अ. भुंगेरे
1. तांदळातील सोंडे / टोका
प्रौंढावस्थेतील सोंडकिडा साधारण 3-4 मि.मि. लांब असतो. त्याचा रंग गडद तपकिरी असतो. सोंडकिड्याचे डोके सोंडेसारखे पुढे असते म्हणून त्यास सोंडकिडा म्हणतात. पाठीवर चार पिवळसर ठिपके असतात. अळीच्या शरीरावर बारीक केस असतात. किडे पंखामुळे उडून जाऊ शकतात. सोंडकिड्याची मादी आपल्या तोंडाने दाण्याच्या एक टोकावर कोरून गोलाकार खड्डा करते व त्यात एक अंडे घालून तो खड्डा बुजवून टाकते. अंडे लांबट गोल व पांढर्या रंगाचे असते. मादी तिच्या आयुष्यामध्ये सर्वसाधारणपणे 300 ते 400 अंडी घालते. उन्हाळ्यात 4 दिवसात तर हिवाळ्यात 6 ते 9 दिवसांत अंडी उबतात. सोंड्याचे आयुष्य 2 ते 5 महिने असते. प्रौढावस्थेतील सोंडकिडे बियाण्याच्या पृष्ठभागावर लहान छिद्रे पाडतात तर त्यांच्या अळ्या धान्य पोखरतात व दाण्याचा आतील सर्व भाग खाऊन टाकतात. त्यामुळे वरचे कवच तेवढे शिल्लक राहते. अशा किडलेल्या बियाण्यात कोंडा होतो व वेळीच लक्ष न दिल्यास सर्व बियाणे किडून जाते. ही कडी गहू, ज्वारी, भात, मका वगैरे बियाण्यात आढळते.
2. धान्य पोखरणारा भुंगेरा
प्रौंढ भुंगेरा नाजूक, लांब आणि गडद तपकिरी रंगाचा असतो. पूर्ण वाढलेल्या भुंग्याची लांबी 4 मि.मि. असून पाठीचा भाग खडबडीत असतो. डोके खाली झुकलेले असते आणि वरून पाहिल्यास चटकन दिसत नाही. हा भुंगेरा अतिशय लहान असतो. बियाण्यात, गोदामाच्या भिंतीवर लहान असतो. बियाण्यात, गोदामाच्या भिंतीवर साठवणुकीतील पोत्यावर अशा ठिकाणी ही अंडी घातली जातात. या किडीची मादी तिच्या आयुष्यात 300 ते 500अंडी घालते. उन्हाळ्यात 5-6 दिवसात अंडी उबतात. परंतु हिवाळ्याच्या दिवसात त्यास जास्त वेळ लागतो. भुंगेर्याचा पूर्ण जीवनक्रम ऋतुमानानुसार कमी जास्त होत असतो. या किडीची अळी अवस्था साठवलेल्या बियाण्याचे नुकसान प्रौंढ अवस्थेबरोबरीने अथवा जास्त करते. या किडीचा प्रादुर्भाव शेतामध्येच सुरू होतो. उष्ण हवामानात या किडीची अळी व प्रौढ अवस्था फार मोठ्या प्रमाणात नुकसानकारक असते. गहू, ज्वारी, बाजरी वगैरे बियाणे खाऊन बियाणे पोकळ करते व फक्त बियाण्याच्या वरील कवच शिल्लक राहते.
