खडकाळ जमीनीवर फुलवली पेरूची बाग

0

तीन लाखांचे उत्पन्‍न
संजय गुप्‍ता / पिंपळगाव रेणुकाई
इतर शेतकर्‍यांकडे बागायत जमीन असूनही ते दुष्काळाने हतबल झाले आहेत. मात्र भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील एका शेतकर्‍याने आपल्या खडकाळ जमीनीवर पाण्याचे योग्य नियोजन करून चार एकरात पेरूची बाग फुलवली आहे. भर दुष्काळात पेरू विक्रीतून त्यांनी आतापर्यंत 3 लाख रूपयांचे उत्पन्‍न मिळवले आहे. आणखी दोन ते तीन लाख रूपयाचे उत्पन्‍न या पेरूच्या बागेतून मिळण्याची अपेक्षा शेतकर्‍याला आहे.
तालुक्यातील अवघडराव सावंगी हे गाव तीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावशिवारात बरेच जमिनेचे क्षेत्रफळ खडकाळ आहे. सहा वर्षांपासून परिसरातील शेतकरी अत्यल्प पर्जन्यमानामुळे खंगत चालला असतानाच येथील अंबादास साळूबा तेलंग्रे यांनी आपल्या मामाच्या फळबाग शेतीतून प्रेरणा घेतली आणि पारंपारिक शेतीला फाटा देत फळबाग करण्याचा निर्णय घेतला. आपली शेती खडकाळ असल्याने पाण्याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी शेतात विहीर खोदली. विहिरीच्या आधारे त्यांनी 4 एकरात 750 पेरूच्या झाडांची लागवाड केली. मात्र विहिरींचे पाणी फळबागेला पुरत नसल्याने ती जगविण्यासाठी त्यांनी कृषी खात्याच्या सहकार्याने 2013 मध्ये शेतात शेततळे खोदले. आज या शेततळ्याच्या माध्यमातून अंबादास तेलंग्रे ठिबक सिंचनाद्वारे फळबागेला पाणी देऊन बाग जिवंत ठेवली आहे. चार भावांच्या एकत्रित कुंटुबासह ते फळबागेत स्वतः राबतात. फळांची प्रतवारी करून स्वतः त्याची मार्केटींग बाजारपेठत करतात. दोन महिन्यांपासून पेरू तोडणीला त्यांनी सुरूवात केली आहे. पेरुचे दररोज 70 ते 80 कॅरेट निघत आहेत. ते अकोला, सूरत, यवतमाळ, औरंगाबाद आदी बाजारपेठत स्वतः नेऊन विकतात.

बाजारपेठत पाचशे ते सहाशे रूपये कॅरेटप्रमाणे भाव मिळत आहे. आतापर्यंत त्यांनी खर्चवजा 3 लाख रूपयांचे उत्पन्‍न मिळविले आहे. आणखी दोन ते तीन लाख रूपयाचे उत्पन्‍न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. पेरूसोबतच या शेतकर्‍याने एक एकर शिताफळ, 375 पपईची झाडे, जांभूळ 50 या सोबतच या बागेत आंतरपीक देखील ते घेत ात. सध्या दुष्काळाने धास्तावलेल्या शेतकर्‍यांना अंबादास तेलंग्रे हा शेतकरी प्रेयणादायी ठरत असून परिसरातील अनेक शेतकरी त्यांची फळबाग पाहण्यासाठी येत आहेत.

चौकट
दुष्काळामुळे पन्‍नास टक्के फटका
यावर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने फळबागेस योग्य वातावरण नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पाण्याअभावी फळे गळून पडत आहेत. पेरू विक्रीतून 6 लाख रूपयांचे उत्पन्‍न अपेक्षित असून 3 लाख रूपयाचे उत्पन्‍न मिळाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्केच उत्पन्‍न झाले आहे.
-अंबादास तेलंग्रे,
शेतकरी, अवघडराव सावंगी.

चौकट
मामाकडून घेतली प्रेरणा
अवघडराव सांवगी येथील प्रगत शेतकरी हरिभाऊ भुते हे अंबादास तेलंग्रे यांचे मामा असून त्यांच्या प्रगत फळबाग शेतीतून प्रेरणा घेऊन त्यांनी आपली स्वतःची फळबाग नावारूपाला आणली आहे. आज हरिभाऊ भुते सोबतच अंबादास तेलंग्रे यांच्या फळबागेचा अभ्यास करण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.