माहिती मृत्युपत्राचा कायदा

0

मृत्यूपत्र म्हणजे काय?

हे एक कायदेशीर दस्तऐवज असते ज्यात एखाद्या व्यक्तिच्या मृत्यू नंतर त्याची/तिची मालमत्ता आणि संपत्ती ज्या व्यक्तिला मिळणार असते त्याचे/त्यांचे नाव असते. जी व्यक्ती हे दस्तऐवज कार्यान्वित करते, ती जीवंत असे पर्यन्त ती हे दस्तऐवज मागे घेऊ शकते, बदलू शकते, किंवा त्याच्या जागी दुसरे निर्माण करू शकते.

माहिती मृत्युपत्राचा कायदा

मालमत्तेचा हस्तांतरण कायदा 1872 नुसार कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण हे दोन पद्धतीने होऊ शकते.

1) दोन जिवंत (किंवा कायदेशीररीत्या जिवंत जसे संस्था वगैरे) व्यक्तींमध्ये.
2) मृत्यूनंतर मालमत्तेचे हस्तांतरण.

मृत्यूनंतर मालमत्तेचे हस्तांतरण दोन पद्धतीने होऊ शकते.

1) मृत्युपत्राद्वारे हस्तांतरण.

2) कायदेशीर तरतुदीने मालमत्तेचे हस्तांतरण.

कोणतीही मालमत्ता ही विहित मालकाशिवाय राहूच शकत नाही. एखाद्या व्यक्तीची स्वतःची मालमत्ता किंवा एकत्र कुटुंबातील फक्त त्याच्या हिश्‍श्‍यापुरत्या मालमत्तेची विल्हेवाट तो जिवंत असताना मृत्युपत्राद्वारे किंवा इच्छापत्राच्या रूपाने करू शकतो. तो अधिकार त्याचाच आहे; मात्र त्याने असे मृत्युपत्र त्याच्या हयातीत करून न ठेवल्यास कायदा उपस्थित होतो आणि योग्य त्या कायदेशीर तरतुदींनुसार मालमत्तेची विल्हेवाट, हस्तांतरण होऊ शकते. मात्र, मृत्युपत्राचा अंमल व्यक्ती मरण पावल्यानंतरच सुरू होतो. जिवंत व्यक्ती त्याच्या हयातीत कितीही मृत्युपत्र भारतीय वारसा कायदा 1925 कलम 2 (ब) नुसार करू शकते; मात्र असे शेवटचे केलेले मृत्युपत्रच फक्त कायदा ग्राह्य धरते; तसेच व्यक्तीच्या हयातीत सादर केलेल्या मृत्युपत्रात कितीही वेळा बदल करता येऊ शकतो, त्याला इंग्रजीत “कोडीसील’ म्हणतात; मात्र असे केलेले शेवटचे बदलपत्र (कोडीसील) फक्त कायद्याने ग्राह्य धरले जाते. मृत्युपत्राचा कायदा हा हिंदू, मुस्लिम, पारशी वगैरे धर्मांकरिता थोड्या फार वेगळ्या स्वरूपात काम करतो. हिंदू व्यक्तींच्या बाबतीत हिंदू वारसा कायदा 1956, कलम 30 मधील तरतुदींनुसारच होणे आवश्‍यक ठरते. भारतीय वारसा कायदा 1925, कलम 63 व पुराव्याचा कायदा 1872, कलम 68 व 71 प्रमाणे मृत्युपत्र शाबीत करावे लागते.

मुद्रांकन व नोंदणी :

मृत्यूपत्र साध्या कागदावर पण कार्यान्वित केली जाऊ शकते आणि नोंदणी झाली नाही तरी त्याला मूल्य असते, म्हणजे कायद्याप्रमाणे नोंदणी करणे अनिवार्य नाही. पण त्याच्या खरेपणावर कोणी शंका घेऊ नये म्हणून तुम्ही त्याला नोंदणीकृत करू शकता.
जर तुम्हाला तुमचे मृत्यूपत्र नोंदणीकृत करून हवे असेल, तर तुम्हाला साक्षीदारांसह उप-निबंधकाच्या कार्यालयात जावे लागते. त्यासाठी विविध जिल्ह्यात उप-निबंधक असतात आणि संबंधित कार्यालयात चौकशी करून कोण आपल्याला मदत करेल हे शोधावे लागते.

साक्षीदार :

मृत्युपत्रावर कायदेशीररीत्या सज्ञान व सक्षम अशा कमीत कमी दोन व्यक्तींचा साक्षीदार म्हणून त्यांचे नाव, वय, व्यवसाय व पत्ता असणे आवश्‍यक असते. सदर दोन्ही साक्षीदारांनी, मृत्युपत्रकाराने प्रत्यक्ष मृत्युपत्र करताना व मृत्युपत्रकाराने प्रत्यक्ष सही करत असताना स्वतः पाहणे आवश्‍यक असते व म्हणून सह्या करणे आवश्‍यक असते.
वैद्यकीय दाखल्याची गरज –
मृत्युपत्रकाराने मृत्युपत्र करताना त्याची शारीरिक व मानसिक परिस्थिती उत्तम होती हे दर्शविण्याकरिता डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक असते. शक्‍यतो असे प्रमाणपत्र मृत्युपत्राच्या शेवटीच घेणे श्रेयस्कर ठरते.

मृत्युपत्रातील मिळकतीचे वर्णन :

मृत्युपत्राचा अंमल हा मृत्युपत्रकाराच्या प्रत्यक्ष मृत्यूनंतर होत असल्याने मृत्युपत्रकाराची स्वतःची मिळकत किंवा स्वतःच्या हिश्‍श्‍याच्या मिळकतीचे तंतोतंत वर्णन मृत्युपत्रात करणे आवश्‍यक असते, तसेच अशी मिळकत कोठे असावी, याचे बंधन नाही. तसेच, सर्व स्थावर व जंगम मिळकतीचे वर्णन सर्व तपशिलासह मृत्युपत्रात होणे आवश्‍यक ठरते.

मृत्युपत्र कोणाच्या लाभात करता येते?

मृत्युपत्र हे कायदेशीर वारसांच्या लाभात करणे बंधनकारक नसते. सदर मिळकती या स्वतःच्या असल्याने किंवा स्वतःच्या हिश्‍श्‍याच्या असल्याने त्याची विल्हेवाट करण्याचा अधिकार पूर्णत्वाने मृत्युपत्रकारास असतो, त्यामुळे तो कुणाच्याही लाभात असे मृत्युपत्र करू शकतो. मग तो सज्ञान वा अज्ञान कोणीही चालतो किंवा जन्माला येऊ घातलेल्या मुलाच्या नावेसुद्धा मृत्युपत्र करता येते; तसेच त्रयस्थ इसमाच्या लाभात करण्यासही कायद्याचा कोणताही अडसर असत नाही (कलम 138च्या तरतुदीस अधीन राहून).

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी k[email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.