नवीन गव्हाची आवक आणि मागणीही वाढल्याने धान्य बाजारात मोठी रेलचेल दिसून येत आहे. जळगावात सध्या दररोज २०० टन गव्हाची खरेदी होत आहे.
मार्च महिन्यापासूनच नवीन गव्हाची आवक सुरू झाली तरी मार्च महिन्यात फारशी खरेदी झाली नाही. आपण बघतो एप्रिलमध्ये उन्हाचे प्रमाण वाढते त्यामुळे गव्हातील ओलावादेखील कमी होतो या कारणाने ग्राहक एप्रिल महिन्यात धान्य खरेदी करतात. या वेळे थंडी जास्ती असल्यामुळे गव्हाला चांगला फायदा होऊन उत्पादन चांगले आल्याचे सांगितले जात आहे.
थंडीचा फायदा
या वेळे थंडी जास्ती असल्यामुळे गव्हाला चांगला फायदा होऊन उत्पादन चांगले आल्याचे सांगितले जात आहे. यात महाराष्ट्रासह गव्हाची मुख्य बाजारपेठ असलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक सुरू आहे. दररोज साधारण २०० क्विंटल गव्हाची आवक होऊन तेवढ्याच मालाची विक्री होत आहे. ही आवक आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
स्थिर भाव
गव्हाला मागणी वाढली असली तरी आवकही चांगली असल्याने गव्हाचे भाव वाढले नसून गेल्या आठवड्यापासून ते स्थिर असल्याचे बाजारपेठेत चित्र आहे. यात १४७ गव्हाचे भाव २२०० ते २३०० रुपये, लोकवन गव्हाचे भाव २२०० ते २३०० रुपये, शरबती गहू २४०० ते २५०० रुपये, चंदोसी गव्हाचे भाव ३२०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. गेल्या आठवड्यात गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली होती.
खरेदीसाठी घाई
सध्या उन्हाचे प्रमाण वाढल्याने गव्हातील ओलावा दूर होण्यासह खरेदी केलेला गहू वाळविण्यासाठी चांगले उन पडत असल्याने धान्य बाजारात गहू खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. यात महिलांची अधिक गर्दी होत असून वेगवेगळ्या दराच्या गव्हाला पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे.
गव्हासोबत, तांदूळ, डाळीचीही खरेदीला मागणी
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच नवीन तांदुळाची आवक सुरू झाली तरी तेव्हापेक्षा आता तांदळाला जास्त मागणी आहे. गव्हासोबतच वर्षभराचा तांदूळ भरण्यासाठी लगबग असून मागणी वाढली तरी तांदळाचेही भाव स्थिर आहेत. या धान्य खरेदीसह डाळींनाही मागणी आहे.