• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 27, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

काकडीवर्गीय पिकांची शेती

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
January 25, 2019
in शेती
0
काकडीवर्गीय पिकांची शेती
Share on FacebookShare on WhatsApp

काकडीवर्गीय फळभाजंचा वापर अन्नपदार्थात आपण नेहमी करत असतो. या वेलींवर उगवणार्‍या फळभाज्या आपल्या स्वास्थ्यासाठी, शरीरासाठी उपयुक्‍त असतात. कारण यात औषधी गुणधर्म असतात. घराभोवती, अंगणातील परसबागेत, शेतामध्ये, बांधावर, कुंपणावर आपण या काकडीवर्गीय फळभाज्यांच्या वेली चढवू शकतो. व्यावसायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात यांचे पीक घेतले जाते. काकडी, खिरा (वाळूक), खरबूज, कलिंगड, कारली, काशीफळ भोपळा, साधा भोपळा, दुधी भोपळा, तोंडली, पडवळ, दोडका, कोहळा या सर्वांच्या वेली असतात. यांच्या लागवडीसाठी हवामान, जलसिंचन, माती, पेरणी, खते यांची माहिती पुढे देत आहोत.

खिरा (वाळूक)
खिर्‍याला काही भागात काकडी म्हणतात तर कोणी वाळूक म्हणतात. यावर मृदू काटे असतात. भारतात सर्वत्र खिरा पिकवला व खाल्‍ला जातो. प्रांतानुसार व हवामानानुसार याच्या आकारात व रंगात फरक असतो.खिरा फळ वेलीवर उगवते. खिर्‍याची वेल भिंतीवर, कुंपणावर वा शेताच्या बांधाव चढवली /वाढवली जाते. खिरा हा भाजी व कोशिंबिरीत वापरतात. काहीजण औषध म्हणून याचा वापर करतात. खिरा जाड सालीचा व पातळ सालीचा असतो.खिर्‍याचे बी मिठाई, पक्‍वान्नांत व औषधांत वापरतात.

खिरा जाती ः-
उन्हाळी पीक व पावसाळी पीक अशा दोन प्रकारांत खिर्‍याचा उल्‍लेख केला जातो. उन्हाळी खिर्‍याला फार्किन असे नाव आहे. या वेली भरपूर वाढतात, पण फळे मोठी नसतात. पासाळी खिरा मात्र वजनाने जास्त व आकाराने मोठा असतो.
माती कशी असावी?
खिर्‍याला माती कशीही असली तरी त्यात याचा वेल उगवतो. पण भरपूर फळे येण्यासाठी माती रेताड व ओलसर असावी. अशा रेताड मातीत वेल लवकर फोफावतो.

जल/वायू ः
खिर्‍यासाठी उष्ण हवामान उपयुक्‍त असते. कलिंगडासाठी तर कडक उन्हाळा अपेक्षित असतो. बी लावण्यासाठी मातीचे गादी वाफे किंवा शेताचे बांध योग्य असतात.

खिर्‍याची पेरणी ः-
बी पेरणीसाठी मातीचे वाफे (सर्‍या) तयार करून त्यात बीजारोपण करावे. दोन सर्‍यांमध्ये 130 ते 140 सें.मी. अंतर ठेवावे.

पेरणीची वेळ ः-
खिर्‍याच्या वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळा वेळ / महिने निवडले जातात. फेब्रुवारी-मार्च दरम्यान उन्हाळी जाती लावतात. पावसाळी पिकासाठी मे-जून दरम्यान पेरणी करतात. उन्हाळी खिर्‍यासाठी खूप देखभाल करावी लागते. पावसाळी पिकाला देशभालीची जास्त गरज नसते. उन्हाळ्यात वेली कोमेजण्याची भीती असते. त्यासाठी जलसिंचन काळजीपूर्वक, वेळेवर करावे लागते. वेल, वेलीची मुळे व जमीन कोरडी पडू देऊ नये.

उत्पन्न ः-
पेरणीनंतर अवघ्या दोन महिन्यात फळे काढणीला सुरुवात होते. दिवसाआड किंवा दोन दिवसांआड फळे काढतात. खिर्‍याच्या वेलीला दोन महिने फळे येत राहतात. एक हेक्टर शेतामधून 90 ते 105 क्‍विंटल फळे मिळतात. यांना चांगला भाव मिळतो.

