मत्स्यशेतीसाठी – उपकरणे

0

पाण्यासाठी मोटार पंप
मत्स्यसंवर्धन तलाव बांधताना तलावात गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने पाणी घेता येईल, अशी जागा निवडावी, जेणेकरून तलाव भरण्यासाठी किंवा तलावातील पाणी काढण्यासाठी पंपाची गरज भासणार नाही; परंतु अशी जागा उपलब्ध न झाल्यास संवर्धन तलाव भरण्याकरिता पंपाची आवश्‍यकता असते. हा पंप योग्य क्षमतेचा असावा. पंपाने पाणी आत घेताना वेगवेगळ्या जाळ्यांद्वारा गाळूनच पाण्याचा पुरवठा करावा. शक्‍य झाल्यास एक अतिरिक्त पंपाची व्यवस्था असावी.

पाण्यासाठी मोटारपंप हे प्रोपेलर व सेंट्रिफ्युगल या दोन प्रकारचे असतात. पाण्याच्या स्रोताची जिथे पाण्याची खोली दहा मीटरपेक्षा कमी व पाण्याचा प्रवाह मोठा असेल, अशा ठिकाणी प्रोपेलर पंपाचा वापर करावा. पंप जास्त क्षमतेचा असावा. पाणी खेचण्यासाठी असलेली पाइपलाइन ही जेवढी कमी करता येईल तेवढी चांगली, त्यामुळे खर्च तर कमी होईलच; परंतु पंपाचा पाणी खेचण्यासाठी लागणारा ताणही कमी होईल, परिणामी पंपाची कार्यक्षमता व आयुष्यमान देखील वाढण्यास मदत होईल. तलावाला सुरळीत व योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल अशी पाइपलाइन असावी. जर पाइपलाइन डोंगर उतारावरून किंवा खडकाळ भागातून येत असेल, तर वापरलेला पाइप योग्य जाडीचा व मजबूत असावा, जेणेकरून पाणी त्या पाइपमधून ठिबकणार नाही.

जनरेटर
मत्स्यसंवर्धन प्रकल्पाचा नियमित वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची आवश्‍यकता भासते. यासाठी संपूर्ण मत्स्यसंवर्धन प्रकल्पाला सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी योग्य क्षमतेच्या जनरेटरची व्यवस्था करावी.

एरिएटर्स
इतर सजीवांप्रमाणेच माशांनाही जगण्यासाठी प्राणवायूची आवश्‍यकता असते म्हणूनच तलावात योग्य प्रमाणात प्राणवायू असावा. काही कारणास्तव प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यास माशांची मरतूक होते. संवर्धन तलावात प्राणवायूचे प्रमाण योग्य राखण्यासाठी एरिएटर्सचा वापर करावा. मत्स्यशेतीमध्ये ग्रॅव्हिटी एरिएटर्स, सरफेस एरिएटर्स आणि सब-सरफेस एरिएटर्स वापरतात. आपल्याकडे पॅडल व्हील एरिएटर्स तलावात प्रामुख्याने वापरतात.

पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी लागणारी उपकरणे
पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण पारंपरिक टायट्रेशन पद्धतीने काढता येते, तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या डी.ओ. किटचा वापर करावा. पाण्याचा सामू तपासण्याकरिता पी.एच. मीटर, पी.एच. इंडिकेटर किंवा पी.एच. पेपरचा वापर करावा. पाण्याचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर असावा. पाण्याची पारदर्शकता मोजण्यासाठी सेची डिस्क असावी.

खाद्य निर्मिती यंत्र
मत्स्यसंवर्धन करताना जास्तीत जास्त खर्च खाद्यावर होत असतो, परिणामी मत्स्यसंवर्धन खर्च वाढतो. खाद्यावरील खर्च कमी केल्यास मत्स्यशेतीतील खर्च कमी होऊ शकतो. प्रकल्पाच्या ठिकाणी खाद्य निर्मिती यंत्राच्या साह्याने कमी वेळेत आवश्‍यक त्या उच्च दर्जाचे खाद्य तयार करता येते.

तलावात खाद्य पुरविणारे यंत्र
संवर्धन तलावातील माशांची वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाद्य देणे आवश्‍यक आहे. साध्या पद्धतीने खाद्य पुरविणाऱ्या यंत्रापासून ते अत्याधुनिक पद्धतीने खाद्य पुरविणारी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. अत्याधुनिक पद्धतीने खाद्य पुरविणाऱ्या यंत्रात खाद्य साठवणूक करता येते. हे यंत्र जेवढी आवश्‍यकता असेल तेवढेच खाद्य तलावात सोडते. परंपरागत वापरण्यात येणाऱ्या यंत्रात खाद्य साठवून ठेवता येत नाही, जेव्हा आवश्‍यक असेल तेव्हा खाद्य गोदामापासून यंत्रापर्यंत पोचवावे लागते.

चेक ट्रे/फीड ट्रे
तलावातील मासे खाद्य व्यवस्थितपणे खातात की नाही याची तपासणी तलावात चेक ट्रे ठेवून करावी. चेक ट्रे मधील निरीक्षणावरून खाद्याचे प्रमाण कमी-जास्त करावे. चेक ट्रे गोलाकार तसेच चौकोनी आकाराचे असतात.

माशांची वाढ मोजणे व नोंदी ठेवणे
संवर्धन काळात माशांची वाढ योग्य प्रमाणात होते की नाही ते तपासून पाहावे. यासाठी वजनकाटा, फूटपट्टी, पाग जाळे, बादली इ.ची आवश्‍यकता असते; तसेच वाढीची नोंद ठेवण्यासाठी नोंदवही असावी.

मासे काढण्यासाठी लागणारी जाळी
तलावातील मासे काढण्यासाठी सुयोग्य आकाराची व आसाची जाळी वापरावी. जाळ्यांमुळे पकडलेल्या माशांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.