कांदा गुणवत्ता प्रतवारीसाठी विकसित केले यंत्र – डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला

0

भारतीय लोकांच्या आहारात कांद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शाकाहारी व मांसाहारी लोकांच्या आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो. कांद्यामध्ये “ब” आणि “क” जीवनसत्त्वे, कर्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह ही खनिजे असतात. कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. कांदा उत्तेजक, चेतानाप्रद असून त्यात गोड, आंबट, तिखट, कडवट आणि तुरट असे पाच निरनिराळे स्वाद आहेत. पित्त आणि वातनाशक म्हणून कांद्याचा कांद्याचा वापर केला जातो. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्तवाहिनीमधील दोष या विकारांवर कांदा अत्यंत गुणकारी आहे.

महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे राज्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप, रांगडा, रब्बी आणि उन्हाळी हंगामात लागवडीस पोषक असते. महाराष्ट्रातील ३७ टक्के कांदा क्षेत्र हे एकट्या नाशिक जिल्ह्यात असून प्रामुख्याने पुणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांदा पीक घेतले जाते.

शेतकऱ्यांना कांदा प्रतवारी करणे कठीण जाते. त्यामुळे प्रतवारी यंत्राची गरज लक्षात घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सुधारित कांदा प्रतवारी यंत्राची निर्मिती केली आहे. यानंतर आता हे यंत्र मोठ्या प्रमाणात  बनविण्यासाठी अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. यामुळे कांद्याला निश्चितपणे अधिक चांगला भाव मिळू शकतो. तसेच कांदा निर्यातीकरिता प्रतवारी करणे आवश्यक ठरते.

क्षमता :

कांदा प्रतवारी यंत्राची क्षमता प्रतिदिवस (८ तास) २० टन एवढी आहे. त्यातून ४० मि.मी. पेक्षा लहान, ४० ते ६० मि.मी. आणि ६० मि.मी. व्यासाचे कांदे वेगळे केले जाते. या यंत्रांसाठी ५ अश्वशक्ती विद्युत ऊर्जा आवश्यक असते. चार अकुशल मजूर यंत्र चालवण्यासाठी पुरेसे होते. हे यंत्र एका जागेवरून दुसरीकडे नेणे सुलभ आहे.

उपयोग :

कांदा प्रतवारी यंत्रामध्ये मोठा, मध्यम आणि गोल्टी अशी तीन प्रकारची प्रतवारी करता येते. या यंत्रात कांदा टाकल्यानंतर त्याच्यातून आगोदरच निघालेली टरफले, पालापाचोळा पंख्याच्या सहाय्याने आपोआप वेगळा केला जातो. सुरूवातीला गोल्टी कांदा बाहेर पडतो. त्यानंतर मध्यम व मोठा कांदा यतो. कांद्याची प्रतवारी शेतकऱ्याला घरच्या घरी करता येते. हे यंत्र थ्री फेज विद्युत मोटार वर चालते. सदर यंत्रामध्ये कांद्याची साल निघू नये व त्यास इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे. अकोला जिल्यातील आलेगाव व नाशिक येथील शेतकऱ्यांशी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून सदर यंत्राची कशी आवश्यकता आहे ते जाणून घेतले व त्यानंतरच ह्या यंत्राची निर्मिती करण्यात आली. कांदा प्रतवारीसाठी सद्यस्थितीत २५ ते ३० मनुष्य एका दिवसामध्ये २० टन कांद्याची प्रतवारी करतात. या प्रतवारी यंत्राच्या साह्याने फक्त ४ मनुष्यच २० टन कांद्याची प्रतवारी एका दिवसात करू शकतात.

वैशिष्ट्ये :

 • सदर यंत्र हे चालविण्यास सोपे आहे.
 • प्रतवारी करताना कांद्याला इजा होत नाही.
 • हे यंत्र कांद्यांची त्यांच्या आकारानुसार प्रतवारी करते.
 • चाकांच्या साह्याने ने-आण करण्यास सोपे.
 • यंत्राने कांद्यांची ४० मि. मी. पेक्षा कमी, ४०-६० मि. मी. तसेच ६० मि.मी. पेक्षा जाड अशा प्रकारात प्रतवारी करता येते.
 • चाळणी बदलून कांद्याची प्रतवारी पाहिजे त्या आकारामध्ये करता येते.
 • कांदे प्रतवारी यंत्रात टाकण्यासाठी उद्वाहकची व्यवस्था आहे.
 • कांद्याची प्रतवारी करताना निघालेली टरफले वेगळे करण्याची व्यवस्था आहे तसेचप्रतवारी केलेले कांदे पोत्यात भरण्यास सुलभ आहे.
 • या यंत्राची क्षमता १५ ते २० टन प्रति दिवस आहे.
 • यंत्राची प्रतवारीची अचूकता ९० ते ९५ टक्के आहे.
 • २० टन कांद्याला हाताने प्रतवारी करतांना ३० कुशल मजुरांची आवश्यकता असते. या मशीनने प्रतवारी करण्यासाठी ४-६ अकुशल मजूर लागतात.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा  8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.