दहा गुंठ्यात 65 हजारांची कमाई
गुलाब, सेवंतीने आला अर्थकारणाला बहार
औरंगाबाद / बाबासाहेब मुजमुले
आपल्याकडे मराठीत भरोश्याच्या म्हैशीने दिला टोणगा, अशी म्हण प्रचलीत आहे. या म्हणीतील मतीतार्थाप्रमाणेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील शेतकर्यांची अवस्था निसर्गाने गेल्या कित्येक वर्षांपासून केली आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी सरकारची अनास्था येथील बळीराजाच्या मुळावर उठलेली असते. मात्र यातूनही खचून न जाता या सर्व संकटांचा निकराने सामना करत अनेक शेतकरी शेतीत विविध प्रयोग करून जीवनाची आर्थिक घडी बसवण्याची धडपड करताना दिसतात. त्यातीलच एक आहेत मौजे मालेवाडी ता. गंगाखेड येथील गणेश तलवारे.
तलवारे आपल्या 7 एकर शेतीत पारंपारिक पिकं घेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पण कापूस, तूर, हरबरा, ज्वारी या पिकांवर नानाविध संकटांच्या आक्रमणाने हाती बीबियाणे आणि मेहनतानाही लागणे कठीण झाल्याची परिस्थिती दरवर्षी वाटेला येत असे. यातून काहीतरी नवीन प्रयोग करण्याची युक्ती गणेश तलवारे यांच्या पदवीधर मुलाने शोधून काढली. यातूनच पारंपारिक पिकांना फाटा देत केवळ 10 गुंठे एवढ्याच जागेवर त्यांनी गुलाब आणि शेवंती या फुलपिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गुलाब आणि शेवंतीच्या याबरोबरच अन्य फुलांना बाजारात बाराही महिने मागणी असते. त्यामुळे फुलशेती ही योग्य नियोजनाने केली तर यातून नक्कीच फायदा होईल या विचारातून तलवारे यांनी शेतातील 10 गुंठे जमीनीची फुलशेतीच्या दृष्टीने मशागत केली. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचन करण्याचा निर्णय घेतला. या दहा गुंठे जमीनीवर शिरडी गुलाब 100, गांधी गुलाब 50 या झाडांची 8 बाय 6 अशी लागवड केली. या आंतरपीक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून परभणी शेवंती या जातीची 500 रोपे आणून 4 बाय 4 अशा अंतरावर लावली. या फुलशेतीसाठी 15 हजार रुपयांचा खर्च आला आहे. फुलांच्या झाडांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी पंधरा दिवसाला एक 20ः20ः0 महाधन लिक्वीडची फवारणी करण्यात येते. तर झाडांच्या रोप वाढीच्या काळात 19ः19ः0आरसीएफ खत वापरल्याचे तलवारे यांनी सांगितले.
एकवर्षांपूर्वी केलेली ही फुलशेती तलवारे कुटुंबीयांना मोठा आधार देत आहे. या फुलशेतीतून निघालेली फुले नांदेड, गंगाखेड, परभणी आदी ठिकाणच्या बाजारात दररोज नेऊन विक्री केली जातात. सद्या गुलाब फुलांना 100 रुपये तर शेवंतीच्या पिवळ्या फुलांना 20 रुपये किलोप्रमाणे दर मिळत असून यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यास मोठा हातभार लागत आहे.
या फुलशेतीसाठी तलवारे यांना कृषीसेवक राठोड, कृषीमंडळ अधिकारी नांदे यांनी मार्गदर्शन करून काही प्रमाणात शासकीय यांजनांमार्फत अनुदान मिळवून दिल्याचे तलवारे यांनी सांगितले. आता तलवारे यांच्या बागेतील गुलाब, शेवंतीची फुले आनंदाने डोलत असून परिसरातील नागरिक, शेतकर्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
चौकट
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकर्यांनी पारंपारिक शेतसह आधुनिक पद्धतीने कमी पाणी कमी मेहनत आणि बाजारात अधिक मागणी असणारी पिके घेण्याकडे लक्ष द्यावे. तसेेच शेतीसह पुरक व्यवसायाचा आधार घेणे महत्वाचे आहे.
-भागवत तलवारे, शेतकरी.