फर्टिगेशनचे फायदे :
१) फर्टिगेशनमुळे खते ही पिकांच्या मुळाजवळ ठिबक सिंचनामधून पाण्याबरोबर सर्व झाडांना समप्रमाणात देता येतात.
२) विद्राव्य खते १०० टक्के पाण्यात विरघळणारी असल्यामुळे खते दिल्यानंतर पिकास अन्नद्रव्ये लगेच उपलब्ध होतात.
३) पिकांना पाणी आणि अन्नद्रव्ये नियमित पुरविल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. (२० ते ४० टक्क्यांपर्यंत)
४) विद्राव्य खते पिकांच्या गरजेनुसार किंवा पिकांच्या अवस्थेनुसार दररोज किंवा एक दिवसाआड अथवा आठवड्यातून एकदा देता येतात.
५) पीक लवकर तयार होते. मजुरांचा खर्च वाचतो. वेळेची बचत होते.
६) विद्राव्य खते जमिनीतून निचऱ्याद्वारे वाहून जात नाहीत किंवा साठून राहत नाहीत.
७) हलक्या प्रकारच्या जमिनीत पिक घेता येते.
८) विद्राव्य खते आम्लधर्मीय असल्यामुळे, ठिबक संचामध्ये आपोआप रासायनिक प्रक्रिया होते. ठिबक संचात क्षार तयार होत नाहीत. ड्रीपर्स बंद पडत नाहीत. तसेच जमिनीचा सामू नियंत्रण करण्यास मदत होते.
९) विद्राव्य खते सौम्य द्रावणातून दिली जात असल्यामुळे मुळांवर अनिष्ट परिणाम होत नाही.
१०) विद्राव्य खते वापरल्यामुळे खतांच्या मात्रेत २५ टक्के बचत होते.
११) विद्राव्य खतामध्ये सोडियम व क्लोरीनचे प्रमाण अत्यल्प असते.
१२) विद्राव्य खते फवारणीसाठी वापरता येऊ शकतात.
१३) विद्राव्य खतांच्या वापरामुळे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन मिळते.
विद्राव्य खते घन स्वरुपात उपलब्ध आहेत. ती एक किलो, २५ किलो व ५० किलो बॅगमध्ये उपलब्ध आहेत. काही विद्राव्य खतांमध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ठिबक संचातून लोह, जस्त तांबे, मंगल याचा उपयोग करता येतो, बऱ्याच वेळा लोह, जस्त, तांबे, मंगल याचा पाण्यातील क्षाराबरोबर साका तयार होऊन ती ठिबक संचामध्ये अडकून राहतात. त्याकरिता शक्यतो चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा.