गुन्हे मागे घेण्यासाठी रास्ता रोको
बीड / प्रतिनिधी
अंथरवण पिंप्री येथे अज्ञात रोगाने दगावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अंथरवण पिंप्रीसह परिसरातील शेतकर्यांनी बीड-पिंपळनेर रस्त्यावर अंथरवणपिंप्री तांडा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी दोषी पशुसंवर्धन अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करत न्याय-हक्काच्या मागण्यांसाठी निवेदन देणार्या शेतकर्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी उपस्थित आंदोलक शेतकर्यांनी केली.
गेल्या आठवड्यात बीड तालुक्यातील अंथरवण पिंप्री येथील शेतकर्यांच्या गोठ्यातील गाई, म्हशी, बैल, शेळ्या, अज्ञात रोगाने बाधीत होऊन दगावल्या आहेत. सुमारे ऐंशीपेक्षा जास्त जनावरे दगावले आहेत. यात शेळ्या-मेंढयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रकरणी अद्यापही जनावरे कशामुळे दगावली हे प्रशासनास सांगता आले नाही. जनावरांच्या मालकांना अद्याप शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. या परिसरातील शेतकर्यांनी आज अंथरवणपिंप्री तांडा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
पशूसवर्ंधन अधिकार्यांनी आणि पशूवैद्यकीय अधिकार्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर भर दुष्काळात शेतकर्यांची जनावरे मृत्युमुखी पडले नसते. त्यामुळे दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी उपस्थित शेतकर्यांनी केली.
तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोला परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. यामध्ये दिनेश पवार, अशोक शिंदे, बाळासाहेब पवार, पंडित वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, पोमा राठोड, रुस्तुम शिंदे, मोतीराम प्रभाळे, राजेंद्र प्रभाळे, भाऊसाहेब प्रभाळे, राजेंद्र आमटे, तुकाराम शिंदे, सुभाष गिराम, रमेश शिंदे, माऊली शिंदे, कचरू जाधव, बबन वाघमारे, शामसुंदर शिंदे, अरुण शिंदे, बाळु पवार, बाळासाहेब शिंदे, भाऊराव प्रभाळे, चंद्रसेन शिंदे, शिवाजी परसकर, विक्रम शिंदे, अनिल शिंदे, धोंडीराम शिंदे, मोहन शिंदे, विक्रम साळुंके, जालिंदर साळुंके यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.