ठिबक सिंचन संचाच्या गाळण यंत्रणेची देखभाल

1

सूक्ष्म सिंचनाचा आत्मा म्हणजे गाळण यंत्रणा ( फिल्टर्स). परंतु हे गाळण यंत्र फार महागडे असल्यामुळे कोणत्या प्रकारचे गाळण यंत्र ( फिल्टर) आपल्याला पाहिजे ह्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे जवळपास सर्वच संचात जाळीचा फिल्टर ( स्क्रिन फिल्टर) बसविलेला असतो. परंतु सिंचनाचे क्षेत्र जास्त असेल आणि पाण्यात शेवाळ, सेंद्रिय पदार्थ इ. हमखास येत असतील तर वाळूचे गाळण यंत्र ( सॅंड फिल्टर ) लावावे. अन्यथा जाळीचे किंवा चकतीचे गाळण यंत्र ( डिस्क फिल्टर ) लावावे. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याव्दारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसॉयक्लान फिल्टर ( शंकू फिल्टर ) वापरावा.

 

अ) स्क्रीन फिल्टर (जाळीची गाळणी) ची स्वच्छता:-

ठिबक सिंचन पाण्याच्या गाळणीसाठी स्क्रीन फिल्टर वापरतात. सामन्यत: १२० मेश (०.१३ मिमी) आकाराच्या छिद्रांची जाळी वापरले जाते.

 • प्रथमत: संच बंद करून स्क्रीन फिल्टर दाब विरहित करावे.
 • फिल्टरचे बाहेरील आवरण खोलून फिल्टर ची जाळी वेगळी करावी व स्वच्छ पाण्याने साफ करावी.
 • रबर सील जाळी पासून काढून आवश्यकता असल्यास नवीन बसवून सील व्यवस्थीत असल्याची खात्री करावी.
 • फिल्टर च्या तळाशी असलेल्या व्हॉल्व्ह चा उपयोग करून जाळी भोवतीची घाण काढून टाकावी.

 

 

ब) सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरची (वाळूची गाळणी) स्वच्छता:-

धरणे, नद्या, कालवे यांतील पाण्यातून येणारे शेवाळ, सेंद्रिय पदार्थ व कचरा वेगळा करण्यासाठी सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरचा उपयोग होतो. ग्रॅव्हेल फिल्टरच्या अगोदर व पुढे असे २ दाबमापक यंत्रे (प्रेशर गेज) बसवलेले असतात. दाबमापक यंत्रातील पाण्याच्या दाबाचे १० टक्क्यापेक्षा जास्त पतन झाल्यास ग्रॅव्हेल फिल्टर साफ करावे, किंवा आठवड्यातून एकदा साफ करावे. याची स्वच्छता करताना बॅक फ्लशिंग (विरुध्द प्रवाह) तंत्राचा वापर करतात. याद्वारे पाण्याचा प्रवाह विरुध्द दिशेने करून फिल्टर साफ केले जाते  ते खालीलप्रमाणे:

 • सिंचनप्रणाली चालू असताना बायपास व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा करून बॅक फ्लशिंग व्हॉल्व्ह पूर्णपणे चालू करावा.
 • मुख्य कंट्रोल व्हॉल्व्ह व आऊटलेट व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद करावा.
 • फ्लशिंग करते वेळी बायपास व्हॉल्व्ह अंशत: बंद करून सिंचन प्रणालीचा दाब सामान्य दाबापेक्षा ३० टक्के अधिक वाढवावा.
 • बॅक फ्लश व्हॉल्व्हमधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पंप चालू ठेवावा. स्वच्छ पाणी आल्यानंतर पंप बंद करावा.

 

क) हायड्रोसायक्लोन फिल्टरची (शंकू फिल्टर ) स्वच्छता:

या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातील वाळूचे कण वेगळे करण्यासाठी होतो. हा फिल्टर नरसाळ्याचा आकाराचा असतो, त्याचा निमुळता भाग तळाशी एका आडव्या टाकीला जोडलेला असतो. टाकी मध्ये पाण्यातून वेगळी काढलेली वाळू गोळा होते. टाकीला असलेला हॉल्व्ह उघडून जमा झालेली वाळू काढून टाकावी.

 

 

 

ड) डिस्क फिल्टरची ( चकतीचा फिल्टर ) स्वच्छता:

या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातून  घान कण काढून टाकण्यासाठी होतो.

 • डिस्क फिल्टर उघडून सर्व चकत्या मोकळ्या कराव्यात व एका दोरीत बांधून घेऊन स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात.
 • मोठ्या बादलीत १० टक्के तीव्रतेचे हायड्रोक्लोरिक अॅसिड अथवा हायड्रोजन परॉक्साईड च्या द्रावणात या चकत्या साधारणपणे अर्धा तास ते दोन तास बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
 • सर्व चकत्या पूर्वी होत्या त्या स्थितीत ठेवून फिल्टर ची जोडणी करावी.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
 1. […] […]

Leave A Reply

Your email address will not be published.