शेतकरी संघटनेतर्फे इशारा
उस्मानाबाद / प्रतिनिधी
जिल्ह्यातील दुष्काळी प्रश्नासंदर्भातील मागण्या पूर्ण कराव्यात. उसाच्या एफआरपीसंदर्भात सर्व कारखानदारांची बैठक बोलविण्यात यावी. अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही शासनाने अद्याप उपाय योजना सुरू केलेल्या नाहीत. ऊस दराची एफआरपीप्रमाणे एकरकमी बील कारखानदार देत नाहीत. ही बिलाची रक्कम तात्काळ मिळण्यासाठी कारखानदारांना बैठक घेऊन त्यांना निर्देश देण्यात यावेत. जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था दावणीलाच करण्यात यावी, खरीप पिकांची नुकसान भरपाई व रब्बी पिकांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तत्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा व मजुरी तीनशे रुपये प्रतिदिन करण्यात यावी. नागरी ,सहकारी बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट व खासगी सावकार यांच्या कर्जवसुलीवर तत्काळ निर्बंध घालावेत. संपूर्ण कर्जमुक्ती, वीज बिल मुक्ती करण्यात यावी. या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही. असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मारवाडकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ललिता खडके, कार्याध्यक्ष धनंजय जोशी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत भराटे, युवा जिल्हाध्यक्ष औदुंबर धोंगडे, कळंब तालुका कार्याध्यक्ष गोविंद जगदाळे, अनसुर्डा शाखाध्यक्ष बालाजी पवार आदींच्या सह्या आहेत.