रोपवाटिकेत तयार केलेल्यारेापांना उखडून/ उपटून ते तयार केलेल्या शेतातील वा परसबागेतील गादी वाफ्यात रोवणे या क्रियेला प्रतिरोपण म्हणतात. यावेळी रोपे काळजीपूर्वक हाताळावी लागतात. तसेच जागा व वेळ वाचवण्यासाठी लगबग करावी लागते.
यशस्वी प्रतिरोपण ः-
अ) प्रतिरोपण (प्रत्यारोपण) एकाएकी न करता किमान एक आठवडा त्याची पूर्वतयारी करावी लागते. एक आठवडा आधी पाण्याचे प्रमाण कमी-कमी करून रोपट्यांना सहनशील बनवावे लागते. सहनशील झालेली रोपटी प्रतिरोपणाचा झटका सहन करू शकतात.
ब) रोपटे एका जागेतून उपटून दुसर्या जागी रोवणे या क्रियेला प्रतिरोपण/ प्रत्यारोपण असे म्हणतात.
क) कृषितज्ज्ञ म्हणतात हे कार्य कुशलतेने व जलदगतीने झाले पाहिजे.
ड) माळी, शेतकरी वा बागकाम करणार्यांकडे प्रतिरोपणाच्या कार्यासाठी केवळ दोन संधी असतात. 1 ) जेव्हा रोपटी सुप्तावस्थेत असतात, म्हणजेच त्यांची वाढ थांबलेली असते तेव्हा. 2) जेव्हा रोपटे वेगाने वाढत असते.
इ) रोपट्यांत या क्रिया होत असताना –
1) रोपट्याचे मूळ हवेत उघडे पडते व ते प्रभावित होते.
2) रोपट्याचा जमिनीशी असणारा संपर्क तुटतो.
3) रोपट्याची होत असलेली वाढ काही काळासाठी थांबते.
अशावेळी काय करावे?
तुम्ही शेतकरी असा किंवा परसबाग (किचन गार्डन) लावणारे हौशी, तुमचे शेत असो वा छोटासा मातीचा वाफा. जेथे रोपांचे प्रतिरोपण करणार आहोत वा जेथे रोपटी उगवली आहेत, या दोन्ही जागांवरील माती बारीक असली पाहिजे. तसेच प्रतिरोपणाच्या जागेवर खोल खुदाई केली पाहिजे. जागा (शेत) ओलसर असावे म्हणजे प्रतिरोपण यशस्वी होईल.
प्रतिरोपणाची आवश्यकता ः-
कोणतेही कार्य माणूस चांगल्यासाठीच करतो. आपले भले व्हावे, त्यातून लाभ मिळावा हा हेतू असतो. प्रतिरोपणसुद्धा याच हेतूने केले जाते. प्रतिरोपणाचे फायदे पुढीलप्रमाणे.
क) बी-बियाणे कमी लागते.
ख) हळूवार उगवणार्या व वाढणार्या रोपट्यांची योग्यप्रकारे देखरेख करता येते.
ग) मुळे तुटू नयेत म्हणून काळजी घेऊन रोपटी उपटली तरी ती दुसर्याजागी प्रतिरोपण करत असताना काही वेळा मुळे तुटतात. याचाही एक फायदा असा आहे की, छोट्या फांद्याच्या रोपट्यांची मुळे प्रतिरोपणानंतर वाढतात. रोपवाटिकेतून उपटून जेव्हा ही रोपटी शेतात लावली जातात तेव्हा त्यांना विस्ताराला अधिक वाव मिळतो व ती भरपूर वाढतात. मातीत रोपट्यांची मुळे बंदिस्त असतात. उपटताना काही वेळा ती तुटतात.
घ) रोपट्यांचे प्रतिरोपण मजेत, हळूहळू, वेळ वाया घालवून करू नये. प्रतिरोपण जेवढ्या जलद गतीने करता येईल तेवढे चांगले असते. म्हणजे नव्या जागी मुळे लगेच स्थिरावतील व मातीची पकड घेतील आणि प्रतिरोपणाचा धक्का/ झटका सहन करतील.
च) प्रतिरोपणामुळे प्रतिकूल परिस्थितीत वा हंगामात भाजीपाला पिकवणे शक्य झाले आहे.
छ) शेत जमीन टणक बनली आहे. शेवाळे साचल्यासारखी मातींची पावडे झाली आहेत अशा परिस्थितीत जमिनीत बीजारोपण केले तरी ते रुजणार नाहीत, की अंकुर जमिनीवर दिसणार नाहीत. याचाच अर्थ असा की भाजीपाल्याचे उत्पन्न घेणार येणार नाही. अशावेळी शेताच्या टणक झालेल्या जमिनीत बीजारोपण न करता वेगळ्या रोपवाटिकेत बी पेरणी करून त्यांची रोपटी झाल्यावर शेत जमीन नांगरून त्यात रोपवाटिका तयार केलेली रोपटी लावावीत व जलसिंचन करावे. म्हणजे भाज्या व फळभाज्यांचे उत्पादन घेता येईल.
ज) शेतात बी न पेरता, रोपवाटिकेतून तयार केलेली रोपटी आणून शेतात रोपल्यास समान रुपात त्याची वाढ होऊन भाज्या, फळे, फुले देऊ लागतात. पीकही चांगले येते.
झ ) बीजारोपण करताना शेतात बिया अधिक पेरल्या जातात तर रेापवाटिकेत योग्य प्रमाणात. रोपवाटिकेतील सुदृढ , लागतील तेवढीच रोपटी आणून शेतात पेरल्यास आर्थिक बचत होते.
ट) प्रत्यारोपणासाठी रोपटी विचार करून, लागतील तेवढीच व योग्य अंतर ठेवून लावता येतात. ही रोपटी सुदृढ व सहनशील असतात. अशा सुदृढ रोपट्यांना फळेही चांगली येतात.
ठ) रोपटी योग्य अंतरा-अंतराने लावल्यास त्यांना खत देणे, खुरपणी करणे, गवत काढणे, पाणी देणे, कीटकनाशके देणे आणि रोपट्यांचे निरीक्षण करणे सोपे होते. किडीचा वेळीच बंदोबस्त करता येतो. यासर्वांचा इष्ट परिणाम होऊन पीक-फळे भरपूर येतात.
ड) प्रतिरोपण केलेली रोपटी लवकर तयार होतात. त्याळे पीक-फळे लवकर हाता येतात. फळे लवकर मिळाल्याने बाजारभावही चांगला मिळतो.
ढ) एवढेच नव्हे तर, पीक-फळे दीर्घकाळ मिळत राहतात व नफा भरपूर होतो.
प्रतिरोपण लाभ/हानी ः-
रोपट्यांच्या प्रतिरोपणातून डझनावर होणारे लाभ आतापर्यंत सांगितले. आणखीही काही अप्रत्यक्ष लाभ होऊ शकतील. परंतु प्रतिरोपणामुळे काही बाबतीत नुकसानही संभवते.
1) प्रतिरोपणामुळे सामान्य लागवडीपेक्षा अधिक खर्च येतो. रोपवाटिकेसाठी आळे, मातीचे गादी वाफे तयार करणे, त्यात बी पेरणे, त्यांची देखभाल करणे, त्यानंतर महिना-दीड महिन्यानंतर रोपे तयार होतात. मग त्यांचे प्रतिरोपण करावे लागते. प्रतिरोपणासाठी पुन्हा खर्च होतो. एकंदरीत हा प्रकार थोडा महाग पडतो.
2) आधी रेापटे तयार करणे, मग ते उखडून दुसरीकडे रोवणे यात रोपट्याला परिपक्वता येण्यास वेळ लागतो. काही वेहा फळ धारणेस विलंब होतो.
3) तरीही काही कृषि तज्ज्ञ प्रतिरोपणाला अत्यावश्यक क्रिया मानतात आणि याशिवाय पर्याय नाही असेही म्हणतात. पीक-फळे रसदार आणि भरपूर , दीर्घकाळ येण्यासाठी प्रतिरोपण करावेच लागते असे म्हणतात.
सर्व भाजीपाल्यांचे प्रतिरोपण शक्य आहे का?
आतापर्यंत प्रतिरोपणाचे लाभ यावर विस्तृत चर्चा केली. प्रतिरोपण कसे करवे हे सुद्धा चर्चेत आले. सर्वच भाजी प्रकारांचे प्रतिरोपण शक्य नसते. भाजीपाल्याच्या बिया शेतकरी गादी वाफ्यातून हाताने विखरून टाकतात व त्यावर मातीमिश्रित खत लोटतात. काहींची रोपं तयार करून विक्रीस आणतात.
