कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर द्यावा

0

– उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
मुंबईः
आजही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. कारण सुमारे 60 टक्के लोकसंख्येच्या रोजगाराचा प्राथमिक स्त्रोत शेती आहे. त्यामुळे देशात येणारी गुंतवणूक आणि उद्योगांचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.
सीआयआय या औद्योगिक संस्थाचे ‘न्यू इंडिया रायजिंग ग्लोबल ओकेशन्स’ चे आज मुंबई येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेला राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थीत होते.
नायडू पुढे म्हणाले, कृषी क्षेत्राला फायदेशीर आणि टिकाऊ बनविणे आवश्यक आहे. यासाठी कुक्कुट, बागकाम आणि मासेमारीसारख्या पुरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कृषीसह कृषीमालाचे मुल्यवर्धन आणि अन्न प्रक्रीया उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे. याशिवाय संशोधनावर लक्ष केंद्रीत करून देशातील सुरक्षित अन्न उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.
जागतिक स्तरावर मंदीचे वातवरण असतानाही भारतात लागू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणासाठीच्या धोरणांमुळे देश हे गुंतवणूकीसाठी सगळ्या जगाचे आकर्षण केंद्र बनले आहे. यास उद्योग संस्थांचा प्रतिसाद मिळाल्याने अर्थव्यवस्थेला स्थिरता आली आहे. सगळ्यात वेगवान अशा अर्थव्यवस्थेपैकी एक अशी वेगळी अर्थव्यवस्था आपल्या देशाची आहे. 3 ट्रिलीयन डॉलर इकॉनामीपर्यंतचा पल्ला आपण गाठला आहे, येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचे आकार 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचेल अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली. जागतिक बँकेने दिलेल्या अंदाजानुसार भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील. चालू आर्थिक वर्षात जीडीपी 7.3 टक्के आणि पुढील दोन वर्षांत 7.5 टक्क्यांवर येण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने घेतलेल्या विविध पुढाकार आणि सुधारणांच्या पार्श्‍वभूमीवर, भारत जगातील गुंतवणूकीसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे. यूबीएसच्या एका अहवालानुसार, पुढील 5 वर्षांत देशात वार्षिक परकीय गुंतवणूकीचा प्रवाह 75 अब्ज डॉलर्स होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी अत्यंत अनुकूल वातावारण आहे. कृषी विकासाचे ध्येय ठेऊन कृषी निर्यातीवर भर देण्यात येत आहे. याशिवाय देशाने येत्या काही वर्षात 100 बिलीयन डॉलर्सची परकीय गुंतवणूक आणण्याचे ध्येय निश्‍चित केले आहे, असे सांगतानाच इज ऑफ डुईंग बिजनेससाठी देश किंवा राज्य घटक न मानता जिल्हा हा महत्त्वाचा घटक मानून नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यांचा विकास करून पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरकडे वाटचाल सुरु आहे, असे केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

 

 

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.