सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा हे गाव औरंगाबाद-जळगाव महामार्गावर असून या गावात बहुतांश शेतकरी कापूस, मक्का, तूर, मूग यांसारखी पारंपारिक पिके घेतात. परिसरात पुरेसे पाऊस-पाणी नसल्याने शेतकर्यांना जेमतेम उत्पन्न मिळते. मात्र गावातीलच योगेश वाणी या शेतकर्याने पारंपारिक शेतीसोबतच भाजीपाला उत्पादनाचा प्रयोग ठिबक सिंचनाच्या मदतीने राबविला. यासाठी वाणी यांनी धाडस करत केवळ अर्धा एकर क्षेत्रातच भेंडीची लागवड केली. आणि आश्चर्य त्यांचा हा धाडशी प्रयोग त्यांच्या प्रगतीचा, उन्नतीचा मार्ग ठरला. त्यांना या भेंडीतून 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पारंपारिक पिकांना खर्च जास्त येता आणि उत्पन्न कमी होते. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कमी खर्चाच्या भाजीपाला उत्पादनाकडे काही शेतकरी वळत असल्याचे सद्या चित्र आहे. अनेक शेतकरी आत्मविश्वासाने भाजीपाला उत्पादनातून स्वयंपूर्ण झाले आहेत.
चिंचखेडा येथे योगेश वाणी हे सुध्दा पारंपरिकच शेती करायचे. मात्र त्यांनी थोड्याफार प्रमाणात शेतिविषयी अभ्यास करून भाजीपाला पिकांची माहिती करुन घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या अर्धा एकर शेतात भेंडीचेे पीक घेण्याचे ठरविले. 27 एप्रिल 2018 रोजी त्यांनी भेंडीची लागवड केली.
मात्र अपुर्या पावसामुळे भेंडीला फटका बसणार असतानाच त्यांनी शेतात परिश्रमाने भेंडीचे पीक उभे केले. त्यांनी थोडा फार खर्च केला. खते, औषधी आणि ठिबक, तुषार सिंचनाच्या वापरामुळे त्यांच्या शेतात भेंडीचे पीक बहरले. त्यानंतर दर दोन दिवसांनी 70 ते 80 किलो भेंडीचे उत्पादन निघत होते. अद्यापही भेंडीचे पीक घेतले जात आहे. भवन व सिल्लोड येथील बाजारपेठेत त्यांच्या भेंडीला 30 ते 40 रुपये प्रती किलो भाव मिळाल्याने केवळ अर्धा एकरात 70 हजार रुपयांचे भेंडीचे उत्पादन झाले.
अर्धा एकरात 20 हजार रुपये खर्च जाता 40 हजार रुपयाचे निव्वळ उत्पन्न त्यांना शिल्लक राहिले आहे. योगेश वाणी यांनी पारंपारिक पिकांना फाटा देत भेंडी, वांगे, कारले, मिरची, वाल, दोडका, मेथी या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. पूर्वी पारंपरिक पिकांना रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर केल्यानंतरही पदरी निराशाच येत होती. मात्र भाजीपाल्याच्या पिकाची शेती शेतकर्यांच्या फायद्याची ठरू लागली आहे.
पाणी, मेहनतीची झाली बचत ठिबकमुळे पाण्याची बचत तर झालीच शिवाय तासनतास उभे राहून पाणी देण्याची गरज राहिली नाही. ठिबकमुळे भेंडीला दिवसातून अर्धा तास पाणीपुरवठा केला तरी पुरेसा ठरतो. मल्चिंग पेपर आणि ठिबकमुळे पाणीवापरात सुमारे 75 टक्के बचत होते. तसेच मनुष्यबळाच्या कमतरतेवर मात करता आली. शारीरिक कष्ट कमी झाले. दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये औषधांचे मिश्रण तयार करून पाइपच्या माध्यमातून ड्रचिंग लावून पंपाने पिकाला थेट फवारणी करता येते. त्यासाठी पंपाचे ओझे पाठीवर लादण्याची गरज राहिली नाही. याआधी हातपंपाने औषधफवारणी करावी लागत होती. त्यासाठी किमान दोन मजूर लागायचे. तसेच ही बाब वेळखाऊ आणि खर्चिक होती. मात्र, ड्रचिंग आणि चाईना पंपाने या सगळ्याच समस्येवर मात केली आहे.
भाजीपाला पिकांना सुरुवात केल्यानंतर मला कुणाकडेही हात पसरण्याची गरज राहिली नसून मी माझ्या शेतातील रासायनिक खताचे प्रमाण कमी केले. शेणखताचे प्रमाण अधिक केल्याने आरोग्यासाठी चांगल्या शेतमालाची निर्मिती माझ्या हातून होत आहे.
योगेश वाणी,
भेंडी उत्पादक शेतकरी
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.