विद्युत ग्राहक हा विद्युत सुरक्षेमधील अगदी मूळ घटक (Basic element) आहे.
मंडळी, भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यानुसार बहुतांश लोक ग्रामीण विभागात राहून शेतीचा व्यवसाय करताना आढळतात. त्यादृष्टीने ग्रामीण भागातील विद्युतसंच मांडणीची सुरक्षा हासुद्धा ऐरणीवरचा विषय बनला आहे. वीज कंपन्यांची देखभालीबाबतची अनास्था, विद्युत ग्राहकांचे (शेतकरी) अज्ञान यामुळे विद्युत अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण सुरक्षेबाबत सखोल चर्चा होणे आवश्यक आहे.
याबाबत सुरक्षा प्रस्थापित करण्यामध्ये ढोबळपणे दोन घटक महत्त्वाचे वाटतात. पहिला म्हणजे वीजपुरवठा कंपनी आणि दुसरा म्हणजे खुद्द ग्राहक. महाराष्ट्राचा विचार करता, सर्व ग्रामीण भागात वीजपुरवठा हा महावितरण या कंपनीतर्फे केला जातो. त्यातील अभियंता/कर्मचाऱ्यांनी विद्युत नियमांनुसार खालील बाबींचे अनुपालन करणे आवश्यक आहे.
सबस्टेशन : ग्रामीण भागात मुख्य लोड हा शेतीपंपाचा असतो
व हे संपूर्ण क्षेत्रात विखुरलेले असतात. त्यांचा वीजपुरवठा नियंत्रित करण्याचे
काम हे त्या त्या क्षमतेचे रोहित्र (Transformer) करत असतात. त्या रोहित्रांची उभारणी
वेगवेगळ्या लोडसेंटरच्या सबस्टेशन्समार्फत केली जाते. जी अधिनियम २०१०च्या कलम
क्र. ४४ प्रमाणे करणे बंधनकारक आहे. सदर सबस्टेशन्समध्ये अग्निरोधके आणि इतर
सुरक्षा साधने वापरणे आवश्यक आहे. तसेच आकाशातील विजेमुळे होणारे नुकसान
टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर लावणे, कलम क्र. ७४ प्रमाणे बंधनकारक आहे.
उपरी तारमार्ग (Overhead Conductor) : वीज कंपनीचे उपरी तारमार्ग हे ग्राहकाच्या शेतातून, रस्त्यातून किंवा घरांवरूनसुद्धा जात असतात. या तारमार्गाचे जमिनीपासूनचे अंतर हे विद्युत अधिनियम २०१०च्या कलम क्र. ५८, ६० आणि ६१ मध्ये अधोरेखित केलेले आहे. वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या निरनिराळ्या व्होल्टेजच्या लाइन्स या ग्राहकांची निकड आणि लोडप्रमाणे उभारल्या जातात, त्यांचा तपशील खालीलप्रमाणे.
१) ३ फेज, ४/५ वायर,
४४० व्होल्ट्स.
२) ३ फेज ३ वायर, ११००० व्होल्ट्स, अर्थात ११ केव्ही.
३) ३ फेज, ३ वायर २२००० व्होल्ट्स, अर्थात २२ केव्ही.
४) ३ फेज, ३ वायर ३३,००० व्होल्ट्स,
अर्थात ३३ केव्ही.
५) ३ फेज, ३ वायर ६६००० व्होल्ट्स, अर्थात ६६ केव्ही.
६) ३ फेज, ३ वायर १,१०,००० व्होल्ट्स, अर्थात ११० केव्ही.
७) ३ फेज, ३ वायर २,२०,००० व्होल्ट्स, अर्थात २२० केव्ही.
८) ३ फेज, ३ वायर ४,००,००० व्होल्ट्स, अर्थात ४०० केव्ही.
वरील तारमार्गाचे जमिनीपासून सुरक्षित अंतर किती असावे हे सोबतच्या दोन आकृतींत स्पष्ट केले आहे. उदाहरणादाखल टेबल नंबर १ मधील पहिली रीडिंग ही मध्यम दाब असलेल्या लाइनची आहे. ही लाइन रस्ता ओलांडत असेल तर ५.८ मीटर, रस्त्याबरोबर असेल, तर ५.५ मीटर, तर या व्यतिरिक्त इतरत्र अथवा शेतातून जात असेल तर ४.६ मीटर अंतर (कमीत कमी) सोडणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी अंतर झाले तर तो नियमाचा भंग होतो. आपण कित्येकदा पाहतो की शेतांमधून जाणाऱ्या तारा खूपच खाली आलेल्या असतात. जोरात वारा आल्यास त्यांचा एकमेकांस स्पर्श होऊन आग लागून पिकाचे नुकसान होते. अशा वेळी वीज कंपनीने नियमांचा भंग केल्यामुळे शेतकऱ्यास नुकसानभरपाई द्यावी लागते.
सेफ्टी डिव्हाईस : शेतांमधून पंपासाठी जाणाऱ्या वीज तारांना संरक्षक साधने देणे हे कलम क्र. ७३ प्रमाणे वीज कंपनीस बंधनकारक आहे. वादळवाऱ्यामुळे ३ फेज ४ वायरमधील एखादी तार तुटून जमिनीवर पडल्यानंतर जर सेफ्टी डिव्हाइस उभारले असेल तर त्वरित फ्यूज जाऊन ग्राहकास संरक्षण मिळते. जर ते नसेल तर खाली पडलेल्या त्या तारेतून सतत वीजप्रवाह सुरू राहतो, ज्याची परिणती माणूस किंवा जनावरास अपघात होण्यात होते. याच नियमानुसार शेतातून किंवा अन्यत्र उभारलेल्या उच्च किंवा अतिउच्च दाबाच्या (HV किंवा EHV) प्रत्येक खांबावर किंवा टॉवरला चढता येऊ नये म्हणून अँटी क्लाइम्बिंग डिव्हाईस लावणे हे त्या त्या वीज कंपनीस बंधनकारक आहे.
संरक्षित पट्टा (Right of Way) : प्रत्येक उपरी तारमार्गाच्या खाली बांधकाम करायचे झाल्यास ते संरक्षित पट्टा (ROW) सोडूनच करावे, असे विद्युत नियमांत स्पष्ट निर्देश आहेत. ११ केव्हीसाठी ११ मीटर ते ४०० केव्हीसाठी ५२ मीटरचा संरक्षित पट्टा (ROW) तारमार्गाखालील जमिनीवर मोकळा ठेवून त्यामध्ये कुठलेही बांधकाम किंवा झाड इत्यादींचा विकास होत नाही, याची दक्षता वीज कंपनीने घेणे बंधनकारक आहे. शेतजमिनीचा, NA (बिगरशेती) करते वेळी वीज कंपनीतर्फे NOC द्यावी लागते. त्या वेळी उभ्या आणि आडव्या अंतराच्या (Clearance) बाबतीत कंपनी व ग्राहकांत काही वाद निर्माण झाल्यास त्या जिल्ह्य़ाच्या विद्युत निरीक्षकाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे.
अर्थिंग : उच्च दाब किंवा अति उच्च दाबाच्या प्रत्येक खांबास किंवा टॉवरला कलम क्र.
७२ प्रमाणे अर्थिग करणे हे प्रत्येक वीज कंपनीस बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे
शेतीपंपाला वीजपुरवठा करणाऱ्या खांबाचा स्टेला जमिनीपासून ८ फुटांच्या अंतरावर
सुरक्षेसाठी स्टे-इन्सुलेटर देणे आवश्यक आहे, म्हणजे विद्युतक्षरण झाल्यास ते अर्थिग होऊन सुरक्षितता मिळेल.
वरील सर्व बाबी या
महावितरण कंपनीला लागू पडतात. कारण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वत्र महावितरण
या कंपनीचा वीजपुरवठा असतो. विद्युत सुरक्षा प्राप्त करण्यासाठी वर उल्लेख
केलेल्या विद्युत नियमांचे पालन न झाल्यास अपघात घडू शकतात आणि संबंधित अभियंता/
कर्मचारी शिक्षेस पात्र ठरतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे विद्युत सुरक्षेसाठी वीज
कंपनी या घटकाच्या सहभागाचा आढावा आपण घेतला. दुसरा घटक म्हणजे स्वत: विद्युत
ग्राहक. आपल्या शेतातील वीज पंप, थ्रेशर,
क्रशर इत्यादींची
संचमांडणीची व्यवस्थित देखभाल करून विद्युत, सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
विद्युत ग्राहक हा विद्युत सुरक्षेमधील अगदी मूळ घटक (Basic element) आहे. आजकाल ग्रामीण भागातील ग्राहकसुद्धा सुरक्षेबाबतीत खूप जागरूक झाल्याचे दिसते, तरीपण माझ्या मागील लेखात उल्लेख केलेल्या कर्तव्यांचा सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे अनुपालन करावे. वीज पंप जो शेतावरील संच मांडणीचा प्रमुख घटक आहे. त्याचे काम हे परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडूनच करून घ्यावे.
-मेन स्विचपासून मोटरला कनेक्ट करणाऱ्या तारा
या जमिनीवर उघडय़ा न ठेवता त्या फ्लेक्सिबल काँडय़ुटमध्येच ठेवून योग्य आकाराच्या
क्लिप्सने भिंतीवरून फिरवाव्यात.
* स्टार्टरला कधी बायपास
करू नये,
त्याचा दांडा बांधू
नये.
* बरेच लोक कमी दाबावर
मोटर बंद होऊ नये म्हणून स्टार्टरला काडी लावून ठेवतात, त्यामुळे मोटर गरम होऊन जळते व अशा वेळी अपघात
होण्याची शक्यता असते.
* मोटरला दोन अर्थिग असणे
आवश्यक आहे.
* ज्या वेळी विहिरीचे
पाणी कमी होते त्या वेळी शेतकरी विहिरीच्या मध्यभागी एक बीम टाकून त्यावर वीज पंप
बसवतात अशा घटनांत अर्थिग केलेल्या वायर्स तशाच वर लटकत राहतात, असे बरेच अपघात झाल्याचे दिसते. कारण अर्थिग न
मिळणे.
* वीज पंप जर उलट दिशेने
फिरत असल्याचे आढळल्यास मोटरच्या कुठल्याही दोन तारा अदलाबदल कराव्यात.
* मोटरच्या आवाजात अचानक
बदल झाल्यास ती ताबडतोब बंद करावी. पुन्हा सुरू करण्यापूर्वी फ्युज तपासून पाहावे.
* विहिरीत पाण्याची पातळी
वाढल्यास डिलेव्हरी व्हॉल्व अंशत: बंद करावा.
शेतकरी बांधवांनी स्वत:च्या प्रगतीकरिता शेतीवर मोठय़ा प्रमाणावर वीज पंप बसविलेले आहेत; परंतु त्याची दुसरी बाजू अशी की निष्काळजीपणा, विद्युत नियमाबद्दल अज्ञान आणि निकृष्ट देखभाल यामुळे वीज पंपावर अनेक अपघात घडतात. घरातील कर्ता माणूस गेला की कुटुंब उद्ध्वस्त होते. याला सर्व संबंधितांची व्यापारी वृत्ती, तांत्रिकदृष्टय़ा कमी दर्जाचे काम या गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत.
सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, पंपाजवळ काम करताना त्या माणसाचा स्पर्श वीज मोटरची फ्रेम, पाइप, अर्थिग, इलेक्ट्रिक वायरचे उघडे जोड, तसेच स्टार्टर, मेन स्विच इत्यादी वस्तूंना झाल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. वीज पंपावरून झोपडीमध्ये घेतलेल्या तात्पुरत्या वायरिंगमुळेसुद्धा अनेक अपघात होत असतात.
बऱ्याच वेळा असे घडले आहे की, फूटव्हॉल्वचे काम करण्यासाठी किंवा पोहण्यासाठी माणसे विहिरीत उतरतात आणि त्यात असलेल्या विद्युत प्रवाहामुळे दगावतात. याचे मुख्य कारण अकार्यक्षम अर्थिग आहे. वीज पंपातील एखाद्या वायरचे इन्सुलेशन निघाले व त्या उघडय़ा जिवंत भागाचा स्पर्श जर मोटरची बॉडी, लोखंडी पाइप इ.ला झाला तर तो वीजप्रवाह पाण्याच्या सेक्शन पाइपद्वारे पाण्यात उतरतो व अर्थिग चांगले नसेल तर फ्युज जात नाही व तो वीजप्रवाह पाण्यात तसाच वाहत राहतो, पंपाचा सक्शन पाइप, डिलेव्हरी पाइप आणि मोटरचा सांगाडा या वस्तूसुद्धा वरील कारणामुळेच विद्युतभारीत होतात व अपघात घडतात.
नवीन लावलेली मोटर सुरू करण्यापूर्वी तिची व्यवस्थित मांडणी करावी. मोटर फिरण्याची दिशा, लेव्हलिंग इ. गोष्टींची खात्री पटल्यानंतर पंपामध्ये पाणी भरावे. ज्याला प्रायमिंग म्हणतात. पाणी भरणे आवश्यक आहे. कारण हवेत फिरणाऱ्या इम्पेलरमध्ये दाब फारच कमी निर्माण होतो व पंप पाणी ओढावयास असमर्थ ठरतो. बरेच दिवस बंद असलेल्या पंपालादेखील प्रायमिंगची आवश्यकता असते. याशिवाय वीज पंपाच्या बाबतीत खालील गोष्टी ग्राहकाच्या सुरक्षेसाठी पाळणे अत्यंत आवश्यक आहे.
* पंप बंद केल्यावर, तसेच मेन स्विच बंद केल्यावरसुद्धा वायरिंगला/
पंपाला लगेच हात लावू नये. काही वेळाने हात लावावा, कारण मोटरच्या कपॅसिटरमध्ये साचलेल्या विजेचा
शॉक लागू शकतो.
* विहिरीमध्ये उतरताना
वीज पंप बंद करून त्याचा मेनस्विचसुद्धा बंद करावा.
* विहिरीवरचा पंप बाहेर
काढताना त्याची सप्लाय वायर पूर्णपणे काढून बाजूला करा.
* फ्युज वायरची जाडी बदलू
नये.
* पंप काही दिवस बंद
ठेवावयाचा असल्यास त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे.
* जर पावसाळ्यात मोटर व
स्टार्टरचे काम नसेल तर कोरडय़ा हवेशीर ठिकाणी ठेवावे. दमट वातावरणामुळे वीजरोधक
आवरण खराब होण्याची शक्यता असते.
* कृषी पंपाची निरीक्षणे
करताना काही ठिकाणी आम्हाला लाइनवर आकडे टाकून मोटारी चालू असल्याचे दिसले. अशा
ठिकाणी आम्ही पंचनामा करून कायदेशीर कारवाई केली. ही विद्युत कायदा कलम क्र. १३५
प्रमाणे विजेची चोरी असून,
दंडनीय गुन्हा आहे.
कृषी विद्युत सुरक्षा आणि एकूणच ग्रामीण भागातील विद्युत यंत्रणेच्या सुरक्षित देखभालीसाठी त्या भागातील वीज कंपनीने शेतकऱ्यांसाठी सतत जागरूकता मोहिमा राबविल्या पाहिजेत. महावितरणचा कारभार हा सर्व खेडय़ापाडय़ात पोहोचला आहे. तेथील अभियंत्यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावकऱ्यांसाठी विद्युत सुरक्षेबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिके यांची तजवीज करावी. जेणेकरून विद्युत अपघात कमी होण्यास मदत होईल. वीज कंपनीच्या अभियंता/ कर्मचाऱ्यांकडून वरील कामे पूर्ण क्षमतेने होतात की नाही हे पाहण्याचे काम प्रत्येक जिल्ह्य़ात असलेल्या विद्युत निरीक्षकांचे असते. कलम क्र. १६२ अनुसार त्यांना कायदेशीर अधिकार असल्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांवर कायदेशीर अॅक्शन विद्युत निरीक्षक घेऊ शकतात, हे बऱ्याच जणांना माहीत नाही, हे दुर्दैव.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.