मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

औरंगाबाद परिमंडलातून 803 शेतकर्‍यांचे अर्ज
औरंगाबाद / प्रतिनिधी
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवरील स्वतंत्र पोर्टलवर मागील दहा दिवसांत राज्यातील 1880 तर औरंगाबाद परिमंडलातील 803 शेतकर्‍यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. यात जालना जिल्ह्यातील 732 तर औरंगाबाद जिल्ह्यातील 71 शेतकर्‍यांचा समावेश आहे. औरंगाबाद परिमंडलातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलमुळे शेतकर्‍यांना सौर कृषिपंपासाठीअर्ज करणे सोयीचे झाले आहे. तसेच या पोर्टलवर शेतकर्‍यांना सौर कृषिपंपासाठी अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकर्‍यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकर्‍यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकर्‍यांकडून नेहमी विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांची माहिती, याशिवाय मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच या पोर्टलवर योजनेअंतर्गत सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेता येईल. या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये : शेतकर्‍यांना दिवसा शेतीला पाणी देता यावे यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबण्यात येत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात यासारख्या गोष्टींपासून मुक्ती मिळणार. 5 एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकर्‍यांना 3 अश्वशक्ती तर 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकर्‍यांना 5 अश्वशक्तीचा सौरपंप मिळणार. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना पंपाच्या किमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा भरावा लागेल. सौरपंप मिळवण्यासाठी प्रतीक्षा काळ नाही, त्वरित पंप मिळणार.

योजनेचे फायदे : वीजबिल भरण्यापासून कायमची मुक्ती मिळणार. 5 वर्षांसाठी सौरपंपाची देखभाल व दुरुस्ती कृषी पंप कंपनी करणार. सौरपंप संचाचा 5 वर्षांचा विमाही कृषी पंप कंपनी उतरवणार. संचासोबतच 2 एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेट मिळणार.
योजनेसाठी पात्रता : ज्या शेतकर्‍यांकडे शाश्वत जलस्रोत आहे, परंतु पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नाही असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ज्यांनी कृषीपंप वीजजोडणीसाठी 31 मार्च 2018 पूर्वी अर्ज केले आहेत, त्यांनाही सौरपंपासाठी अर्ज करता येईल. त्यांनी महावितरणकडे भरलेली रक्कम समायोजित केली जाईल. या योजनेसाठी शेतकर्‍यांना ुुु.ारहरवळीलेा.ळप/ीेश्ररी या महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज करताना केवळ 7/12 चा उतारा व आधार कार्ड या किमान कागदपत्रांची गरज. याशिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना-हरकत दाखला आणि शेत जमीन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना-हरकत प्रतिज्ञापत्र लागेल. अर्ज ऑनलाईनच भरावा लागेल.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.