1) प्रतिरोपण शक्य ः-
प्रतिरोपण शक्य असणारे भाज्यांचे प्रकार- कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, ब्रोकली व सेलेरी इ. यांची रोपे तयार करून सहजपणे एका जागेवरून दुसर्या जागी रोवता येतात. नव्या जमिनीतही ही रोपटी लवकर मुळे धरतात.
2) प्रतिरोपण अशक्य ः-
असे काही भाजीप्रकार आहेत की ज्यांचे प्रतिरोपण अशक्य समजले जाते, तरीही काही प्रयोगशील शेतकरी यांचे प्रतिरोपण करून काही अल्पसे यश मिळवतात.पण ते व्यवहार्य नाही. टरबूज, काशीफळ भोपळा, कलिंगड, शेंगभाज्यांचे प्रकार व टिंडा हे प्रतिरोपणास अशक्य समजले जाते.
प्रतिरोपण केव्हा करावे ?
ज्यांचे प्रतिरोपण शक्य आहे, त्यांचे प्रतिरोपण केव्हा करावे याला काही पर्यादा आहेत. मनाला येईल तेव्हा प्रतिरोपण करणे शक्य नसते.
अ) प्रतिरोपणासाठी रोपट्याची उंची 10 ते 12 से.मी. आवश्यक असते.
ब) रोपट्याला त्याच्या मूळ जातीची 5-6 पाने आलेली असावीत.
वरीलप्रमाणे रोपट्यांची उंची व पाने फुटलेली असताना, प्रतिरोपण शक्य होते. प्रतिरोपण करताना वेह वाया घालवू नये. रोपटे उखडून बराच वेळ मोकळ्या हवेत राहिल्यास ते कमजोर होते.
सावधानी ः-
रोपटे लहान असतानाच त्याचे प्रतिरोपण यशस्वी होते. म्हणजेच ते रोपटे प्रतिरोपण क्रियेचा झटका/ धक्का सहन करणारे असते.
थोडक्यात महत्त्वाचे ः-
प्रत्येक रोपट्याला प्रतिरोहपणासाठी एकाच वयात, एकाच वेळी, एकाच उंचीने काढू शकत नाही. प्रतिरोपणात रोपट्यांच्या जातीनुसार भिन्नता असू शकते. 1.) रोपट्याची जात 2) रोपट्याचे आयुष्य 3) प्रतिरोपणाची दशा या तीन गोष्टींवर प्रतिरोपणाचा विचार करावा लागतो. प्रत्येक रोपट्याचा जातीनुसार प्रकार वेगळा असतो.
अ) प्रतिरोपण क्रिया सकाळी व दुपारी कधी करू नये हे कार्य सायंकाही करणे योग्य. दिवस मावळू लागल्यावर प्रतिरोपण करावे.
ब ) रात्री हवा बर्याचदा आर्द्र असते. रोपटे सायंकाळी रोपित केल्यास त्याला रात्रभर थंड हवा मिळते आणि ते स्थापित होण्यास त्याला कष्ट पडणार नाहीत.
क) कधी कधी सुदृढ रोपट्यांना पहाटेच्या थेडीत, सूर्य उगवण्यापूर्वी प्रतिरोपित करतात. रोपटी कधीही दुपारी उपटू नयेत वा त्यांचे प्रतिरोपण करू नये.
ड) प्रतिरोपण करण्यासाठी शेत लागवडीयोग्य असे आधीच तयार करून ठेवावे.
इ) प्रतिरोपित केलेल्या रोपट्याभोवती माती नीट बसवावी. तसेच माती ओलसर असावी. रोपटे जमिनीतील गारवा खेचून घेत असते. आणि स्वतः स्थिरस्थावर होत असते.
फ) रोपटी कशी काढावीत व कशी रोवावीत/लावावीत यासंबंधी माहिती पुढीलप्रमाणे.
1) खुरप्याने अगदी काळजीपूर्वक रोपटे काढावे.
2) रोपटी एकात एक गुंतवू नयेत. ती वेगळी असावीत.
