मूल्यवर्धनास प्रयत्न केल्यास संकटावर मात करणे शक्य

0

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा विश्‍वास
औरंगाबाद:
शेतीसमोर आज अनेक समस्या आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटीत होऊन संघर्ष करावा, याचसोबत शेतकर्‍यांनी मूल्यवर्धनासाठी प्रयत्न केल्यास सर्व संकटावर मात करणे शक्य होईल, असा विश्‍वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे व्यक्त केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री उपस्थित होते. यावेळी एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अंबलगन, संजय नगरीळकर, प्रा. डॉ. स्मिता लेले, श्रीकृष्ण गांगुर्डे, विलास शिंदे, योगेश थोरात, भारत सपकाळ, श्याम निर्मळ, सुर्याजी शिंदे आदींची उपस्थिती होती.

यावेळी देसाई म्हणाले की, शेती वाचवण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपन्या मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या पाहीजे. शेतकर्‍यांनी तयार केलेल्या मालाची किंमत त्याला ठरवता येत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांनी नव्या गोष्टींचा शोध घ्यायला हवा. कृषीमालावर प्रक्रिया केली पाहीजे. सोबत मूल्यवृद्धी करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकर्‍यांनी साध्या साध्या गोष्टी समजून घेतल्या पाहीजेत. शेतकर्‍यांनी संघटीत होऊन संघर्ष करावा, संघर्ष केल्याशिवाय शेतकर्‍यांना काही मिळणार नाही. कारण संघटनेला यंत्रणा घाबरते. गावोगावी अशी संघटना तयार व्हावला पाहीजे. पीक पद्धतीत बदल करण्याचाही शेतकर्‍यांना विचार करावा. संकटात असलेला शेतकरी स्वतःच्या प्रयत्नातून बाहेर पडू शकेल असेही देसाई म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अंबलगन यांनी जगात कृषी क्षेत्राची उलाढाल सातशे बिलीयन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी बदलत्या काळानुसार आपल्यात बदल करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी संजय काटकर म्हणाले की, शासन आणि प्रशासन शेतकर्‍यांसाठी एका व्यासपीठावर आले आहे. ही शेतकर्‍यांसाठी मोठीबाब आहे. प्राथमिक स्तरावरील प्रक्रियेसाठी शासन जोपर्यंत पाठबळ देत नाही, तोपर्यंत या कंपन्या पुढे जाऊ शकत नाहीत. यापुढे उत्पादक कंपन्यांनी पुढील टप्प्यात जावे. पुढचा टप्पा पॅकेजिंग, मार्केटींग या क्षेत्रात पुढे यावे. बाल्यवस्थेत उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे.

प्रभात डेअरीचे संचालक सारंग निर्मळ यांनी, प्रभात डेअरीतर्फे आठ जिल्ह्यात दुधाचे संकलन करते. एक लाख शेतकर्‍यांसोबत कंपनीने जोडले आहे. यातून दररोज आठ लाख लिटर दूध गोळा केले जाते. डेअरी फार्मिंगमुळे विविध चॉकलेट कंपन्यांना आम्ही चिझ पुरवतो. डॉमिनो पिझ्झासाठी पदार्थ पुरवतो. प्रभात डेअरी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देते. स्वच्छ दूध तयार करून दर्जेदार पदार्थ तयार करत असल्याची माहिती दिली.

यावेळी सह्याद्री फार्मर्सचे संचालक विलास शिंदे यांनी, शेतीला उद्योग म्हणून पाहणे गरजे आहे. शेतीपुढे अनेक संकटे आहेत. परंतु त्यातून बाहेर पडून शेतकर्‍यांनी जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या संधीचा शोध घ्यावा. उद्योग विभागाने शेतकरी उत्पादन कंपन्यांसाठी एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध करून देण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचा शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. परंतु ग्रामीण भागात शेतकर्‍यांना गावातच कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची मागणी केली.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.