कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरभरा या पिकाखाली 3.01 लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन 2.51 लाख टन होते. हरभऱ्याचा उत्पादनात घट येण्यास घाटेअळीचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. पिकाच्या अवस्थेनुसार कळ्या, फुले व घाट्यांवरील प्रादुर्भाव आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसानकारक ठरतो. त्यामुळे घाटेअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर द्यावा.
ओळख:-
पूर्ण विकसित घाटेअळी पोपटी रंगाची (विविध छटाही आढळतात) ४ – ५ से. मी. लांब असते.
नुकसान:-
लहान अळ्या सुरवातीस पानावरील आवरण खरडून खातात. अशी पाने काही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. नंतर अळी कळ्या व फुले कुरतडून खातात. पूर्ण वाढ झालेली अळी तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते. कधी कधी पूर्ण अळी घाट्यात आढळून येते. एक अळी साधारणतः ३० – ४० घाट्यांचे नुकसान करते. हरभऱ्यावर या अळीचा ४०.० टक्के पर्यंत प्रादुर्भाव आढळून येतो.
एकात्मिक व्यवस्थापन :
१) उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करुन जमिनीतील कोष नष्ट करावेत.
२) पिकांची पेरणी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कालावधीत करावी.
३) शिफारस केलेल्या वाणाची योग्य अंतरावर पेरणी करावी.
४) हरभरा पिकात आंतरपिक अथवा मिश्रपिक अथवा शेताच्या सभोवताली दोन ओळी जवस, कोथिंबीर किंवा मोहरी या पिकाची लागवड करावी म्हणजे परभणी किटकांचे संवर्धन होण्यास मदत होईल. हरभरा पेरताना त्यासोबत १०० ग्रॅम प्रति हेक्टरी ज्वारीचे बियाणे मिसळून पेरणी करावी. ज्यामुळे पशी आकर्षित होऊन घाटेअळीच्या अळ्या वेचून खातील.
५ ) ज्या ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव हमखास होतो अशाठिकाणी बाजरी, ज्वारी, मका अथवा भुईमूग या पिकांची फेरपालटीसाठी वापर करावा.
६) पीक एक महिन्याचे होण्यापूर्वी कोळपणी / निंदणी करून शेत तणविरहीत ठेवावे.
७ ) पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा १ ते १॥ फूट अधिक उंचीचे ‘ढ ‘ आकाराचे ५० पक्षीथांबे प्रति हे. घाटेअळीसाठी लावावेत.
८ ) शेताच्या बांधावरील घाटेअळीची पर्याची खाद्यतणे उदा. कोळशी, रोनभंडी , पेटारी ही पर्यायी खातद्यतणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
९ ) घाटेअळीच्या सनियंत्रणासाठी / किड सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यामध्ये ८ – १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास कामगंध सापळ्याची संख्या वाढविणे आवश्यक ठरते अशा वेळी घाटेअळीचे नियंत्रण करण्याकरिता प्रति हेक्टरी २० ते २५ कामगंध सापळे लावावेत.
१०) मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
११ ) पिकावरील मोठ्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा.
१२ ) पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात ५ % निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
१३ ) घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच. ए. एन. पी. व्ही. ५०० एल. ई. विषाणू (५०० मिली) ५०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये ५०० मिली चिकट द्रव (स्टीकर) आणि राणीपाल (नीळ) २०० ग्रॅम टाकावा.
१४ ) सुप्तावस्थेतील किडींचा नाश करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी.
जैविक नियंत्रण :
घाटेअळीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता प्रति हेक्टर एचएएनपीव्ही 250 रोगग्रस्त अळयांचा अर्क (2:10:9 तीव्रता) किंवा 500 रोगग्रस्त अळयांचा अर्क (1:10:9 तीव्रता) फवारावा. विषाणूच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अति-निलकिरणात टिकवण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणीपॉल टाकून हे द्रावण 1 मि.ली. प्रति लिटर याप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी शेतात प्रथम व व्दितीय अवस्थेतील अळया असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते. जास्त प्रादुर्भावाच्या काळात जर घाटे अळीने नुकसानीची पातळी (1-2 अळया प्रती मिटर ओळ किंवा 5 टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास खालील नियंत्रण करावे.
रासायनिक किटकनाशके :
- हरभऱ्यावरील घाटेअळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी रेनाक्झीपायर 20 एससी 2.5 मि.ली. किंवा फ्लुबेंडामाईड 20 डब्ल्युडीजी 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- अळयांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या केल्यास अळीचे व्यवस्थापन करता येईल.
- पहिली फवारणी 40 ते 50 टक्के फुले धरल्यावर तर दुसरी फवारणी 15 दिवसाने करावी.
- हरभऱ्यावरील घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी व आर्थिक मिळकतीसाठी पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना डेल्टामेथ्रीन 1 टक्का प्रवाही-ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही या मिश्र किटकनाशकाची 25 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी.
- त्यानंतर 15 दिवसांनी इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी.