भारत जिंकला…

0

नवी दिल्ली : भीषण चक्रीवादळ सायक्लोन फनीमुळे ओडीसा मोठं आर्थिक नुकसान झालंय. पण एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांनी ज्या पद्धतीने या परिस्थितीचा सामना केला ते पाहून संपूर्ण जग थक्क झालंय. उद्ध्वस्त करणाऱ्या चक्रीवादळांचा सामना कसा करायचा असतो, याचं उदाहरण ओडीसामध्ये पाहायला मिळालं. संयुक्त राष्ट्राने (यूएन) भारताच्या या यशस्वी नियोजनाचं जोरदार कौतुक केलंय. जगभरात शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या वादळासारखंच हे वादळ होतं, पण यशस्वी नियोजनामुळे परिस्थिती हाताळता आली, असं यूएनने म्हटलंय. 1999 मध्ये ओडीसात आलेल्या सुपर सायक्लोन वादळामुळे 10 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता. यावेळी 12 जणांना जीव गमवावा लागला.

ओडीसा सरकारने लोकांना सतर्क करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. वादळापूर्वी जवळपास 26 लाख मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवण्यात आले होते. 43 हजार स्वयंसेवक, एक हजार आपत्कालीन कर्मचारी, टीव्हीवर जाहिरातील, समुद्र किनारी भागात अलार्म, ठिकठिकाणी बस सेवा, पोलीस अधिकारी आणि घोषणा या ताफ्यासह राज्य सरकारने या विध्वंसक वादळाला तोंड दिलं. केंद्र सरकारनेही लागेल ती मदत देत ओदिशा सरकारला साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरिय बैठक घेत तातडीने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

विध्वंसक 20 वर्षांपूर्वीचे वादळ
20 वर्षांपूर्वी ओडीसात आलेल्या वादळापेक्षा ही परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी हजारो लोकांचा जीव गेला होता, तर अनेक जण बेपत्ता झाले होते. अधिकाऱ्यांच्या मते, हे एक दिवसाचं काम नाही. यासाठी आम्ही 20 वर्ष खर्च केले आहेत, असं अधिकारी सांगतात.

निवारा गृहांमध्ये लाखो लोकांची व्यवस्था
पीडितांसाठी वरदान म्हणजे निवारा गृह .वादळाचा सामना करण्यासाठी स्थानिक यंत्रणा आणि एनडीआरएफची टीम सक्रिय झाली होती. एनडीआरएफच्या जवळपास 65 टीम तैनात होत्या. प्रत्येक टीममध्ये 45 जवान होते. ओडीसा आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांपासून रस्ते दुरुस्ती आणि लोकांना मदत करण्यासाठी या यंत्रणांनी कंबर कसली. नौसेनेने सहा जहाजं दिले, शिवाय वैद्यकीय पथकं तैनात होती, याशिवाय भारतीय वायूदलाने दोन सी-17, दोन सी-130 आणि चार एएन-32 विमानं स्टँडबाय ठेवली होती.

संयुक्त राष्ट्राकडून नियोजनाच्या कामाला सलाम
संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने भारतीय हवामान विभागाच्या अचूक अंदाजाचं कौतुक केलंय. योग्य वेळी सूचना दिल्यामुळे ओडीसामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता आली. भारताने कमीत कमी नुकसान करत परिस्थीतवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय, असं UNISDR च्या प्रमुख मामी मिझोटरी यांनी म्हटलंय.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.