गुलाबापासून तयार करा गुलकंद
गुलकंद हा वेगवेगळ्या जातीच्या गुलाब पाकळ्यांपासून तयार केला जातो. गुलकंद हा चवीसाठी वापरला जातो. गुलकंदामध्ये ग्लुकोज आणि जीवनसत्त्वे उपलब्ध असतात. ऊर्जा आणि चांगल्या आरोग्यासाठी गुलकंदाचा आहारात वापर होणे आवश्यक आहे.
गुलाबशेती करणाऱ्यांसाठी; तसेच महिला बचत गटांसाठीही गुलकंदनिर्मिती हा चांगला जोडधंदा आहे. गुलाब फुलांचा उपयोग हार बनविण्यासाठी होतोच, त्याच बरोबरीने गुलकंद, गुलाबपाणी, अत्तर, गुलाब तेल, उदबत्ती बनविण्यासाठी केला जातो. गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. याचबरोबरीने एव्हान, क्रिमझन ग्लोरी हार्ट थ्रॉब, ब्ल्यू मून, मॉन्टेझुमा, हैद्राबादी गुलाब या सुवासिक फुलांच्या जाती आहेत.
गुलकंद तयार करण्याची पद्धत – घरगुती पद्धतीने गुलकंद तयार करता येतो. यासाठी गुलाब फुले ही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेली नसावीत. देशी गुलाब जातींच्या बरोबरीने हायब्रीड जातीसुद्धा गुलकंद तयार करण्यासाठी उपयोगात आणता येतात.
साहित्य – गुलाब पाकळ्या – एक किलो
बारीक केलेली साखर – एक किलो
जंतुरहित स्वच्छ कोरडे असलेले मोठ्या तोंडाचे भांडे
१) समप्रमाणात गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर मिसळून घ्यावी. अशा पद्धतीने गुलाब पाकळ्या आणि साखर मिसळून एक इंच जाडीचे थर भांडे पूर्ण भरेपर्यंत ठेवावेत.
२) भांड्याचे झाकण लावून भांडे सूर्यप्रकाशात ठेवावे. सायंकाळी ते सावलीत ठेवावे. प्रत्येक दिवशी भांडे सूर्यप्रकाशात ठेवून सायंकाळी ते सावलीत ठेवावे.
३) दिवसातून एकदा हे मिश्रण खाली-वर ढवळून घ्यावे. ही पद्धत एक आठवडाभर करावी.
४) यानंतर गुलाब पाकळ्या आणि साखर एकजीव होऊन त्याचे गुलकंदामध्ये रूपांतर होते, त्याला गडद लाल रंग येतो.
५) सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे गुलाबाच्या पाकळ्या साखरेच्या पाकात विघटित होतात. गुलकंदाचा दर्जा त्याला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या उष्णतेवर अवलंबून असतो.
६) तयार झालेला गुलकंद वेगवेगळ्या पाऊचमध्ये पॅकिंग करावा.
गुलकंदाचे फायदे – १) आरोग्यासाठी शीतदायी आणि उष्णतेच्या समस्येवर इलाज म्हणून उपयुक्त.
२) शरीरावर येणारा ताण, वेदना, तसेच पोटामध्ये होणारी जळजळ यावर उपयुक्त.
३) तोंड आणि दातांचे आरोग्य राखण्यासाठी, डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त.
४) हृदय, यकृत, चेता संस्था, पचन संस्थेसाठी गुलकंद फायदेशीर. गुलकंद पित्तनाशक आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
[…] गुलाबापासून तयार करा गुलकंद […]
[…] गुलाबापासून तयार करा गुलकंद […]
[…] गुलाबापासून तयार करा गुलकंद […]