खजूर शेती

2

खजुराचे झाड थोडेफार नारळाच्या झाडाशी मिळते-जुळते असते. या झाडाची उंची सर्वसाधारणपणे ६० ते ७० फुट असते. या झाडाचे खोड उंच व सरळ वाढते. या झाडाच्या फक्त टोकाशीच फांद्यांचा झुपका असतो. तसेच खोडावर भरपूर खाचा असतात त्या गळून पडलेल्या पानांच्या बुडापासून झालेल्या असतात. खोड पोकळ असते. पाने टणक व टोकाला अणकुचीदार असतात. तसेच ३ ते ४ फुट लांब असतात.

खजुराच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे विभक्तलिंगी झाडांची निर्मिति. ह्यात स्त्री आणि पुरुष अशी दोन प्रकारची झाडे असतात त्यातील पुरुष लिंगी झाडे ही परागकण निर्मिती करतात तर स्त्रीलिंगी झाडे फळांचे उत्पादन करतात. दोन उत्कृष्ट प्रकारच्या पुरुष वर्गातील झाडांचे परागकण हे साधारणपणे पन्नास स्त्री वर्गातील झाडांच्या परागीकरणासाठी पुरेसे ठरतात. एका मादी झाडावर साधारणपणे १०-१५ फुलोरे येतात; त्यांपैकी काही लहान तुरे तोडून टाकतात त्यामुळे राहिलेल्या तुऱ्यांवर चांगली फळे येतात. या झाडांचे परागण (परागसिंचन) वाऱ्यामुळे होते. नर झाडे माद्यांच्या संख्येच्या मानाने कमी असतात. कृत्रिम रीत्या पुं-पुष्पाची स्थूलकणिशे स्त्री-पुष्पांवर बांधून परागण घडवितात. हे परागकण गोळा करून कागदाच्या पुडीत काळजीपूर्वक ठेवल्यास त्याचा उपयोग निदान एक वर्षभर करता येतो. हंगामाव्यतिरिक्त फुलणाऱ्या झाडांच्या परागणास त्यांचा उपयोग होतो. सिंध प्रांतात साधारणत: २० फेब्रुवारी ते ३० मार्चपर्यंत कृत्रिमपणे असे परागण करतात.

 

जमीन :

जमिनीच्या बाबतीत खजुरीचे झाड फारसे चिकित्सेखोर नाही. या पिकाला सुपीक जमिनीची गरज नसते. कोणतीही जमीन चालणारे हे झाड रेताड, वाळवंटी जमिनीत चांगले येते व फळही लवकर पिकते. मातीच्या वरच्या थरामध्ये क्षाराचे प्रमाण शेंकडा ३-४ पर्यंत असले तरी झाड बिघडत नाही; पण त्याला फळ मात्र येत नाहीं. फळ येण्यासाठी झाडाच्या मुळ्या बर्‍याच खोल जाऊन तेथील क्षारांचे प्रमाण शेकडा अर्धा इतके उतरावयास पाहिजे.

लागवड :

खजूर लागवड करण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात किंवा मार्च-मे महिन्यात 1x1x1 मी. लांब रुंद व खोल खड्ड्यामध्ये वरच्या थरातील माती, रेती व सेंद्रिय पदार्थ 3:1:1 प्रमाणात टाकून साधारणता: 7×7 मी. अंतरावर खजूर (झाडाची) रोपांची लागवड करावी.

रोपांची निवड :

खजूर रोपांची (निर्मिती) अभिवृद्धी बियांपासून तसेच शाखीय पद्धतीने (सकर्स) पासून करता येते. खजूर पिक हे द्विलिंगी पिक आहे म्हणजे बियांपासून अभिवृद्धी केल्यास 50% रोपे मादी वृक्षाचे व 50% रोपे नरवृक्षाचे तयार होतात. अशा रोपांपासून लागवड केल्यास 5-6 वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते, तसेच 50% झाडे नरांचे असल्यामुळे उत्पादन देत नसल्यामुळे उपटून टाकावी लागतात हि संभाव्य अडचण टाळण्यासाठी बियांपासून अभिवृद्धी न करता, सकर्स पासून लागवड करतात. साधारणता: 10-30 सें.मी. व्यास असलेले व 15-30 किलो. वजन असलेले सकर्स लागवडीसाठी वापरल्यास 80-90 % यशस्वी होण्याचे प्रमाण असते.

जाती :

खजुराच्या ३००० जाती असून त्यातील ४०० इराणमध्ये, २५० टयुनिशियात, ३७० इराकमध्ये आहेत. यापैकी फक्त १५९ जाती व्यावसायिक शेतीसाठी उपयुक्त आहेत.

खजुराच्या जातींची तीन प्रकारात विभागणी केली जाते, ती अशी

१) नरम खजूर : अत्यंत नरम गर ज्यात भरपूर ओलावा आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असलेला. ह्या प्रकारातील प्रमुख जाती – खलास कासीम, खलास खर्ज, इ.

