महाराष्ट्रामध्ये मिश्रपिक म्हणून तिळाची लागवड केली जाते. कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणजे तीळ. तिळाचा मुख्य उपयोग खाद्यतेल तयार करण्यासाठी केला जातो, कारण बियांमध्ये ४५ ते ५० टक्के तेलाचे प्रमाण असते. उन्हाळी हंगामात तीळ लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला, तर निश्चितपणे उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. तिळाचा साबण, रंग, वनस्पती तूप, औषधी तेल व सुगंधी तेल तयार करण्यासाठीही उपयोग केला जातो. तिळापासून स्निग्ध पदार्थ मिळतात. तिळापासून चटणी व तिळगुळही तयार केला जातो. भारतातील लोकांचे सरासरी तेल खाण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेने मात्र कमी आहे.
तिळाचे महत्त्व :
- तिळामध्ये तेलाचे ५० टक्के आणि प्रथिनांचे २५ टक्के प्रमाण
- तेलामधील ज्वलनविरोधक घटक सिसमोल, सिसॅंमोलीन.
- दीर्घकाळ चांगले टिकते, खवट होत नाही, पेंडीत प्रथिने ३५ ते ४५ टक्के.
- कॅल्शियम, फॉस्फरसचे चांगले प्रमाण, पशू व कोंबडीसाठी पेंड उत्तम खाद्य.१) हवामान :-
तिळ या पिकाची फुले, फळधारणेसाठी २६ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानात चांगली वाढ होते. चांगल्या उगवणीसाठी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस; तर पिकांच्या कायिक वाढीसाठी २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान लागते. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते.
२) जमीन :-
वाळूमिश्रित पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पिकाची चांगली वाढ होते. त्याचप्रमाणे सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ इतका असावा. निचरा न होणाऱ्या पाणथळ जमिनीत तिळाचे पीक चांगले वाढत नाही.
३) पूर्वमशागत :- पेरणी करण्यासाठी एक नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
४) बीजप्रक्रिया :- बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिकिलो बियाणास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम अशी प्रक्रिया करावी. व त्यानंतर प्रतिकिलो बियाणास अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.
५) जात :-
अ)) एकेटी-१०१ :-
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली एकेटी-१०१ जात ९० ते ९५ दिवसांत पक्व होते. दाण्याचा रंग पांढरा असतो. प्रतिहेक्टरी ७.५ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते. पर्णगुच्छ, मूळ आणि खोड कुजव्या रोगास साधारण प्रतिकारक असते. तेलाचे प्रमाण ४८ ते ४९ टक्के असते.
६) बियाणे व पेरणी :- जानेवारीचा दुसरा आठवडा ते फेब्रुवारीच्या दुसरा आठवड्यापर्यंत पेरणी करावी. पेरणीसाठी उत्तम प्रतीचे २.५ ते ३ किलो प्रतिहेक्टरी बियाणे वापरून पेरणी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर पाभरीने करावी. पाभरीने पेरणी करत असताना बारीक वाळू किंवा चाळून घेतलेले गांडूळखत किंवा शेणखतात मिसळून पेरल्याने बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होऊन एकसारख्या प्रमाणात पडते. पेरणी ४५ सें.मी. अंतरावर असल्यास विरळणी ओळीतील दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून करावी. पेरणी ३० सें.मी. अंतरावर केली असल्यास विरळणी १५ सें.मी. अंतर ठेवून करावी. विरळणी पेरणीनंतर २१ दिवसांनी करावी. २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो म्हणून योग्य ती काळजी घ्यावी.
६) खत व्यवस्थापन :- ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत हेक्टरी जमिनीत शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले मिसळून घ्यावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद
देण्यात यावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी नत्राचा अर्धा हप्ता २५ किलो नत्र देऊन पाणी द्यावे. अधिक उत्पादनासाठी २ टक्के युरीयाची फवारणी पिक फुलो-यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असतांना करावी.
७) आंतरमशागत :- रोप अवस्थेत असताना हे पीक नाजूक असल्याने ते तणांबरोबर जमिनीत ओलावा व अन्नद्रव्यांशी स्पर्धा करू शकत नसल्यामुळे तिळाचे क्षेत्र तणविरहित ठेवावे. म्हणून पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली निंदणी व कोळपणी आणि पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दुसरी निंदणी व कोळपणी करून घ्यावी.
८) पाणी व्यवस्थापन :- . मुख्यतः फुले येण्याच्या कालावधीत नवे बोंड्या भरण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. गरजेप्रमाणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तीळ पिकास जमिनीच्या मगदुरानुसार सरासरी ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देण्यात याव्यात.
९) पीक सरंक्षण :-
१) पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा फेन्व्हलरेट २०% प्रवाही २५० मिली किंवा ५० % कार्बेरील पावडर २ किलो प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) पानावरील ठिपके (अल्टरनारीया/सरस्कोस्पोरा) व अणूजीव करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास मॅन्कोझेब ७५% १.२५ किलो + स्ट्रेप्टोसायक्लीन ५० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोरॉईड १.२५ किलो + स्ट्रेप्टोसायक्लीन ५० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
१०) काढणी :- ज्यावेळी ७५ % पानाचा व खोडाचा रंग पिवळसर झालेला असतो, तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९५ दिवसात पीक काढणीस येते. जर काढणी लवकर केली तर बोंडातील तीळ पोचट व बारीक राहुन उत्पादनात घट येते, तसेच काढणी उशिरा केल्यास बोंडे फुटून तीळ शेतात गळून पडते आणि उत्पादनात घट येते, म्हणून वेळेवर काढणी करावी.
११) उत्पादन :- तिळाचे प्रतिहेक्टरी ७.५ ते ८ क्विंटल उत्पादन घेता येते.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!