मत्स्य शेती करण्यासाठी तलावाची निवड करताना सगळ्यात महत्वाचा पैलू म्हणजे मातीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असली पाहिजे. जिथे तलाव बांधायचा आहे, तिथे पाणी सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच तलावाची जागा ही पुराचे पाणी सहज येणार नाही, अशा ठिकाणी असावी.
मत्स्य बीज रोपणापूर्वी आणि मत्स्य बीज टाकल्यानंतर अशा दोन्ही टप्प्यांमध्ये तलावाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तलावाचे व्यवस्थापन करताना खालील महत्वाच्या पैलूंवर लक्ष देणे गरजेचे आहे.
तलावाची निर्मिती झाल्यावर तलावात पाण्याचा साठा भरणे हा पहिला टप्पा आहे. यानंतर तलाव क्षेत्रातील तण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. याचबरोबर रोगग्रस्त मासे तसेच माशांचे अवशेष मनुष्यबळ, यांत्रिकी तसेंच आवश्यक असल्यास रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणे गरजेचे आहे. विविध पद्धतीने हे करता येणे शक्य आहे. मनुष्यबळ किंवा यांत्रिकी किंवा गरज पडल्यास रासायनिक पद्धतीचा अवलंब करून तण नियंत्रण करून घ्यावे. पाण्यातील नको असलेले मासे किंवा इतर जीव जाळ्यांच्या मदतीने बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावावी. सूर्यप्रकाशात तलावाची जागा सुकवावी. मातीत आम्ल किंवा अल्कलीचा अंश जास्त असेल तर लिंबोळीच्या मदतीने मातीचा सामू स्थिर करता येऊ शकतो.
तलावामध्ये खत व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते. कारण यावरच माश्यांसाठी अवश्यक अशा विविध वनस्पतींची वाढ अवलंबून ठरते. तलावातील मातीचा सामू लक्षात घेतल्यानंतर सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा योग्य वापर करून खत व्यवस्थापन करणे फायद्याचे ठरते. तलावातील माश्यांचे आकारमान, उपलब्ध अन्न घटक इत्यादींचा सखोल अभ्यास करून खत व्यवस्थापन केल्यास निश्चित फायदा शक्य आहे. खत व्यवस्थापनानंतर 15 दिवसांनी तलावात मत्स्य संवर्धन करता येऊ शकते. यासाठी साधारण 10 से. मी. आकाराचे छोटे मासे प्रति हेक्टरी 5000 याप्रमाणे संवर्धनासाठी तलावात सोडावेत. बाजारात उपलब्ध असलेल्या मत्स्य बीजांच्या प्रजाती तसेच भौगोलिक आणि वातावरणीय स्थिती यांचा विचार करता 3-4 किंवा 6 प्रकारच्या माश्यांचे एकत्र संवर्धन करता येणे शक्य आहे.
तलावात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक खाद्यांबरोबरच माशांना अतिरिक्त पूरक खाद्य देणे गरजेचे असते. माश्यांना पेंडा आणि कोंडा यांचा संमिश्र वापर करून दिवसात ठराविक वेळेत द्यावे. बांबूच्या ट्रेच्या सहाय्याने अशाप्रकारे माशांना अतिरिक्त पूरक खाद्य देता येऊ शकते किंवा तलावाच्या कोपर्यामध्ये हे पूरक अन्न पसरवून ठेवल्यास मासे हे अन्न ग्रहण करू शकतात. पहिल्या वर्षाच्या शेवटी माशांची काढणी केली जाते, कारण एवढ्या कालावधीत माशांची अपेक्षित वाढ झालेली असते. जाळ्यांच्या सहाय्याने माशांची काढणी करता येणे शक्य आहे. पहिल्या वर्षी माशांची काढणी झाल्यानंतर तलावात उपलब्ध असलेल्या माशांबरोबर नव्याने छोट्या माशांचे मत्स्य संवर्धन केले असता, अधिक प्रमाणात माशांची पैदावार होते. योग्य नियोजनाच्या साहाय्याने अशा प्रकारे मत्स्य पालन व्यवसायाचा विस्तार करता येणे शक्य आहे
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.