थोडक्यात महत्त्वाचे ः-
1) खिरा वेगवेगळ्या प्रांतांत आकार व रंग यात फरक असलेला असतो. मद्रासमध्ये याला मंडोसा म्हणतात.
2) सिक्‍कीममधील खिरा गुणवत्तेला कमी असतो. हा अधिक काळापर्यंत टिकतो. याला लाल भुरकट रंग असतो. वजनही जास्त आणि आकाराने मोठे फळ असते.
3) लांबट, हिरवेगार खिरा फळ उत्तर भारतात आढळते.
4) इतर प्रांतात तेथील स्थानिक जाती पिकवल्या जातात.
खरबूज
1) खरबूज हे एक गोड फळ आहे. काही प्रांतांत याची भाजी केली जाते. बहुतेकदा खरबूज गोड असते, तर काही सपकही असतात.
2) शेत जमिनीचे सपाटीकरण करून खरबुजाच्या बिया पेरतात.
3) खरबुजाची रोपटी उगवतात मग त्याच्या वेली होतात. वेली खूप पसरतात म्हणून बीजारोपण करतानाच जास्त अंतर ठेवतात.
4) खरबूज अनेक आकारात मिळते, रंगही हिरवट, पिवळा असू शकतो. काही खडबडीत सालीचे असतात. तर काही खरबुजांवर रेघा असतात.
5) खरबुजाच्या बिया वाळवून सोलतात व त्याचा गर मिठाईत, पक्‍वान्नांत वापरतात. खरबूज औषधी गुणधर्माचा असतो. खरबूज खाऊन लगेच पाणी पिऊ नये.
6) खरबुजाचे बीजारोपण जानेवारी महिन्यात करतात आणि थंडीत याच्या वेली वाढतात. हे उन्हाळी पीक मानले जाते. याच्या लहान रोपट्यांना धुके मानवत नाही.
7) बी पेरल्यानंतर तीन महिन्यांत फळे तोडणीला येतात. वेलीपासून दोन महिने फळे मिळत राहतात.
8) खरबुजाला तेलगू भाषेत कस्तुरा म्हणतात. बंगाली भाषेत खरमुज, आसामी भाषेत चीरन तर कानडीत केक्‍करिके म्हणतात.
9) खरबूज गोड, चवदार व उष्म्यापासून बचाव करणारे फळ आहे, जेवणानंतर खरबूज खावे.
10 ) पठारी, डोंगरी प्रदेशातही खरबूज पिकवले जाते. रेताड जमीन, नदी, तलावाच्या काठी गाळाच्या मातीत खरबूज भरपूर फळे देते.
11) थंडीत वा पावसाळ्यात खरबुजाची पेरणी करू नये. शेती असफल होते.
12) अंगणातील परसबागेत, कुंपणाच्या वा तात्पुरत्या मांडवाच्या आधाराने खरबुजाची वेल वाढवता येते.
13) खरबूज शेतात पिकवायचे असल्यास शेत जमीन खोलवर नांगरून घ्यावी. मातीत कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर जमीन सपाट करावी. माती जेवढी मऊ, नरम असेल तेवढे लवकर अंकुरण होते.
14 ) बी लावण्यासाठी 35 ते 40 सें.मी. चा खड्डा करावा. त्यात खत टाकून थोडी मातीही टाकावी व बी पेरावे. वरून माती टाकावी व हलकेच दाबावी.
15 ) बी पेरल्यानंतर जलसिंचन करावे. दर तीन दिवसांनी जलसिंचन करणे आवश्यक असते.
16) रोपे उगवून आल्यानंतर भांगलण करावी. अनावश्यक गवत पालापाचोळा काढून टाकावा.
17 ) खरबुजाच्या बिया वाळवून साठवाव्यात.

कलिंगड
पिकलेले कलिंगड कच्चे खातात. हे थंड, गोड, रसदार फळ आहे. या फळात पाण्याचे प्रमाण जास्त असते. कलिंगड जेवढे लालभडक असेल, तेवढे गोड असते. कलिंगड हे उन्हाळी पीक आहे. उन्हाळ्यात तनामनाला प्रसन्नता व थंडावा देणारे हे फळ अतिशय लोकप्रिय आहे. याच्या बिया वाळवून त्या फोडतात व त्यातील गर मिठाईत व पक्‍वान्नांत वापरला जातो. काही जण कलिंगडाचा ज्यूस(रस) पितात. कलिंगड शरीरातील उष्णता कमी करते म्हणून ते औषधी मानले जाते.

कलिंगडाची शेती ः-
कलिंगड भारतात सर्वत्र पिकवले जाते. परंतु हवामानानुसार हे कोठे जास्त पिकते तर कोठे कमी. हौशी माणसे हे घराजवळील परसबागेतही लावतात. रेताड, ओलसर जमिनीत कलिंगड भरपूर पिकते. म्हणून नदी-तलावाकाठच्या रेताड जमिनीत कलिंगडाचे बी लावतात. पाण्याची सोय असेल तर डोंगराळ भागातही याचे उत्पन्न घेतले जाते.

पेरणी केव्हा करतात?
कलिंगडाची पेरणी उन्हाळ्यात करतात. फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत भारतात कलिंगडाची पेरणी चालते. हवामान, पाण्याची उपलब्धता यासाठी विचारात घेतली जाते. डोंगरी क्षेत्रात फेब्रुवारी ते मार्चमध्ये बीजारोपण केले जाते.

शेतजमिनीची तयारी ः-
शेत जमीन खणून घ्यावी. खोलवर खणलेल्या शेताच्या मातीत कुजलेले शेणखत चांगले मिसळून जमीन समतल करून घ्यावी. मग कलिंगडाच्या बिया पेरण्यासाठी खड्डे खणावेत. खड्डे योग्य अंतरावर असावेत. म्हणजे वेलींना पसरण्यासाठी भरपूर जागा मिळेल. प्रत्येक खड्ड्यात 2-3 बिया टाकाव्यात. वरून माती लोटत्तवी. माती दाबू नये. बीजारोपणानंतर जलसिंचन करावे. 7 ते 8 दिवसानंतर बी अंकुरते व रोपटे जमिनीवर दिसू लागेल. जलसिंचन दर तीन दिवसांनी करावे. जमीन कोरडी पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

भांगलण ः-
कलिंगडाची रोपटी चांगली वाढल्यानंतर भांगलण करावी. भांगलण करताना मुळांना धक्‍का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. जमीन ओलसर राहू द्यावी. वेलीमध्ये कचरा, पालापाचोळा, गवत साचू देऊ नये. कचरा वेचून शेत/बाग स्वच्छ ठेवावी. फळे-फुले येऊ लागली की, भांगलण करण्याची गरज नसते. जलसिंचन करत राहावे पण शेतात/बागेत पाणी साचू देऊ नये. कलिंगड जेव्हा पिकते तेव्हा ते स्वतःच वेलीपासून वेगळे होते.

कलिंगडाचे बी ः-
कलिंगड वेलीवर पिकून जेव्हा स्वतः वेगळे होते तेव्हा ते घ्यावे. कलिंगडातील बी जेवढे काळे तेवढे ते पुष्ट असते. कलिंगडाचा लाल गर खाऊन त्याच्या बिया धुवून, वाळवून ठेवाव्यात.

काकडी
काकडी आणि खिरा यांत फार थोडा फरक आहे. काकडी पातळ व लांबट असते. काकडी जेवढी कोवळी असेल तेवढी ती चवदार व स्वादिष्ट असते. काकडी सोलून मीठ लावून खातात तसेच काकडीची कोशिंबीर केली जाते. काकडी जाड व जुनवट झाली की तिची चव कमी होेते. काकडीसुद्धा कलिंगड, खरबुजाप्रमाणे शरीराला थंडावा देणारी आहे.

काकडीची लागवड ः-
काकडीची लागवड मैदानी व डोंगरी प्रदेशात पाणयाची सोय पाहून केली जाते. जमीन रेताड व ओलसर असावी लागते. नदी तलावाकाठी काकडीच्या वेली चांगल्या फोफावतात व फळेही भरपूर येतात. घराजवळच्या परसबागेत, कुंपणावर काकडीची वेल वाढवली जाते.
काकडीची लागवड वैशाख महिन्यात वसंतऋतूच्या दरम्यान करतात. पावसाळ्यात किंवा थंडीच्या महिन्यात काकडीची लागवड करत नाहीत. फेब्रुवारी ते एप्रिल हे महिने लागवडीस योग्य असतात.

पेरणी ः-
1) काकडीची वेल आधाराशिवाय वाढत नाही. त्यामुळे आधार देऊन किंवा आधाराची सोय पाहून काकडभचे बी रोपले जाते.
2) 35 ते 40 सें.मी. अंतराचे चर मातीत खणून त्यात शेणखत मिसळावे. माती व शेणखत एकत्र करून माती भुरभुरीत करावी व नंतर समतल करावी.
3) बिया पेरतानाच 2-3 पेराव्यात. एका जागी बी पेरणीपासून 35 ते 40 सें.मी. अंतरावर दुसरी पेरणी करावी. असा अंतराअंतराचा पेरणीक्रम असावा.
4) रोपटी उगवून आल्यानंतर दमदार रोपटी ठेवावीत. कमजोर रोपटी काढून टाकावीत.
5) बीजारोपणानंतर हलकेसे जलसिंचन करावे. जमीन ओलसर असेल तर जलसिंचन करू नये.

भांगलण ः-
1) बी अंकुरल्यानंतर रोपटी जमिनीवर दिसू लागताच हलक्या हाताने भांगलण करावी. अनावश्यक गवत, पालापाचोळा काढून टाकावा. भांगलण करताना रोपट्याच्या मुळांना धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
2) रोपट्यांना, वेलींना व फळांना कीड किंवा रोग होऊ नयेत याची दक्षता घ्यावी.

बीजाची साठवण ः-
1) काकडीचे बी औषधासाठी वापरता येते. तसेच अन्नपदार्थात, मिठाईत व पक्‍वान्नांत काकडभचे बी वापरतात.
2) काकडी खूप पिकली व जुनवट झाली की तिच्यातील बियासुद्धा पिकतात व साठवणीस योग्य होतात. या बिया धुवून, वाळवून ठेवता येतात.
कारले
1) कारले एक चांगली गुणकारी भाजी आहे. काही शारीरिक रोगांवर कारल्याचा रस सेवन केला जातो. याची चव तुरट, कडू असते. तरीही याची भाजी शिजवून खाल्‍ली जाते.
2) कारल्याचे लोणचेही करतात.
3 ) कारले आरोग्यलाभ करवते. रक्‍तशुद्धीसाठी कारले खातात.

पेरणीचा काळ ः-
1) उन्हाळा असो वा पावसाळा, कारल्याची पेरणी शक्य असते. भारताच्या काही प्रांतांत थंडीतही कारल्याची पेरणी करतात.
2) डोंगरी प्रदेशात 15 फेब्रुवारी ते 15 मे पर्यंत पेरणी केली जाते.
3) मैदानी/पठारी प्रदेशात जानेवारी ते ऑगस्ट अखेर पेरणी होते.
शेतजमीन कशी असावी?
शेत जमीन कशीही असली तरी कालर्‍याचीवेल सहज उगवते. पण जमीन खडकाळ, मुरमाड असेल तर मात्र पीक कमी येते. चांगल्या पिकासाइी मऊ, रेताड, ओलसर माती योग्य मानली जाते.

पेरणी कशी करावी?
1) कारल्याची वेल नाजूक असते. तिला आधार द्यावा लागतो. ती खूप पसरते. मांडव घालून किंवा इतर झाडांवर , कुंपणावर ती चढवावी लागते.
2) कारल्यासाठी दोन वेहा जमीन नांगरून घ्यावी. ढेकळे फोडून माती मऊ करावी. त्यात शेणखत वा कम्पोस्ट खत एकजीव करावे. 25 ते 30 सें.मी. अंतरावर छिद्रे पाडून त्यात 2-3 बिया टाकाव्यात व छिद्र मातीने झाकावे.
3) बिया जमिनीत 5 ते 6 सें.मी. खोल छिद्रात टत्तकाव्यात. वर माती टाकावी पण माती दाबू नये.
जलसिंचन ः-
बिया पेरल्यानंतर हलकेसे जलसिंचन करावे. माती नेहमी नरम व ओली राहिली पाहिजे. दर तीन दिवसांनी जलसिंचन करावे.
भांगलण ः-
अ) रोप उगवून आल्यानंतर त्याला चांगली उभारी दिसल्यावरच भांगलण करावी. मुळांना धक्‍का लागल्यास रोपटे कोमेजते.
ब) रोपट्याला सांभाळत खुरपणी करावी व काडीकचरा, गवत काढावे. आधारासाठी रोपट्याजवळ काठ्या उभ्या कराव्यात.

थोडक्यात महत्त्वाचे ः-
अ) कारल्याचा वेल जमिनीवर पसरू देऊ नये. सुरुवातीपासूनच त्याला आधार द्यावा.
ब) वेलीवर करली तयार होताच काहजीपूर्वक तोडा. वेलीला इजा होणार नाही याची दक्षता घ्या. धारदार चाकूने फळे काढू शकता.
क) घरच्या परसबागेतील कारल्याच्या वेलाला दररोज थोडेथोडे पाणी टाकत राहावे.
ड) वेलीवरची वाळलेली, सडकी पाने कात्रीने कापून टाका. त्यामुळे वेलीला हवा. पाणी, खत मिळण्यात अडचण होत नाही व वेल वाढत राहील.
कीड व रोगापासून बचाव ः-
1) कारल्याच्या वेलीला व फळांना कीड लावू नये या करिता कीटकनाशक फवारावे.
2) पानाची वाढ खुंटली, पाने कोमेजू लागली तर वेल रोगाला बळी पडतेय असे समजावे व उपाय योजना करावी.

बिया साठवणे ः-
वेलीवरील जे कारले मोठे व स्वस्थ असेल ते वेलीवरच पिकू द्यावे. कारले पिकून लाल होते. ते वेलीवर लाल होऊन फुटण्याच्या (उकलायच्या) बेतात आले की ते तोडावे. त्याच्या बिया काढून धुवाव्यात व वाळवाव्यात. पुढल्या पेरणीला त्या वापरता येतात.

दुधी भोपळा
दुधी भोपळा अंडाकार, लांबट, गोलाकारही असू शकतो. हिंदी भाषेत याला लौकी म्हणतात. याचा दुधी हलवा आवडीने खाल्‍ला जातो . दुधी भोपळा पचायला हलका असतो. जंगली दुधी भोपळा औषधी मानला जातो. दुधी भोपळ्यापासून रायते, हलवा, कोफ्ता, पराठेही बनवले जातात. दुधी भोपळा एक स्वस्त व सहज मिळणारी फळभाजी आहे.

जल/वायू ः-
दुधी भोपळ्याला समशीतोष्ण हवामान मानवते. धुके, गारठा याच्या वाढीवर दुष्परिणाम करतो. थंडीत फळांची वाढ होत नाही. रोग, कीड, पाऊस, गारपीट, दुधी भोपळ्याचे खूप नुकसान करते. जेथे कोरडे, दमट हवामान असते तेथे दुधी भोपळा वर्षभर पिकवला जातो.

शेत जमीन ः-
ज्या जमिनीत नैसर्गिक खताचे प्रमाण अधिक असते, तसेच जी जमीन ओलसर, दमट असेल अशा जमिनीत दुधी भोपळ्याच्या वेली अधिक फोफावतात व पीक चांगले येते. चिकणमाती असेल पण पाण्याचा निचरा होत असेल अशा जमिनीतसुद्धा दुधी भोपळा चांगला पिकतो. जमिनीत खडे, मुरमाड माती असेल तर दुधी भोपळ्याची व्यवस्थित वाढ होत नाही. कारण मुळे मातीची पकड घेऊ शकत नाहीत. अशा जमिनीत खडे खून खत मिसळलेली माती टाकावी व बीजारोपण करावे. जमीन नांगरून माती मऊ करावी व सर्‍या काढून बी पेरावे. त्यावर खतमिश्रित माती पसरावी. बिया पेरल्यानंतर जलसिंचन करावे. बिया अंतर ठेवून पेराव्यात कारण वेल वाढल्यावर त्यांना अडचण होता कामा नये. त्यांना पसरण्यास जागा ठेवावी.

पेरणीचा काळ ः-
दुधी भोपळा हे उन्हाळी पीक आहे. म्हणून हिवाळ्याचया अखेरीस दुधी भोपळ्याच्या बिया शेतात/परसबागेत पेरतात. गोलाकार दुधी भोपळ्याच्या बिया उन्हाळ्याच्या सुरुवातीला पेरतात. मैदानी प्रदेशात वसंत ऋतूच्या दरम्यान बीजारोपण केले जाते. काही प्रदेशात ऑक्टोबर महिन्यात बी पेरून हिवाळ्यात पीक काढले जाते.
दुधी भोपळ्याच्या वेली आधाराने वाढणार्‍या असल्यामुळे कुंपण, झाडीझुडपे, मांडव, भिंत वा काठ्यांच्या आधाराने वर चढवल्या जातात. पसरबागेत कुंडीत दुधी भोपळ्याचा वेल वाढवून तो मांडवावर पसरवता येतो.
थंंडीत लावलेल्या दुधी भोपळ्याला जास्त पाणी देऊ नये. तसेच उन्हाळी दुधी भोपळ्याला पाण्याची तूट पडू देऊ नये.

भांगलण ः-
बी अंकुरल्यानंतर रेापटे वाढू लागते. ते स्वस्थ व टिकावू दिसू लागल्यानंतर भांगलण करून शेत स्वच्छ करावे. गवत, काडीकचरा काढून टाकावा. मुळे उघडी पडली असल्यास त्यावर माती टाकावी. रोपटे तग धरत असताना त्याला थंडी व धुके यापासून सुरक्षित ठेवावे.

