सीताफळ लागवडीचा केला निर्धार
जालना
नल बालानगर सीताफळ लागवडीच्या माध्यमातून राज्याच्या नऊ जिल्ह्यात जाऊन पोहचलेल्या ग्रोव्हिजन गटशेती संघाची मुहूर्तमेढ आता जाफराबाद तालुक्यातील डोलखेड खुर्दच्या ग्रामस्थांनीही रोवली असून येत्या 11 जुलै रोजी गाव शिवारात मोठ्या प्रमाणात नल बालानगर सीताफळ लागवडीचा त्यांनी निर्धार केला आहे.
ग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र बुधवार दि.9 जानेवारी रोजी डोलखेडा बुद्रुक येथे पार पडले यावेळी उपस्थित गावकर्यांनी हा नल बालानगर सीताफळ लागवडीचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी झालेल्या नियमित मासिक चर्चासत्र कार्यक्रमाला फळ संशोधन केंद्र हिमायतबाग औरंगाबादचे प्रमुख डॉ.एम.बी.पाटील, तालुका कृषि अधिकारी शेरान टी. पठान, सेंद्रिय शेती सल्लागार विजय म्हेत्रे यांची उपस्थिती होती.
ग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे पाटील यांनी गटशेती, शासकीय मदत व विक्री व्यवस्थापनाचे महत्त्व विषद केले. डॉ.एम.बी.पाटील यांनी तंत्रशुद्ध फळबाग लागवडीचे महत्त्व सांगितले तर म्हेत्रे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. ग्रोव्हिजन गटशेती संघाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून अधिक – अधिक शेतकर्यांनी ग्रोव्हिजन गटशेती संघात सामिल झालं पाहिजे. या शेतकर्यांना शासन स्तरावर कुठलीही अडचण येणार नाही अशी ग्वाही देत तालुका कृषि अधिकारी शेरान पठान यांनी शासनाच्या विविध कृषि योजनांची माहिती दिली.
पत्रकारांचा केला सन्मान
यावेळी झालेल्या कार्यक्रमास उपस्थित पत्रकार सर्वश्री.रावसाहेब अंभोरे, विष्णु मगर, अशोक पाबळे, फकरू कुरेशी, साबेर शेख, प्रताप नवले, दिनेश जाधव, शिवहरी डोईफोडे यांना ग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला शिवारफेरी करण्यात आली.शिवारफेरित शेतकर्यांना झाडाच्या शास्त्रशुध्द कटींगचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले