दुष्काळी परिस्थितीतही भाजीपाल्याच्या दरात घसरण

0

खते, बियाणे व कीटकनाशकांसह मजुरीच्या दरात वाढ
पालेभाज्यांची जुडी पाच, फळभाजांची 20 रुपये किलोने विक्री
उस्मानाबाद / प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीतही शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याच्या दरात घसरण कायम आहेत. सध्या शेतकर्‍यांना पालेभाज्यांची जुडी पाच रुपयाला तर फळभाज्या 20 ते 30 रुपये किलोने विकाव्या लागत आहेत. यातून लागवड, खते आणि कीटकनाशकांचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी अडचणीत येऊन कर्जबाजारी होत आहेत.

दुष्काळी स्थितीतही शेतकरी संरक्षित पाण्यावर पालेभाज्यांचे उत्पादन घेऊन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, बाजारात मेथी, पालक, कांदेपात, कोथिंबीरीची जुडी पाच रुपयांनी विकली जात आहे. तसेच गवार, वांगी, हिरवी मिरची, फुलकोबी, पानकोबी 20 ते 30 रुपये किलोने विकावी लागते. यातून शेतकर्‍यांचा खत व कीटकनाशकांचा खर्चही निघत नाही. तसेच भाजीपाल्याची तोडणी व तोडलेला भाजीपाला बाजारात आणण्यासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च शेतकर्‍यांना अनेकवेळा पदरमोड करून करावा लागतो. शेतात उत्पादित केलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही म्हणून जनावरांपुढे टाकण्याऐवजी माणसांच्या मुखात घालण्यासाठी बाजारात आणतात. मात्र, शहरातील नागरिक शेतकर्‍यांनी सांगितलेल्या किंमतीपेक्षा अर्ध्या किंमतीने मागणी करत असल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यालाही माल विकून शेतात जायचे असते, त्यामुळे मिळेत त्या भावात भाजीपाला विकला जातो. सहनशीलता संपून शेतकर्‍यांनी भाजीपाला उत्पादन करण्याचे बंद केल्यास शहरवासीयांना व्यापार्‍यांकडून चढ्या भावाने भाजीपाला घेण्याची वेळ येऊ शकते. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. मात्र, काही शेतकर्‍यांनी शेततळी, साठवण विहीर, साठवण खड्ड्यात पाणी संरक्षीत करून भाजीपाला उत्पादित करत आहेत. मात्र, भाव मिळत नसल्याने अडचणीत आहेत.

यंदा शेतकर्‍यांना टोमॅटोनेही रडवले
आजपर्यंत शेतकर्‍यांना कांदा रडवत होता. मात्र, यावर्षी टोमॅटोच्या पिकाने शेतकर्‍यांना रडविले आहे. टोमॅटोच्या पिकाला इतका कमी भाव मिळाला की, त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे अनेकदा शेतकर्‍यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याच्या बातम्या आल्या आहेत. सध्या 15 ते 20 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी पाच रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत होती.
चौकट

पदरमोडीमुळे शेतकरी वैतागला
शेतकर्‍यांना एक एकर मेथीचे उत्पादन घेण्यासाठी बि-बियाणांसह खते व किटकनाशकासाठी सुमारे 25 हजार रुपये खर्च येतो. मात्र, उत्पादित भाजीपाल्यातून केवळ 15 हजार मिळतात. यामुळे 10 हजाराची पदरमोड करावी लागत आहे. हे चक्र बदलत नसल्याने शेतकरी वैतागला आहे

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.