दुधी भोपळ्याच्या जाती ः-
पुसा मंजिरी, पुसा मेघदूत, अर्का बहार, पुसा समर प्रोलिफिक इत्यादी दुधी भोपळ्याच्या जाती प्रसिद्ध आहेत.

उत्पन्न ः
प्रति हेक्टार 160 ते 190 क्‍विंटल दुधी भोपळा मिळतो.

बी उत्पादन ः-
दुधी भोपळ्याच्या बिया मिळवण्यासाठी शेती केली असेल तर पुढील सूचना पाळा.
1) दोन प्रकारच्या जाती शेतात लावणार असाल तर दोन जातीच्या पिकांमध्ये 700 ते 800 मीटरचे अंतर ठेवावे.
2) एकाच ठिकाणी जास्त रोपटी उगवली असता, त्यातील अशक्‍त, कमजोर रोपटी काढून टाका.
3) रोग व कीड पडू नये यासाठी कीटकनाशक फवारावे.

काशीफळ (भोपळा)
काशीफळ कच्चा हिरवा असो, वा पिकलेला पिवळा दोन्ही प्रकारांत तो भाजी म्हणून शिजवून खाल्‍ला जातो. लग्‍न समारंभ असो वा सहमोजनाचे प्रयोजन, तेथे काशीफळ भोपळा हवाच. याचे मिष्टान्नही तयार करतात.

जल/वायू ः-
उन्हाळा, पावसाळा या दोन्ही ऋतूंत काशीफळ पिकवले जाते. परंतु वसंतऋुतूंत विशेष प्रमाणात लागवड केली जाते.

काशीफळच्या जाती ः-
कोईमतूर-1, कोईमतूर-2, सोलन बदामी, पुसा विश्‍वास, अर्का सूर्यमुखी, अर्का चंदन या जाती अधिक पिकवल्या जातात.

पेरणी कशी व केव्हा ?
डोगरत्तळ प्रदेशात मार्च-एप्रिल दरम्यान बीजारोपण केले जाते. पठारी प्रदेशात जानेवारी ते एप्रिलपर्यंत पेरणी करतात. काही अनुभवी ेशतकरी बटाटा पिकाबरोबर बांधावर काशीफळाच्या बिया पेरतात. यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर हा काळ चांगला समजतात. काशीफळ भोपळ्याला धुके, धुरके नुकसान करणारे असते.

शेजजमीन कशी ?
बिया लावण्यासाठी 25 ते 30 सें.मी. खोलीचे खड्डे घ्यावेत. त्यात माती व खत एकत्र करून भरावे. दोन सर्‍यांमध्ये दोन ते अडीच मीटर अंतर ठेवावे. तसेच देान पेरणीत (बियांमध्ये) 70 ते 80 सें.मी. अंतर असावे. या खत भरल्या खड्ड्यांच्या तळाशी 2-3 बिया टाकाव्यात. रोपटी उगवून आल्यानंतर तयातील अशक्‍त व कमजोर रोपटी काढून टाकावीत.

खते व रासायनिक खते ः-
खतांच्या वापराबद्दल कृषीतज्ज्ञांचे सल्‍ले पुढीलप्रमाणे
1) काशीफळाची शेती करण्यासाठी शेतात 550 क्‍विंटल शेणखत प्रति हेक्टर टाकावे. तीन वेळा नांगरट करून शेणखत मातीत चांगले मिळसावे. म्हणजे माती हलकी व भुरभुरीत होईल. नंतर पेरणी करावी.
2) शेतात 70 ते 75 किलोग्रॅम नायट्रोजन, 75 ते 80 किलोग्रॅम फॉस्फेट, 75 ते 80 किलोग्रॅम पोटॅश तसेच 25 ते 30 किलोग्रॅम कॅल्शियम एकत्र मिसळून टाकावे. हे प्रति हेक्टरी प्रमाण आहे. या खतांमुळे भरपूर उत्पन्न मिळते.

