रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकास शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण असे महत्व आहे. हरभरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो तेव्हा त्याला घांटा असें म्हणतात. याचे मूळस्थान तुर्कस्तान आहे असे मानले जाते. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३०किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करुन देतो.
पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वाणांचा वापर केल्यास या विदर्भातील शेतकरी या पिकासाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडून हस्त नक्षत्रावर पडणा-या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन अतिशय मोठमोठ्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करतात आणि समाधानकारक उत्पादन घेतात.
हरभऱ्यापासून डाळ, बेसन किंवा भाजी ही तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पांनाची भाजी पण तयार करतात. अंकूर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते .हरभर्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात.
१) जमिनीची निवड :-
हरभरा पिकास मध्यम ते भारी जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. चोपण, निचरा न होणाऱ्या जमिनीत तसेच आम्ल जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीची कमीत कमी मशागत करावी जेणेकरून जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल.
२) पेरणीचा कालावधी व पद्धत :-
जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. जिरायती परिस्थितीत देशी हरभरा झाडांची हेक्टरी संख्या राखण्याकरिता बियाणे चार तास पाण्यात भिजवून व नंतर सावलीत वाळवून बीजप्रक्रिया करूनच पेरावे. ओलिताखाली हरभरा ऑक्टोबरच्या दुसरा पंधरवड्यात पेरल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी. देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर ३० सें.मी., तर दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे. काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडातील अंतर १० सें.मी. ठेवावे. ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वाफा पद्धत वापरणे फायदेशीर ठरते.
३) बियाण्याचे प्रमाण :-
हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता ६५ ते ७० किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपो-या दाण्यांच्या वाणाकरिता १०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी. के. व्ही. ४ या जास्त टपोच्या काबुली वाणांकरिता १२५ ते १३० किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी-वरंब्यावरही चांगला येतो. ९० सें.मी. रुंदीच्या स-या सोडाव्यात व वरब्यांच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी करावी.
४) सुधारित वाण :-
1) देशी हरभरा : हा हरभरा मुख्यत्वे डाळीकरिता व बेसनाकरिता वापरतात. या प्रकारामध्ये साधारणतः दाण्याचा रंग फिक्कट काथ्या ते पिवळसर असतो. दाण्याच्या आकार मध्यम असतो.
2) भारती (आय.सी.सी.व्ही. १०) : हा वाण जिरायती, तसेच बागायती परस्थितीत चांगला येतो. हा वाण मररोग प्रतिबंधक असून, ११० ते ११५ दिवसात कापणीस तयार होतो. जिरायतीत हेक्टरी १४ ते १५ क्विंटल तर ओलितामध्ये ३० ते ३२ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.
3) विजय (फुले जी-८१-१-१) : जिरायती, ओलिताखाली तसेच उशिरा पेरणीकरिता प्रसारित केला आहे. मररोगास प्रतिकारक्षम असून, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. जिरायतीत हेक्टरी १५ ते २० क्विंटल व ओलिताखाली ३५ ते ४० क्विंटल व उशिरा पेरणी केल्यास १६ ते १८ क्विंटल प्रतिहेक्टर अशी उत्पादनक्षमता आहे.
4) जाकी ९२१८ : हा देशी हरभऱ्याचा अतिटपोर दाण्याचा वाण आहे. हा वाण लवकर परिपक्व होणारा (१०५ ते ११० दिवस) आणि मररोग प्रतिबंधक आहे. सरासरी उत्पादन १८ ते २० क्विंटल प्रतिहेक्टर एवढे आहे. हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे. हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
5) काबुली हरभरा :
हा हरभरा छोले भटोरे बनविण्यासाठी वापरतात. या हरभऱ्याच्या प्रकारामध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो.
इतर सुधारित वाण :
- श्वेता (आय.सी.सी.व्ही.-२)
- पीकेव्ही काबुली-२
- विराट
- पीकेव्ही काबुली- ४
- गुलाबी हरभरा
- गुलक- १
- हिरवा हरभरा
५) बीजप्रक्रिया :-
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम अ २ ग्रॅम कार्बन्डॅझीम एकत्र करून प्रति किलो बियाण्यास चोळावे. यानंतर १o किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.
६) खतांची मात्रा :-
हरभऱ्याची पेरणी करताना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावा. गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नत्र व स्फुरदासोबत २० किलो गंधक किंवा २५ किलो झिंक सल्फेट प्रतिहेक्टरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे. फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी व त्यानंतर दुसरी फवारणी १० दिवसांनी करावी.
७) आंतरमशागत :-
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३0 ते ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते.
८) पाणी व्यवस्थापन :
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले,४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ से.मी पाणी लागते. प्रत्येकवेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ से.मी )देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पिक उभळन्याचा धोका असतो . स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६o टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.
९) कीड नियंत्रण :-
अ) घाटेअळी :-
घाटे अळी ही हरभ-यावरील मुख्य कोड आहे. घाटे अळी ही कोड ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभ-याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत. तसेच जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी १o ते १२ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्षांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कोड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे वापरावीत.
घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण :
उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करावी. त्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तसेच उन्हामुळे मरतात. वाणनिहाय शिफारशीत अंतरावर पेरणी करावी. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये ल्युरचा वापर करावा. शेतात हेक्टरी ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी.
वनस्पतिजन्य कीटकनाशके :
सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे.
जैविक व्यवस्थापन :
घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे.
रासायनिक नियंत्रण :
हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी क्लोरअँट्रानिलीप्रोल (२० एससी) २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ब) पाने पोखरणारी अळी :-
प्रौढ पतंग चकाकणारे, गडद रंगाचे असतात. मादी पानावर अंडी घालते. अळी पिवळ्या रंगाची असते.
अळी पानामध्ये शिरून आतील हरितद्रव्य खाते. यामुळे पानाच्या वरच्या बाजूस नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात.
नियंत्रण :
प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
१०) पीक संरक्षण : हरबऱ्यावर मुख्यत्वे मुळकुजव्या मर, भुरी आणि गेरवा हे रोग पडतात.
पेरणीनंतर लगेचे हवेतील तापमानात वाढ झाल्यास मुळकुजव्या रोगाचा उपद्रव होतो. लहान – लहान रोपे वाळू लागतात व मरतात, यासाठी तापमान योग्य व थंड असतानाच पेरणी करावी आणि बीजप्रक्रियेला जर्मिनेटर आवश्य वापरावे. मर हा रोग जिवाणूंमुळे होतो. चांगले वाढलेले झाड एकाएकी वरपासून वाळू लागते. यासाठी एन -३१ व एन -५९ या जाती रोगप्रतिबंधक जातींची शिफारस केलेली आहे.
११) काढणी :-
हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात. घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची कापणी करावी. अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते. त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.