3. कडधान्यातील भुंगेरा
तूर, हरभरा, मूग, चवळी इत्यादी कडधान्यात येणारा हा भुंगेरा कडधान्याचे अतोनात नुकसान करतो, म्हणून कडधान्याच्या साठवणुकीतील ही प्रमुख कीड आहे. पूर्ण वाढ झालेला भुंगेरा गडद चॉकलेटी रंगाचा, 4 ते 5 मि.मि. लांबीचा असून त्याचा आकार फुगीर व लांबट गोल असतो. वरून पाहिल्यास त्याच्या पाठीवर दोन पांढर्या रंगाचे ठिपके दिसतात. पोट चांगले फुगीर दिसते व पंख आखूड असल्यामुळे पोटाचे मागील टोक पंखातून चांगले दिसते. हा भुंगेरा दाण्यावरच अंडी घालतो. एक मादी जवळ जवळ 95 अंडी घालू शकते. अंड्याची अवस्था 4-5 दिवस राहतो. प्रौंढ भुंगेरा आपल्या पंखांचा उपयोग करून उडून जाऊ शकतो. प्रौढ भुंगेर्याचे जीवनमान साधारणत: 10 दिवसांचे असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी दाण्यात शिरते व आतला भाग पोखरून टाकते. अळीचा कोष दाण्यातच तयार होतो व प्रौढ भुंगेरा दाण्यात गोल छिद्र पाडून आतून बाहेर येतो. किडलेल्या बियाण्यावर गोल छिद्रे दिसतात व अंड्याचे पांढरट पिवळट रंगाचे ठिपके दिसतात. असे किडलेले बियाणे पेरणीयोग्य राहत नाही. ही कीड शेतात पीक काढणीपूर्वीच दाण्यात प्रवेश करते.
4. पिठातील तांबडा भुंगेरा :
या किडीचा प्रादुर्भाव पीठ, मैदा, रवा तसेच प्राथमिक / मुख्य किडीचे नुकसानी-नंतरच्या सर्व प्रकारच्या बियाण्यात आढळून येतो. प्रौढ भुंगेरा साधारण लांब, चपटा आणि गडद तांबूस रंगाचा किंवा तपकिरी रंगाचा असतो. हा भुंगेरा चपटा व गुळगुळीत असतो. भुंग्याची लांबी 3 मि.मि. व पूर्ण विकसित अळी 4-5 मि.मि. लांब असते. या किडीची मादी आपली अंडी बियाण्यांत अथवा पिठात घालते. अंडी थोडी ओलसर व चिकट असतात म्हणून त्यास पिठाचे कण चिकटून राहतात. अंडी पांढर्या रंगाची असतात. एक मादी जवळ जवळ 450 अंडी घालू शकते. अंडी 5 ते 12 दिवसात उबतात. अळीचे कोष होताना त्या सर्व पिठाचे पृष्ठभागावर येतात. ही कीड 1 ते 4 महिन्यात आपला जीवनक्रम पूर्ण करते. फुटलेले बियाणे किंवा पिठावर किडीची वाढ पूर्ण होते. अळ्या पिवळसर पांढर्या व तारेसारख्या दिसतात. त्यावरच बुरशी वाढून घाण वास येतो. त्यामुळे असे बियाणे वापरण्यास अयोग्य ठरते.
5. दातेरी भुंगेरा
ही कीड पीठ, तृणधान्ये, तेलबिया, सुकी फळे, बिस्किटे ह्यात प्रामुख्याने आढळते. बियाण्यामध्ये ओलावा राहिल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. प्रौंढ भुंगेरा साधारण 2 ते 5 मि.मि. लांब, चपटा व गडद तपकिरी रंगाचा असतो. छातीच्या पहिल्या खंडावर दोन्ही बाजूस करवतीसारखे दात असतात, म्हणून त्याचे नाव दातेरी भुंगेरा किंवा करवती कडा असलेला भुंगेरा असे पडले आहे. अळी चपळ, बारीक, पांढर्या रंगाची असते. ही कीड बाजरी, ज्वारी, तसेच इतर तृणधान्यांचे फुटके दाणे व पिठावर आपली उपजिविका करते. हे किड चपटे असल्यामुळे खाद्यपदार्थाच्या वेष्टनातही शिरू शकतात. मादी बियाण्यात अगर खाद्यपदार्थात अंडी घालते. एक मादी 275-300 अंडी घालू शकते. अंड्याची अवस्था 3 ते 15 दिवसत टिकते. अळी एक प्रकारच्या चिकट पदार्थाने अन्नाचे कण एकत्र करते व त्याचे घट्ट जाळे बनवते आणि या जाळ्यामध्ये कोषावस्थेत राहते. या किडीचे जीवनमान 6 ते 10 महिनेपर्यंत असते.
