ऊसासाठी ठिबक सिंचन

0

ऊस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेत ऊस विकासास अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्याच्या काळात मात्र दुष्काळजन्य परिस्थितीमुळे व दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे ऊस उत्पादनातील चित्र बदलले आहे. म्हणजेच उत्पादनात लक्षणीय घट होत चालली आहे. जमिनीचा पोत अति पाणी दिल्याने खराब झाला आहे.

 • ऊसाचे उत्पादन घटण्याची प्रमुख कारणे :

दोषपूर्ण मशागत पद्धती, जमिनीतील क्षारांचे वाढते प्रमाण, खते, औषधे इ. गोष्टी वेळेवर न करणे, पाणी व खते यांचा असमतोल वापर, पाण्याची सीमित उपलब्धता.

अशा परिस्थितीत ठिबक सिंचन तंत्रज्ञानाने पाण्याचे व्यवस्थापन व त्याचा शास्त्रशुद्ध वापर हाच ऊस उत्पादन वाढीला एकमेव पर्याय शिल्लक आहे. ऊसाच्या क्षेत्रावर ठिबक सिंचन संच यशस्वीरीत्या कार्यान्वित असून सदर पद्धतीच्या वापरामुळे शेतकऱ्यांना खालील मुख्य फायदे मिळतात.

1) उत्पादनात वाढ

2) रासायनिक खते, मजुरी व पीकसंरक्षण खर्चात बचत होते.

3) ऊसाचा कालावधी कमी होतो. ऊस लवकर तयार होतो.

सर्व ऊस बागायतदारांनी खालील गोष्टींची प्रामुख्याने दखल घेतल्यास ऊसाचे प्रतिहेक्टरी उत्पादन वाढेल यात शंकाच नाही.

1) पाण्याचा कार्यक्षम वापर, योग्य पीक फेरपालट, सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांचा संतुलित वापर करून क्षारयुक्त आणि चोपण झालेल्या जमिनीची सुधारणा करून नविन लागवडीखालील जमिनी बिघडू न देणे महत्त्वाचे

 • ठिबक सिंचन पद्धतीने ऊसाची लागवड :

1) सरी पद्धत : ही ऊस लागवडीची पारंपारिक पद्धत असून यात जमिनीच्या प्रकारानुसार अडीच ते तीन फुट अंतराच्या सऱ्या पाडून घेतात. यात दोन / तीन डोळ्यांचे बेणे टिपरे वापरतात. हेक्टरी 25 हजार ते 30 हजार टिपरी लागतात. एका सरी आड ठिबक सिंचनाची नळी टाकून मांडणी करता येते.

2) जोड ओळ पद्धत : या पद्धतीमध्ये २.५ ते ३ फूट रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात. दोन सऱ्यांमध्ये उसाची लागण करावी, तिसरी सरी मोकळी सोडावी. लागण केलेल्या उसाच्या दोन सऱ्यामध्ये ठिबक सिंचनाची नळी सोडावी. दोन ड्रीपरमध्ये ५० से.मी. (२० इंच) अंतर ठेवावे. या पद्धतीत दोन सऱ्यांनंतर ५ ते ६ फुटांचा पट्टा राहतो. ठिबक संचाच्या दोन नळ्यांत ७.५ ते ९ फुट अंतर राहते. याचे काही फायदे आहेत, ते खालीलप्रमाणे :
१) ठिबक सिंचन खर्चात ३० % बचत होते.
२) पाण्यामध्ये ५० ते ५५ % बचत होते.
३) भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहते.
४) आंतरमशागत सोपी होते.
५) जमीन खारवट होत नाही.
६) ऊस जोमाने वाढतो.

 • ठिबक सिंचन पद्धतीची वैशिष्ट्ये : 
  १) जमिनीत सतत वाफसा राहतो. उसाची वाढ चांगली होते.
  २) पाणी हे जमिनीस न देता ऊस पिकास दिले जाते.
  ३) जमिनीच्या मगदुराप्रमाणे दररोज अथवा एक दिवसाआड पाणी दिले जाते.
  ४) उसाच्या गरजेप्रमाणे कमीतकमी वेगाने पाणी दिले जाते.
  ५) हवा व पाणी यांचा चांगला समन्वय होऊन मुळाशीच पाणी दिले जाते.
 • ठिबक सिंचनाचे फायदे : 
  १) उपलब्ध पाण्यामध्ये प्रचलित पाटपद्धतीपेक्षा दुप्पट क्षेत्र भिजते.
  २) थोडेसे क्षारयुक्त पाणीसुद्धा प्रभावीपणे वापरता येते.
  ३) सर्व रोपट्यांना सातत्याने समान पाणी मिळून वाफसा टिकून राहतो.
  ४) कांड्यांची संख्या, लांबी, जाडी चांगली व एकसारखी राहते.
  ५) फुटव्यांची संख्या चांगली राहते.
  ६) उंच सखल, पडीक जमिनी लागवडीखाली आणता येतात. हलक्या व रेताड मुरमाड जमिनीसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे.
  ७) जमिनीची धूप टळते, प्रत चांगली राहते. मशागत कमी करावी लागते, खतांचा अपव्यय टळतो.
  ८) पिकाच्या गरजेप्रमाणे खते विभागून दिली जातात.
  ९) पाणी फक्त मुळाच्या क्षेत्रात राहते. इतर भाग कोरडा राहतो. तण वाढत नाही, पिकाची तणांसोबत अन्नासाठी व पाण्यासाठी स्पर्धा टळते.
  १०) कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  ११) पाणी देण्यासाठी मजुरी खर्च कमी होतो.
  १२) संच रात्री किंवा दिवसा केव्हाही चालविता येतो.
  याप्रमाणे मोजक्या पाण्यात रासायनिक खतांचा प्रभावी उपयोग, रोग व किडींचा कमीतकमी प्रादुर्भाव, मजूर व जमिनीचा कार्यक्षम उपयोग व वाढीव उत्पादन, असे अनेक फायदे ठिबक सिंचन पद्धतीने होतात. ठिबक सिंचन ही काळाची गरज आहे.

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा

 

http://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.