कर्ज, जमीन, पशूधारणेचीही होणार पाहणी
मुंबई / प्रतिनिधी
सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकर्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे मूल्यांकन होणार आहे. त्याचबरोबर शेतकर्यांची जमीन, पशुधारणा, त्यांच्या डोक्यावर असणारे कर्ज या सर्वांची राज्य सरकारकडून पाहणी केली जाणार आहे.
ही पाहणी जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत संपन्न होणार असून नागरिकांनी माहिती संकलनासाठी येणार्या कर्मचार्यांना सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक र. र. शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रीय नमुना पाहणीच्या अंतर्गत ही पाहणी होणार आहे. राष्ट्रीय नमुना पाहणीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक र. र. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यातील सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणार्या कर्मचार्यांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. ही पाहणी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून कर्जे व गुंतवणूक या विषयाची देखील माहिती घेतली जाणार आहे. या पाहणीअंतर्गत शेतकरी कुटुंबांचे आर्थिक राहणीमान, त्यांच्या ताब्यात असलेली जमीन, पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, त्यापासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी होणारा खर्च, या पिकांना मिळणारी आधारभूत किंमत, सिंचनाचे स्त्रोत, शेतकरी कुटुंबाकडे असलेले पशुधन व त्यापासून मिळणारे उत्पन्न, यासारखी माहिती गोळा करण्यात येईल. त्याचसोबत ग्रामीण व नागरी भागाकरिता निवड केलेल्या कुटुंबाकडे त्यांनी केलेली गुंतवणूक, त्यांच्यावर असलेले कर्ज, त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्ता आणि दायित्वे याबाबतची विस्तृत माहिती गोळा करण्यात येईल. या पाहणीच्या निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील विविध धोरणे आखण्यासाठी तसेच नियोजनासाठी केला जातो.