जलसिंचन ः-
1) उन्हाळ्यात दर तिसर्‍या दिवशी जलसिंचन करवे.
2) दर 8 ते 10 दिवसांनी भांगलण करून अनावश्यक गवत, काडीकचरा दूर करावा.
3) रेापट्यांची मुळे उघडली पडल्यास माती ने झाकावीत.
फळ काढणी ः-
काशीफळ जड व आकारानेे मोठे असल्याने ते चाकूने कापून अलगद ठेवावे लागते. फळ देठाशी कापत असतान वेलीला इजा होता कामा नये. प्रति हेक्टर 200 ते 250 क्‍विंटल उत्पन्न सहज मिळते. जसे मार्के व ग्राहक मिळतील तसे फळ काढावे.
कोहळा
कोहळा कच्चा असेल तर त्याची भाजी शिजवून खातात आणि कोहळा पिकल्यास त्यापासून मिठाई बनवतात. आगरेका पेठा कोहह्यापासूनच तयार करतात. यात अनेक पौष्टिक तत्त्वे असतात. तसेच कोहळा औषधीसुद्धा आहे. धार्मिक कार्यातही कोहळा वापरला जातो.
कोहळ्याच्या जाती ः-
कोहळ्याच्या जाती कमी आहेत. स्थानिक जातीच्याच कोहळ्याच्या बिया पेरणीसाठी वापरतात. मिठाई करण्यासाठी कोळा पारखून घेतात. कोहळा हिरवा तसेच किंचित जांभळट रंगाचा आढळतो. एस-1, मुदलियार अशा दोन जाती आहेत. एस-1 पंजाबमधील जात असून मुदलीयार मद्रासच्या कोहळ्याची जात आहे.

कोहळा कोठे पिकतो ?
1) सर्व उष्ण कटिबंधीय प्रदेशात कोहळा पिकवला जातो.
2) मैदानी प्रदेशात तसे 1200 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशातही कोहळा पिकवतात.
3) काशीफळ भोपळ्याप्रमाणेच हवामान, माती, खते कोहळ्यास लागतात.
पेरणी केव्हा ?
1) काही भागात मार्च-एप्रिल महिन्यात कोहळ्याच्या बिया पेरतात.
2) जून-जुलै महिन्यात पेरणी केल्यस चांगले पीक येते असे जाणकार म्हणतात. सर्‍या काढून परेणी केली जाते. दोन सर्‍यांत सव्वा मीटर अंतर असावे. दोन बीजारोपणात 0.5 ते 08 मीटर अंतर ठेवावे.

जलसिंचन ः-
पाण्याची सोय असेल तर कोहळा पिकवावा. याला दर 7 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे लागते. बीजारेापणावेळी जमीन ओलसर असावी. पेरणीनंतर हलकेसे जलसिंचन करावे.

फळ काढणी ः-
वेलीवरून शक्यतो कोवळे कोहळे कोणी काढत नाहीत. पिकलेल्या कोहळ्यापासून मिठाई तयार केली जाते. कोहळ्यांना चांगली मागणी असते.
उत्पन्न ः – कोहळ्याचे उत्पन्न, आपली मेहनत, तसेच खतांची मात्रा आणि जलसिंचन यावर आधारित आहे. योग्य देखभालीनुसार प्रति हेक्टर 200 ते 300 क्‍विंटल कोहळे प्राप्त होतात.

पडवळ
पडवळ पिकवण्यासाठी भारी माती असावी असे नाही. अगदी साधारण मातीतही पडवळ पीक घेता येते. पडवळ पाचक व आजारी व्यक्तीस आरोग्यलाभ देणारे फळ आहे.

जमीन कशी असावी ?
रेताड व भुरभुरीत माती असणारी जमीन पडवळ फळभाजीच्या लागवडीस चांगली मानले जाते. त्याला जीवांश असावेत, तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. यांच्या वेली परसबागेत मांडवाच्या व वृक्षाच्या आधारे उंचावर चढवतात.
शेतजमिनीवर प्रति हेक्टरला 90 ते 95 क्‍विंटल शेखणखत टाकावे व नंतर जमीन नांगरावाी. दोनदा नांगरट करून मातीत शेणखत मिसळू द्यावे. नंतर लागवड करावी.

पेरणी कशी करावी?
शेतात खत टाकनू देान वेळा नांगरट करावी. त्यानंतर पडवळ वेलीचे तुकडे रोपले जातात किंवा बिया पेरल्या जातात. जानेवारी ते जुलै दरम्यान शक्यतो बिया पेरतात. कलमे (वेलीचे तुकडे) जुलै ते सप्टेंबर दरम्यान रोपतात. बिया पेरून पडवळाचे पीक घ्यायचे म्हटले तर उत्पन्न कमी मिळते. कारण त्यात नर रोपटी अधिक उगवतात व त्याचे फलन होत नाही. उंच गादी वाफे तयार करून बीजारोपण करावे वा कलमे लावावीत. पडवळहांच्या वेलींना जमिनीवरच पसरू द्यावे. दोन सर्‍यांत 80 ते 90 सें.मी. अंतर असावे.

