंवा मिश्र पिकाचा जीवनक्रम पूर्ण करण्याच्या कालावधीत भिन्नता असल्यामुळे कापणी करणे सुलभ होते.
४) आंतरपीक किंवा मिश्र पिकांमुळे शेतकऱ्यांच्या विविध गरजा उदाहरणार्थ नगदी, तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, जनावरांसाठी चारा, जळणाकरिता इंधन इत्यादी गरजा भागविल्या जातात.
५) नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पूर्ण/सर्व पीक उद्ध्वस्त न होता किमान एका पिकाचे तरी उत्पन्न हाती लागते.
६) कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणाकरिता आंतरपीक/मिश्र पिकाची मदत होते.
७) वेगवेगळ्या कुटुंबातील पिकांची लागवड आंतरपीक पद्धतीने होत असल्यामुळे आपोआपच त्याच्याशी संलग्न असलेल्या तणांचा तसेच, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
८) सलग एकाच पिकाखाली शेती न ठेवता मुख्य पिकांमध्ये आंतर किंवा मिश्र पीक पद्धती अंमलात आणल्यास निव्वळ आर्थिक मिळकत अधिक मिळाल्याचे अनेक संशोधनपर प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.
पेरणीचे नियोजन :
तुरीच्या पिक्ची वाढ हि पेरणी केव्हा झाली यावर अवलंबून असते, तुरीची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु त्यापूर्वी पेरणी जितकी लवकर होईल तितकी तुरीच्या झाडाची वाढ जास्त होते. जून, जुलैच्या पावसावर ते पीक जोरदार वाढते.
2) सलग तूर पेरणीसाठी दोन ओळींतील आणि दोन झाडांतील अंतर ठरविणे गरजेचे आहे. त्यामुळे बियाण्याचे योग्य प्रमाण वापरून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.
3) जुलैच्या प्रथम आठवड्यातील पेरणीसाठी लवकर तयार होणाऱ्या आय.सी.पी.एल. 87 किंवा टीएटी-10 सारख्या वाणांची 45 x10 सें.मी. अंतराने पेरणी करावी. एकेटी 8811, बीडीएन 708, पीकेव्ही तारा, विपुला, बीएसएमआर 853 या वाणांची 90×20 किंवा 60×30 सें.मी. अंतराने पेरणी करावी. आशा, सी 11 आणि बीएसएमआर 736 या वाणांची 60 x 60 सें.मी. किंवा 120 x 30 सें.मी.वर पेरण्याची शिफारस आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये जोडीदार पिकांच्या ओळीच्या प्रमाणावर ओळीतील अंतर अवलंबून राहील. दोन झाडांतील अंतर पेरणीची वेळ आणि जमिनीच्या सुपीकतेचा विचार करून ठरवावे.
4) पीक पेरणीपासून सुमारे 90 ते 110 दिवसांपर्यंत तणमुक्त असावे. आंतरमशागतीमुळे जमिनीत हवा खेळती राहते. उपलब्ध पर्जन्यमानाप्रमाणे जलसंवर्धन होते आणि त्याद्वारे पिकाची वाढ चांगली होऊन उत्पन्न चांगले येते. विशेषतः मूग, उडीद किंवा सोयाबीनसारख्या अल्पमुदतीच्या आंतरपिकांची कापणी झाल्यावर आंतरमशागत करून तुरीच्या ओळीतील जमीन भुसभुशीत राहील याची काळजी घ्यावी. शक्य तेथे तुरीला मातीची भर देण्यासाठी कोळप्याच्या दात्यांना दोरी बांधून ओळीतील झाडांना भर देता येईल. त्याद्वारे डवरणीनंतर सरी ओरंबा तयार होतील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्वचित प्रसंगी पाऊस काही भागात पडण्याची शक्यता असते. त्याचे या सरीमध्ये संवर्धन होईल. जास्त झाल्यास सरीद्वारे निचरा होण्यास मदत होईल. पाऊस नसल्यास या सऱ्या उपलब्ध असल्यास ओलीत करण्यासदेखील उपयोगी असतील.
5) तूर पिकाला फुलोऱ्याच्या काळात जमिनीत योग्य ओलावा असणे फायदेशीर ठरते. पाण्याचा ताण पडल्यास फुलोऱ्यावर आणि शेंगांच्या वाढीच्या अवस्थेत एक किंवा दोन ओळींत केल्यास सुमारे 30 ते 52 टक्के उत्पादन वाढते असे प्रयोगात आढळले आहे.
आंतरपिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्त्व :
आंतरपीक / मिश्र पीक पद्धतीचे एकात्मिक कीड व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान आहे. विविध आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीमुळे मुख्य पिकांवर येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य आहे. मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. याच आंतरपिकांचा वापर, पक्षी थांबे म्हणूनसुद्धा करतात आणि यांवर बसून पिकातील अळ्या वेचून खातात.
आंतरपिकाचे आपत्कालीन पीक नियोजनात महत्त्व :
निसर्ग हा आपल्या हातचा नाही. पाऊस वेळेवर येणे, न येणे, मध्येच मोठी उघडीप पडणे, पाऊस उशीरा येणे तसेच, पाऊस सारखा लागून पडल्यास शेतकऱ्यांना पेरणी करण्यात नाकी नऊ येतात. अशा परिस्थितीत आंतरपीक पद्धती फायद्याची ठरते. त्याकरिता, शेतकरीबंधूंनी,सुचविल्याप्रमाणे आंतरपीक पद्धती अंमलात आणावी नियमित पावसाळा दोन किंवा तीन आठवडे सुरु झाल्यास म्हणजेच २ ते १५ जुलै दरम्यान सुरु झाल्यास, कपाशीत मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा आणि संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता, थोड्या थोड्या क्षेत्रावर ही पिके घ्यावीत. काही क्षेत्रावर, (कापूस+ज्वारी+तूर+ज्वारी) ६:१:२:१ किंवा ३:१:१:१ या ओळींच्या प्रमाणात घ्यावी. त्यामुळे एकूण उत्पादन आणि उत्पन्नात अधिक फायदा होतो. सोयाबीन पिकात २, ६ किंवा ९ ओळींनंतर १ ओळ तुरीची आपल्या सोयीनुसार घ्यावी. नियमित पावसाळा पाच आठवड्यांपेक्षा जास्त उशीरा सुरु झाल्यास म्हणजेच, २३ ते २९ जुलै दरम्यान पाऊस आल्यास, कापसाची पेरणी करणे टाळावे. परंतु, काही क्षेत्रावर कपाशी पेरणे अनिवार्य असल्यास केवळ देशी कपाशीचे सरळ आणि सुधारित वाण वापरावे. तसेच, कापसाच्या ओळींची संख्या कमी करून एक किंवा दोन ओळी तुरीच्या आवर्जून घ्याव्यात, तसेच; इतर पिकांत सुद्धा तुरीचे आंतरपीक घ्यावे.