परभणी/प्रतिनिधी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्रास नुकतीच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने (कुआरटी) भेट दिली. नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदे वतीने या समितीच्या माध्यमातुन दर पाच वर्षाने कृषि संशोधन केंद्राचा आढावा घेतला जातो.
सदरिल समितीचे अध्यक्ष हिसार येथील चौधरी चरण सिंह कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. एस. खोकर हे होते तर सदस्य म्हणुन हैद्राबाद येथील आयआयएमआरचे माजी संचालक डॉ. जे. व्हि. पाटील, माजी प्रकल्प समन्वयक (बाजरा) डॉ. ओ. व्हि. गोविला, बेंगलोर येथील माजी प्रकल्प समन्वयक डॉ. चन्नाबायरे गोवडा, आयआयएमआर, हैद्राबाद येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एच. एस. तलवार आदींचा समावेश होता. समितीने ज्वार संशोधन केंद्रावरिल प्रक्षेत्रास व प्रदर्शनास भेट देऊन रब्बी ज्वारीच्या विविध संशोधनात्मक प्रयोग व नविन संशोधित वाणांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली सदरिल समिती सदस्यासोबत दि. 18 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेञे, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे आदीसह विविध विभागांचे शास्ञज्ञ, तसेच मौजे मानोली (ता. मानवत जि. परभणी) व मौजे वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील ज्वार उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत बोलतांना मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, खरीप व रब्बी ज्वारी हे बदलत्या वातावरणामध्येही तग धरणारे पिक असुन यापासुन मनुष्यासाठी पोषक अन्न तर जनावरासाठी चांगल्या प्रतिचा कडबा मिळतो. आज ज्वारीपासुन मुल्यवर्धीत पदार्थ जसे रवा, शेवया, पोहे, बिस्कीट, लाहया आदींना मागणी वाढत आहे, त्यामुळे पुन्हा ज्वारीस आर्थिक महत्व प्राप्त होईल, असे मत व्यक्त केले. यावेळी मा. डॉ. के. एस. खोकर यांनी उपस्थित ज्वार उत्पादक शेतक-यांना नवीन ज्वारीचे वाण व संशोधानाबाबत अपेक्षा विचारल्या असता प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे यांनी कमी पाण्यात लवकर येणारा व प्रथिनांचे प्रमाण जास्त असणारा वाण विकसीत करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. मौजे वाई येथील शेतकरी नामदेव संभाजी लाखाडे यांनी ज्वार संशोधन केंद्राकडुन आदिवासी उपयोजने अंतर्गत वाई येथे राबविण्यात आलेल्या विविध वाणांच्या प्रात्यक्षिकांना आदिवासी शेतक-यांना लाभ झाल्याचे सांगितले.