ब. पतंगवर्गीय किडी
1. धान्यातील पतंग
ही कीड उबदार हवामानात जास्त आढळते. किडीची अळी अवस्था नुकसानकारक असते. गहू, ज्वारी, भात, मका, तांदूळ इत्यादी बियाण्याचे अतोनात नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव शेतात बियाणे तयार होत असतानाच होतो. या किडीचा पतंग वाळलेल्या गवतासारखा फिकट पिवळ्या रंगाचा असतो. पंख अरूंद असतात व त्यांच्या कडांवर केस आढळतात. अळी पांढर्या रंगाची असते व तिचे डोके पिवळ्या रंगाचे असते. अंडी शेतात कणसे असताना त्यावर घातली जातात. मादी एका वेळी 400 पर्यंत अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडलेली अळी लगेच दाण्यात शिरते व तिचे सर्व जीवन दाण्यातच जाते. पतंग काही खात नाही व त्याचे आयुष्य काही दिवसाचे असते. बियाण्यात ही अळी चटकन लक्षात येत नाही त्यामुळे बीचे नुकसान झाल्यानंतरच या किडीचे पतंग दिसू लागतात. त्यानंतरच या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येतो. अशा वेळी किडलेल्या बियाण्यात छिद्रे दिसू लागतात.
2. तांदळातील सुरसा
ही कीड तांदूळ, ज्वारी, बाजरी इतर तृणधान्ये तसेच रवा, मैदा इत्यादी सारख्या अनेक पदार्थांत आढळते. सुरूवातीस लहान अळी फुटके दाणे व पीठ खाते. मोठी अळी अखंड दाण्यावर उपजिविका करते. अळी तोंडातून एक प्रकारचा चिकट पदार्थ काढून ती धान्याचे कण एकत्र जमवते व त्याचे जाळे तयार करून त्यात राहते. या जाळ्यांमुळे बरेचसे बियाणे वाया जाते. या किडीचा पतंग करड्या रंगाचा असतो. पतंग कोठाराच्या भिंतीवर, पोत्यात, पोत्यावर बसलेले आढळतात. या किडीची मादी धान्यावर, पोत्यावर तसेच कोठाराच्या भिंतीवर अंडी घालते. एक मादी एका वेळी साधारणत: 200 पर्यंत अंडी घालू शकते. अंडी साधारण 5 दिवसात उबतात. अळी आपला कोष जाळीमध्येच करते. पतंग बियाण्याचे नुकसान करत नाही.
3. गव्हातील सुरसा
धान्यातून अगर कोठारातील फटीतून मादी एकावेळी सुमारे 250 अंडी घालते. ती साधारण 4 ते 6 दिवसात उबतात. पतंग करड्या रंगाचा असतो. अळी पांढरट पिवळसर रंगाची असते. पतंग काही खात नाही व त्याचे आयुष्य काही दिवसांचे असते. अळी गव्हातील अंकुर खाते. त्यामुळे बियाण्याच्या रूजवण शक्तीवर त्याचा परिणाम होतो. अळी तोंडातून एक प्रकारचा चिकट पदार्थ बाहेर टाकते. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास या अळ्यांनी तयार केलेल्या चिकट पदार्थांचे एक प्रकारचे आवरण तयार होते; या आवरणामुळे पोती व कोठारातील जमीन झाकली जाते. अशा चिकट आवरणाखाली या आळ्या लपून राहतात.
किडीच्या नुकसानीच्या प्रकारानुसार वर्गीकरण
अ) प्राथमिक किडी : या किडी चांगले (निरोगी) बियाणे खातात. उदाहरणार्थ- सोंडे, भुंगेरे.
ब) दुय्यम किडी : या किडी फुटलेले किंवा प्राथमिक किडींनी खालेल्या बियाण्यावर उपजीविका करतात. उदाहरणार्थ – दातेरी भुंगेरे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.