बियाण्याच्या एखाद्या लॉटची उगवण क्षमता तपासण्यासाठी त्यांच्या प्रतीकात्मक नमुन्यातील कमीत कमी 400 बी तपासावे लागते. ज्या बियाण्याची उगवण क्षमता तपासावयाची आहे, त्यास कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे.
प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासण्यासाठी आवश्यक साहित्यामध्ये उगवण कक्ष हे मुख्य उपकरण आहे. यामध्ये बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्यक लागणारे तापमान आणि आर्द्रता राखता येते. तसेच बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद ‘टॉवेल पेपर’ वापरतात. या कागदामध्ये ओलावा राखला जातो, तसेच त्यावर बियाण्याची वाढ होऊ शकते.
उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती
1. शोषकागदामध्ये उगवण क्षमता पाहणे : लहान आकाराच्या बियाण्यांची उगवण क्षमता या पद्धतीने तपासली जाते. एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोषकागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून ओले करावे. पाणी जास्त झाले असेल तर ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे. त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. या प्लेट जर्मिनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवाव्यात किंवा चांगल्या प्रकारे आर्द्रता (70 टक्के पेक्षा जास्त) असलेल्या बंद खोलीत ठेवल्या तरी उगवण होण्यास ते पुरेसे होते.
2. टॉवेल पेपरमध्ये बियाणे ठेवून उगवण क्षमता तपासणे : ओल्या केलेल्या दोन टॉवेल पेपरमध्ये बी मोजून ठेवावे. असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेणकागद (वॅक्स पेपर) लावून जर्मिनेटरमध्ये ठेवावा. कागद बोटाने दाबला असता बोटाभोवती पाणी दिसू नये इतपतच कागद ओला असावा.
3. वाळूमध्ये उगवण क्षमता पाहणे : कुंडी किंवा ट्रेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत 1 ते 2 सें.मी. खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावे. बियांच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवतात. अशा कुंड्या जर्मिनेटर मध्ये उगवणीसाठी ठेवतात. बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे. त्यासाठी ओलावा योग्य प्रमाणातच ठेवावा. तसेच बियाण्यास आवश्यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारण 8-10 दिवसांत बियाण्याची उगवण होते.
उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण
1. साधारण किंवा चांगली रोपे
उगवण क्षमता चाचणीत 8-10 दिवसांत बियाणे उगवते. ज्या रोपांची चांगली वाढ झालेली असते आणि ज्यांची अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडामध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते, त्यांना साधारण किंवा चांगली रोपे असे संबोधले जाते.
तसेच रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते, मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर तंतुमुळे वाढलेली असतात, व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु थोडी मुळांची खुरटलेली वाढ अशी रोपे सुध्दा साधारण किंवा चांगल्या प्रकारात मोडतात. तसेच व्यवस्थित वाढलेला रोपांचा बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असला तरी अशी रोपेसुध्दा चांगल्या प्रकारात मोडतात.
2. असाधारण किंवा विकृत रोपे
दुसर्या प्रकाराची रोपे ही विकृत असतात आणि अशी रोपे अनुकूल परिस्थितीत सुध्दा व्यवस्थित वाढू शकत नाही. पूर्ण झाडामध्ये वाढ होण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्याच्या कोंब आणि मुळांना इजा पोहोचलेली असते. तसेच बियाण्यांशी निगडित असलेल्या बुरशी (उदाहरणार्थ, स्क्लेरोशिअम, फ्युजॅरिअम, मॅक्रोफोमिना) मुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात.
3. कठीण बी
तिसरा प्रकार न उगवलेल्या बियाण्याचा असतो. असे बी उगवणीला ठेवल्यानंतर 8-10 दिवसांत अजिबात उगवत नाहीत. यातील काही बियाण्यामध्ये पाण्याचे शोषण होत नाही. यांनाच कुचर किंवा कठीण बी म्हणतात.
4. मृत बी
काही बिया सुप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाही, काही बिया मेलेल्या असतात. पोकळ बियाणे, किडलेले बियाणे, गर्भ नसलेले बियाणे हे सर्व याच प्रकारात मोडतात.
अशा प्रकारे उगवलेल्या बियाण्यांची वर्गवारी करून साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियांची टक्केवारी काढतात. प्रत्येक पिकामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रमाणित केलेली आहे. बीजोत्पादित केलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता या प्रमाणकापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादन नापास होऊ शकते. ज्या बियाण्याची उगवण क्षमता प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त आहे, असेच बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवणीच्या टक्केवारीमध्ये 10 टक्केपर्यंत कमी उगवण असल्यास एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा 10 टक्के जास्त बियाणे वापरावे. परंतु त्यापेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास असे बियाणे वापरू नये.
शेतकर्यांना जे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे आहे, अशा बियाण्यांचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी बीज प्रयोगशाळा, कृषी विद्यालये यांच्याशी संपर्क साधून वापरण्यात येणार्या बियाण्याची उगवण शक्ती तपासून घ्यावी. किंवा घरच्या घरी ओल्या पोत्यामध्ये, वाळू, शोष कागदामध्ये उगवण परीक्षा घेऊन बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहावी. ज्या बियाण्याची उगवण क्षमता प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त आहे, असेच बियाणे पेरणीसाठी वापरावे. अशा प्रकारे एकरी अपेक्षित रोपांची संख्या राखण्यात मदत होते आणि उत्पादनात वाढ होऊन पर्यायाने फायदा होतो.