२) अर्ध-सुकलेले खजूर : थोडासा कडक गर ज्यात किंचित ओलावा आणि साखरेचे प्रमाण भरपूर असलेला. ह्या प्रकारातील प्रमुख जाती – अजवा, अनबरा, बार्नी, इ.

३) पूर्ण सुकलेले खजुर : कडक असा गर ज्यात साखरेचे प्रमाण भरपूर. ह्या प्रकारातील प्रमुख जाती – रुथाना,  सुक्करी, इ.

भारतात प्रामुख्याने बारही, दायरी, डेग्लेट नूर, हिलावी, खुदाची, जाहिदी, सैदी, मक्तूम, मेजदूल, थुरी, खस्तावी, सायेर, इ. जातींचे खजूर आढळतात. विविध प्रकारच्या जातींचे खजूर हे प्रामुख्याने झाडाच्या पानाच्या आकारावरून, बुंध्यावरून ओळखले जातात.

 

उतीसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपांचे फायदे :

उतीसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे अनुवांशिकदृष्ट्या स्थायी स्वरुपात असतात, तसेच जास्तीत जास्त प्रमाणात एकाच वेळात तसेच कमी वेळात तयार करता येतात. याउलट, सकर्सपासून लागवड केल्यास खजूर झाडांचे यशस्वी होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. 35% पेक्षा देखील कमी असते. तर बियांपासून लागवड केल्यास 50% नराच्या झाडांचे प्रमाण असते, आर्थिकदृष्ट्या व उत्पादांनाच्या दृष्टीने 50% तोटा होत असतो. याउलट बर्ही, मेदजुल, शरण इ. सारख्या जातींचे उतीसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे साधारणता: 9×9 मी. अंतरावर लागवड केल्यास खजूर झाडाला 3 वर्षात फळे (खारीक) येण्यास सुरुवात होते. उतीसंवर्धन पद्धतीने तयार केलेले रोपे 52 अंश सें पर्यत तापमानास तग धरून राहतात.

 

खजूर झाडांमधील फळधारणा :

खजूर झाड हे जनुकीय शास्त्रीय दृष्ट्या द्विलिंगी आहे, म्हणजे नर फुलांचे झाड व मादी फुलांचे झाड वेगवेगळे असतात. नरांच्या झाडांचे कार्य मादी फुलाच्या परागीभवनासाठी व फलण प्रक्रियेसाठी मह्त्वाचे असते. साधारणता: 100 मादी झाडांसाठी 2-3 नर झाडे पुरेपूर ठरतात. परागीभावत व फलन प्रक्रिया झाली तरच खारीक तयार होते.

 

घडांवर फळांची संख्या व झाडावर घडांची संख्या निश्चित करणे :

पुढील वर्षच्या फलधारणेसाठी चालू वर्षात झाडावर घडांची व घडांमध्ये फळाची संख्या निश्चित ठेवणे गरजेचे असते. जेणेकरून घडांची संरचना मोकळी होईल घटट होणार नाही. जातीपरत्वे झाडावर घड व घडांमध्ये फळांची संख्यांना नियंत्रित करावी लागते. साधारणता: 5 वर्षाच्या झाडावर 3-5 घड संख्या निश्चित करावी. भारतीय (वातावरनात) हवामानानुसार एक झाडावर 8-10 घड पण ठेऊ शकतो. 1300-1600 खारीक फळे एका झाडावर नियंत्रित करू शकतो.

अतिरिक्त घडांची विरळणी :

अतिरिक्त गदांतील फळांच्या संख्या नियंत्रित करण्यासाठी, घडातील आतील बाजूच्या स्ट्रँडची विरळणी करावी. अथवा जातीनिहाय, 1/3 किंवा 1/2 स्ट्रँड कट करून फुले काढून टाकावीत अशाप्रकारे जातीनुसार 25-50% घडांची विरळणी करावी.

खजूर अर्थकारण :

  • 7×7 मीटर अंतरासाठी उतीसंवर्धित 82 रोपे तर7×7 मीटर अंतरासाठी 50 रोपे लागतात.
  • रोपांची किंमत जातीनिहाय वेगवेगळी असते, साधरणत: 3500 ते 4500 रुपये प्रतिझाड. झाडांच्या संख्येनुसार 75 लाख ते 3.70 लाख रुपयांपर्यंत रोपांसाठी खर्च येऊ शकते.
  • तिसऱ्या वर्षापासून उत्पादनाला सुत्वत होते. उत्पादनाच्या पहिल्या वर्षी प्रतीझाड 30 किलो ओली खारीक, दुसऱ्या वर्षी 50 किलो तर तिसऱ्या वर्षी 200 किलो खारीक मिळते.
  • ओली खारीक प्रतिकिलो 100 ते 200 रुपये दराने विकली जाते. यात जातीनिहाय व बाजार भावानुसार फरक होऊ शकतो, पाच वर्षानंतर प्रतिझाड 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

https://krushisamrat.com/successful-farming-will-move-towards-the-earth-revolution/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. Sitafal Sheti

    […] खजूर शेती […]

Leave A Reply

Your email address will not be published.