पारा 35 अंशावर पोहचला आहे. त्यामुळे बऱयाच भागात माणसाप्रमाणेच जनावरांनाही उन्हाचा त्रास होत आहे. जनावरांना हिरव्या चाऱयाची कमतरता, अनेक जनावरांची उन्हाळा सहन करण्याची प्रतिकार शक्ती यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर याचा परिणाम जाणवतो. या वातावरणात दूभत्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावर सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील तर, त्यांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे.
उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या अति प्रखर किरणांच्या संपर्कामुळे किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता, तसेच पन्हाळी किंवा सिमेंटच्या (जीआय सीट) पत्र्याचा वापर केलेल्या एकाच गोठ्यात जास्त जनावरांची गर्दी केल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, म्हणून पत्र्यावर उसाचे पाचट किंवा इतर आच्छादन करणे गरजेचे असते.
उष्माघाताची लक्षणे :-
1) जनावर अस्वस्थ होते, जनावराची तहान – भूक मंद होते.
2) जनावराच्या शरीराचे तापमान 104 ते 106 अंश फॅ. इतके वाढून कातडी कोरडी पडते.
3) जनावराच्या श्वासोच्छ्वासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते.
4) जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळते.
5) जनावरांना आठ तासांनंतर अतिसार होतो.
6) जनावरांचे लघवीचे प्रमाण कमी होते.
7) जनावरे बसून घेतात.
8) गाभण गाई गाभडण्याचे प्रमाण वाढते.
उपचार :-
1) जनावरास थंड पाण्याने स्वच्छ धुऊन काढावे. झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे. हलके पाचक गूळमिश्रित खाद्य द्यावे.
2) जनावरांच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे.
3) जनावरास नियमित व वारंवार (साधारणतः तीन – चार वेळेस) भरपूर थंड पाणी पाजावे.
4) उष्माघात झालेल्या जनावरांना पशुतज्ज्ञांकडून डेक्स्ट्रोज सलाईन आवश्यकतेनुसार शिरेद्वारे द्यावे. ऍव्हिलचे इंजेक्शन 10 मि.लि. कातडीखाली द्यावे. या रोगावर कोणत्याही प्रकारच्या जुलाबरोधक औषधाचा उपयोग होत नाही.