सेंद्रीय शेती संशोधनात शेतकर्‍यांचा सहभाग आवश्यक

0

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर
लातूर/प्रतिनिधी
सेंद्रीय शेती ही व्यापक संकल्पना असून यामध्ये शास्त्रीय बाब पडताळून पाहणे आणि अचूक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. शेतकरी आज सेंद्रीय शेती विविध पध्दतीने करित असून त्या पध्दतींचा शास्त्रीय अभ्यास करावा लागेल. सेंद्रीय शेती संशोधन कार्यात शेतकर्‍यांचे अनुभव व सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या मराठवाडयातील शेतकर्‍यांकरिता जिल्हानिहाय दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या श्रृंखलेमधील लातूर जिल्हयासाठीचा सेंद्रीय शेती प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून दिनांक 9 जानेवारी रोजी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रगतशील शेतकरी अभिनय दुधगांवकर, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. जी. के. लोंढे, पशुशक्तीचा योग्य वापर योजनाच्या प्रभारी अधिकारी श्रीमती डॉ. एस. एन. सोळंकी, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, सेंद्रीय प्रमाणीकरण तज्ञ हर्षल जैन, डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर पुढे म्हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास अनन्य साधारण महत्व असून यासाठी जिल्हानिहाय गट तयार करुन प्रमाणीकरणासाठी प्रयत्न करता येतील. गटाच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीमध्ये तंत्रज्ञान आत्मसात करुन बाजारपेठ व्यवस्थापन यशस्वीपणे करता येईल. सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण ही एक दीर्घकालीन प्रक्रीया असून शेतकरी, शाश्‍वत व विस्तारक यांच्यात कायम संवाद होणे आवश्यक आहे. चारापिकांचे तंत्रज्ञान, मृद-विज्ञान तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पध्दती असे अनेक उपक्रम शेतकर्‍यांना उपयोगी पडणार आहेत. कमी खर्चाचे तंत्रज्ञान आणि स्वत:च्या निविष्ठा स्वत: तयार केल्यास कमी खर्चात जमिनीचे आरोग्य राखण्यास आणि उत्पादन व उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. अपरंपरागत शेती पध्दतीची जोड देवून सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल. बाजारपेठेचा व बाजारभावाचा प्रश्‍न शेतकरी एकत्र येवून सोडवू शकतात, यासाठी शेती पध्दतीत बदल केल्यास बाजार व्यवस्थापनामध्ये येणार्‍या अडचणींवर मात करता येईल. शेवगा, कडीपत्ता, हदगा अशा नियमित मागणी असलेल्या पिकांची लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन व योग्य बाजारभाव मिळविता येईल. शेतकर्‍यांच्या सेंद्रीय शेतीच्या उत्पादनास ब्रँड देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील, असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रगतशील शेतकरी अभिनय दुधागावकर आपल्या मार्गदर्शनता म्हणाले की, सेंद्रीय शेती ही एक चळवळ असून आज सेंद्रीय उत्पादनासाठी मोठी मागणी आहे. याचा उपयोग शेतकर्‍यांनी पीकनिहाय गट तयार करुन उत्पादन व विक्री केल्यास शेतकर्‍यांना लाभ होईल. यावेळी डॉ. जी. के. लोंढे असे म्हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये तांत्रिक कौशल्य व व्यवस्थापन आत्मसात करणे गरजेचे असून यासाठी विद्यापीठ सदैव तयार आहे. चारापिकांचे योग्य नियोजन केले तर वर्षभर चारा उपलब्ध होऊन अप्रत्यक्षपणे सेंद्रीय शेतीलाही कमी खर्चात आधार देता येईल. डॉ. पी. आर. देशमुख यांनी सेंद्रीय शेतीमध्ये प्रशिक्षणाचे महत्व असून त्यामध्ये अदययावत प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितेल. डॉ. एस. एन. सोळंकी यांनी सेंद्रीय शेतीमध्ये बैलचलीत अवजारांचा योग्य वापर केल्यास मजुरांवरील अवलंबीत्व कमी करता येईल असे सांगितले.

प्रास्ताविकात डॉ.आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदिदष्ट आणि सेंद्रीय शेती मधील सद्यस्थिती यावर माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. आर एन खंदारे यांनी तर आभार अभिजित कदम यांनी मानले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी शेतकर्‍यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमास लातुर जिल्हयातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सहभागी शेतकरी श्रीमती अन्नपुर्णा झुंजे, अमोल बिर्ले, मनोहर भुजबळ, राजकुमार बिरादार, भागवत करंडे, शरद पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यापिठाचे आभार व्यक्त केले.

तांत्रिक सत्रामध्ये प्राचार्य डॉ नितिन मार्केंडेय यांनी सेंद्रीय शेतीमध्ये पशुधन व्यवस्थापन, आर.के. सय्यद यांनी जैविक कीड व्यवस्थापक, डॉ. एस. एल. बडगुजर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, हर्षल जैन यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण, डॉ. एस. जी. पाटील यांनी सेद्रीय फळपिक लागवड तंत्रज्ञान, डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये पशुधनाचे महत्व, डॉ. एस. एस. धुरगुडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचा उपयोग व महत्व, डॉ. सय्यद इस्माईल यांनी जैविक खत निर्मिती व वापर तसेच डॉ. के.टी. आपेट यांनी जैविक बुरशी संवर्धनाची निर्मिती व उपयोग आणि जैविक बुरशी संवर्धने निर्मिती केंद्रास भेट देवून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

या दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू डॉ. अशोक ढवण, आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयानिहाय मराठवाडयातील आठही जिल्हयांसाठी करण्यात आलेले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनील जावळे, शीतल उफाडे, व्दारका काळे, मनीषा वानखेडे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतीश कटारे, भागवत वाघ, सचिन रनेर, दीपक शिंदे, नागेश सावंत आदींनी पुढाकार घेतला.

 

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.