पडवळ पिकाची विशेषत –
1) पडवळाच्या वेली नर आणि मादी या दोन प्रकारांत असतात.
2) या दोन प्रकारच्या वेली आवश्यक असतात तरच पीक (फळ) मिळते.
3 ) 14-15 मादी वेलींमध्ये एक नर वेल पुरेशी असते.
4) नर फुल मादी फुलापेक्षा मोठे असते. फुलाचा खालचा भाग लांबट असतो.
5) मादी फुलाचा खालचा भाग फुगीर, पांढरा व केसाळ असतो. त्याला गंर्भाशय म्हणतात.
6) नर्सरीत नर व मादी पडवळाची रोपटी विकत मिळतात. रोपटी खरेदी करतानाच 15 मादी व एक नर रोपटे खरेदी करावे.

खते व रासायनिक खते ः
दरवर्षी शेतात पडवळ लावणी करत असाल तर प्रति हेक्टर 60 ते 70 किलोग्रॅम नायट्रोजन शेतात टाकावे. पहिल्यांदाच पडवळाची लागवड करणार असाल तर शेताच्या मातीत प्रति हेक्टर 25 गाड्या शेणखत मिसळावे, तसेच 50 किलोग्रॅम अमोनियम सल्फेट टाकावे. त्यामुळे पीक चांगले येईल. पुढच्या वर्षीही पडवळ लावण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक रोपट्याला दीड किलो शेणखत व 100 ग्रॅम अमोनियम सल्फेट द्यायला विसरू नका.

जलसिंचन ः-
कलम किंवा बी पेरणीनंतर जलसिंचन करावे. हवेत उष्मा किंवा उन्हाळा असेल तर 4-5 दिवसांनी जलसिंचन करावे. हिवाळ्यात 8-10 दिवसांनी जलसिंचन करावे.

भांगलण 35
पडवळाच्या वेली वा रोपटी थंडीत कोमेजतात आणि वसंत ऋतूत अंकुरित होतात हे लक्षात घेऊन हलक्या हाताने काळजीपूर्वक भांगलण करावी आणि गवत, काडी, कचरा काढून टाकावा. मुळे उघडी पडल्यास शेणखत मिश्रित माती टाकून मुळे झाकावीत. भरपूर उत्पन्न घेण्यासाठी भांगलण व जलसिंचन वेळच्यावेळी करावे.

फळे काढणी 3-
पडवळ हिरवे व कोवळे असतानाच काढावे. पडवळ जुनवट होईपर्यंत ठेवू नये. पहिल्यांदाच लागवड केली असेल तर उत्पन्न कमी मिळते परंतु दुसर्‍या वर्षी भरपूर फळे मिळतात. दर हेक्टरी 130 ते 140 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.

ढेमसे
1) ढेमसे या फळाला हिंदीत टिण्डा म्हणतात. हे एकवर्षीय वेलीवरचे हिरवे फळ असते.वेल जास्त वाढत नाही.
2) हे फळ पिकल्यावर आतून काळ्या बिया निघतात. परंतु कोवळ्या ढेमशांचीच भत्तजी केली जाते.
3) ढमसे मसाल्यात तळून वा तरीदार भाजी करून खाल्‍ली जाते.
4) आजारी व्यक्‍तीस ढेमसे पचायला हलके असते.
जाती ः- बिकानेरी, अन्नामलाई,अर्का, पंजाबी, सिलेक्शन-48 या ढेमशाच्या जाती आहेत.

पेरणी केव्हा करावी ?
ढेमशाचे पीक वर्षातून दोन वेळा घेतले जाते. पहिली पेरणी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान व दुसरी पेरणी जून-जुलै महिन्यात केली जाते. फिकट हिरव्या रंगाची कोवळी ढेमशी भाजी करण्यास योग्य असतात.

खत ः-
कुजलेले शेणखत किंवा झाडपानांचे कुजलेले खत खड्डे घेऊन मातीत मिसळावे व त्यात बीजारोपण करावे.

जलसिंचनः-
ढेमशाच्या बियाच रोपल्या जातात. त्यासाठी मऊ माती असावी. बी पेरल्यानंतर हलकेसे जलसिंचन करावे. पाणी जपून द्यावे. रोप कुजेल वा उखडून आडवे पडेल असेपानी देऊ नये. वेल वाढल्यानंतर कोवळी ढेमशी अलगद काढावीत. वेलीला झटके देऊ नयेत.

उत्पन्न ः-
एक हेक्टर शेतीतून 90 ते 105 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. महाराष्ट्रात ढेमशी खाणारी माणसे फार कमी आहेत, पण उत्तर भारतातील बाजारात ढेमशी भरपूर खपतात.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Tags: Cucumber Seedsकाकडीवर्गीय पिकांची शेती
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In