3) शेतात काढलेल्या चरीत/ खड्ड्यांकडे रोपटी न्यावीत.
4) प्रत्येक खड्ड्यात अंतरा-अंतराने रोपटे ठेवावे.
5) रोपटे एका हाताने धरून, दुसर्याहाताने माती बसवावी.
6) रोपटी काढून ठेवू नयेत. रोप खुरप्याने काढणे व ते शेतात लावणे या क्रिया ताबडतोब कराव्यात.
7) रोपटी काढणे व प्रतिरोपित करणे यात टंगळमंगळ केल्यास रोपटी कोमेजून जातात, त्यांची सहनशक्ती कमी होते. साहजिकच नुकसान होऊ शकते. काढलेल्या रोपट्यांवर पाण्याचे शिंतोडे टाकत राहाणे. त्यामुळे रोपटी कोमेजणार नाहीत.
8) रोपट्यांची मुळे ओल्या मातीत असता रोपटी कोमेजत नाहीत.
9) रोपट्यांना असलेली पाने तोडू नयेत. पाने तोडल्यास रोपटे मरते.
10 ) प्रतिरोपणाचे काम पूर्ण होताच शेतात जलसिंचन करावे.
रोपट्यांची काढणी व जपणूक ः-
रोपटी जमिनीतून काढल्यानंतर त्यांची जपवणूक होणे गरजेचे आहे. याबद्दल आणखी माहिती पुढीलप्रमाणे.
अ) रोपटी काढल्यानंतर त्याची मुळे बुडतील अशा भांड्यात ती रोपटी पाण्यात ठेवावीत.
ब) काढलेली रोपटी एका ठिकाणाहून दुसर्या जागी नेत असताना ती टोपल्यात भिजवलेल्या कापडात गुंडाळून, झाकून न्यावीत.
क) प्रतिरोपणाचे काम झटपट करावे. काढणी व प्रतिरोपण यातील अवधी कमी असावा. रोपटी कोमेजू लागतील एवढा वेळ घेऊ नये.
ड) रोपवाटिकेत असणारी रोपटी खुरप्याने काढताना रोपे व त्यांच्या मुळांना हानी पोहचेल अशी घाई करू नये. यासंबंधी काही सूचना.
1) रोपटी काढण्यापूर्वी गादी वाफे जलसिंचन करून भिजवावेत.
2 ) जेवढी गरज आहे, तेवढीच रोपटी काढावीत.
3) काढलेली रोपटी सावलीत, ओल्या कपड्यात ठेवावीत.
4) रोपट्यांना उन्हे लागून त्यांचे बाष्पीभवन होऊ देऊ नका.
5) रोपटी लावल्यानंतर त्यांची मुळे मातीत दाबू बसवा.
6 ) मुळे जमिनीवर राहू नयेत. तसेच रोपट्याभोवती माती पोकळी राहू देऊ नका.
दोन वेगळी मते ः-
अ) काही कृषी तज्ज्ञ म्हणतात – रोपट्यांची काही पाने तोडल्यामुळे रोपांचे बाष्पीभवन कमी होते. रोपटी कोमेजत नाहीत. काही पाने तोडायला हरकत नाही.
ब) तर काही तज्ज्ञ पाने अजिबात तोडू नका असे सांगतात. पाने तोडावीत की नको हे ज्याचे त्याने अनुभव घेऊन ठरवावे.
प्रतिरोपणानंतर –
रोपट्यांची काढणी व पुनर्लावणी (प्रतिरोपण) झाल्यानंतर घ्यावयाची काळजी.
अ) रोपण केलेल्या रोपट्यांचे रोज निरीक्षण करावे.
ब) जोपर्यंत रोपटे मूळ धरून स्थिर होत नाही तोपर्यंत योग्य प्रमाणात पाणी द्यावे.
क) एखादे रोपटे पाणी देऊनसुद्धा कोमेजत जाईल. त्याच्या जगण्याची खात्री वाटत नसेल तर ते रोपटे काढून टाका. त्याजागी दुसरे रोपटे लावा.
ड) रोगराई, कीटक यांचा धोका निर्माण झाल्यास वेळ न दवडता योग्य ती उपाययोजना करा. रोग पसरू देऊ नका. रोगट रोपटे ताबडतोब काढून टाका.