वेलवर्गीय फळांमध्ये काकडीला अनन्यसाधारण महत्त्व असून वाढणार्या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी एस.टी. स्टँडवरती प्रवासी लोक काकडी खाताना दिसतात. उच्च व मध्यमवर्गीय लोकांमध्ये काकडीचा उपयोग प्रकृतीस्वास्थ्यासाठी, सौंदर्यप्रसाधनासाठी म्हणून प्रचलित आहे. कृत्रिम, रासायनिक औषधांपासून तयार केलेल्या कॉस्मेटिक्समुळे त्वचेवरील नंतर होणार्या वाईट परिणामांची भीती असणार नाही. भारतामध्ये खान्देश, विदर्भ, नंदुरबार, मराठवाडा, मद्रास, ओरिसा, कर्नाटक भागांमध्ये अशा प्रकारचा सनस्ट्रोक टाळण्यासाठी तसेच अॅसिडीटी, कॉन्सिटिपेशन कमी करण्यासाठी ‘काकडी’ अत्यंत गुणकारी आहे. असे बहुगुणी परंतु शेतकर्याचे कमी लक्ष असलेले बर्यापैकी पैसा देणारे वेलवर्गीय पीक म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आहारातील महत्त्व :
काकडी पिकाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.
पाणी – ९६.३० %, कार्बोहायड्रेट्स – २.५०%, प्रोटीन्स – ०.४०%, फॅट्स – ०.१०%, तंतुमय पदार्थ – ०. ४० %, खनिजे – ०.३०%, कॅल्शिअम – ०.०१%, फॉस्फरस – ०.०३%, लोह – ०.००२%, जीवनसत्त्व ‘क’ – ०.००७%, उष्मांक (कॅलरी) – १३.
काकडीचे पीक महाराष्ट्रात बहुतेक सर्वच जिल्ह्यांत आणि विशेषत: मोठ्या शहरांच्या जवळ वर्षभर मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
जमीन आणि हवामान : काकडी या पिकाला हलकी ते मध्यम आणि उत्तम निचर्याची जमीन लागते. हलक्या जमिनीत लागवड केल्यास पीक लवकर तयार होते. पावसाळ्यात जमिनीत पाणी साचू नये आणि उन्हाळ्यात जमीन तडकू नये अशी जमीन असावी. काकडीचे भरपूर उत्पादन मिळण्यासाठी जमीन कसदार असावी. काकडीला उष्ण हवामान चांगले मानवते. कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास काकडीच्या पिकाची वाढ चांगली होत नाही. रोग व किडीचे प्रमाण वाढते. वातावरणाचे तापमान ११ डी. सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास बियांची उगवण चांगली होत नाही. तापमान १८ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्यास बियांची उगवण चांगली होते. साधारणपणे ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची वाढ चांगली होते. भरपूर सूर्यप्रकाश या पिकास चांगला मानवतो.
लागवडीचा हंगाम : काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून – जुलै महिन्यात करतात. जास्त पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरुवातीला सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात लागवड केली जाते.
जाती :
१) पुना खिरा : महाराष्ट्रात काकडीच्या या जातीची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. या जातीची फळे लहान असतात आणि रंग हिरवट पांढरा असतो. फळे काढण्यास उशीर झाल्यास फळांचा रंग पिवळसर तपकिरी होतो. लागवडीनंतर दीड महिन्यांनी फळे काढावयास येतात.
२) हिमांगी : या जातीची खरीप आणि उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीची फळे पांढर्या रंगाची आणि १२ ते १५ सेंमी लांबीची असतात. काढणीनंतर फळे पिवळी किंवा तपकिरी रंगाची होते नाहीत, त्यामुळे बाजारात या फळांना चांगला बाजारभाव मिळतो.
३) शीतल : शीतल ही काकडीची एक चांगली जात असून अधिक पावसाच्या कोकण भागासाठी तिची शिफारस करण्यात आली आहे. या जातीची फळे मध्यम लांबीची असून फिकट हिरव्या रंगाची असतात. ही जात खरीप हंगामात जून – जुलै महिन्यात लावतात. हेक्टरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते.
४) फुले शुभांगी : या जातीची काकडी अधिक उत्पादन, फळांचा रंग हिरवा, फळे चवदार व साठवणीत हिरवा रंग अधिक काळ चांगला राहतो. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांसाठी लागवडीस योग्य. उत्पन्न हिमांगीपेक्षा २३% जास्त येते. तर पूना खिरापेक्षा ५३% अधिक येते. सरासरी हेक्टरी उत्पन्न १६ – १८ टन असून केवडा रोगास प्रतिकारक आहे.
संकरित जाती:
जिप्सी : हा वाण नामदेव उमाजी अॅग्रोटेक प्रा. लि. कंपनीचा वाण असून फळे पांढरट हिरव्या रंगाची असून साल चमकदार असते. फळांची लांबी १६ ते १८ सेंमी असून फळे सरळ एकसारख्या आकाराची असतात. अतिशय उत्पादनक्षम जात असून २०० ते २५० गरम वजनाची फळे असतात.
याशिवाय मालिनी, शिवनेरी या वाणाची काकडी देखील अधिक उत्पादनक्षम असून ती ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली असल्याने या वाणांची देखील लागवड बहुतांश शेतकरी करीत असतात.
बीजप्रक्रिया : जर्मिनेटर २० मिली. + २५० मिली. पाणी या द्रावणात २५ ते १०० ग्रॅम बी ३ ते ४ तास भिजवून सावलीत सुकवून लागवड करावी. त्यामुळे उगवण कमी दिवसात एकसारखी होते. थंडीच्या दिवसात बीजप्रक्रियेस कोमट पाणी वापरणे फायदेशीर ठरते.
लागवड : काकडीवर्गीय पिकांची लागवड पाट पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. आळे पद्धतीने पिकाला जास्त पाणी द्यावे लागते आणि तणांची वाढही जास्त होते. काकडीच्या लागवडीसाठी रुंद सरी – वरंबा पद्धत चांगली मानली जाते. काकडीच्या जातीनुसार काकडीची लागवड ९० सेंमी अंतरावर टोकून करतात. दोन वेलींत ४५ सेंमी अंतर ठेवावे. लांब वेलींत ६० सेंमी अंतर ठेवावे. पाटाच्या एका बाजूने वरंब्याच्या टोकापासून एकतृतीयांश अंतरावर खुरप्याच्या सहाय्याने लहानसा खळगा करून त्यामध्ये १ ते २ बिया एका ठिकाणी टोकून मातीने झाकून हाताने दाबून घ्याव्यात. पाटात पाणी सोडून पाट-सर्या भिजवाव्यात. पाटातील पाण्याची पातळी टोकलेल्या बियांच्या जागेच्या खाली असावी.
थंडीतली लागवड : थंडीमध्ये बी लवकर उगवत नाही. त्यासाठी पाव ते अर्धा लिटर कोमट पाण्यामध्ये २५ – ३० मिली जर्मिनेटर मिसळून, या मिश्रणामध्ये बी चार तास भिजवून सावलीत सुकवावे व हे बी एका आड एक असे (झिगझॅग पद्धतीने) लावावे.
बी साधारण ६ ते ८ दिवसानंतर उगवते. थंडीमध्ये सरी काढताना उदा. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये सूर्य दक्षिणायनात असल्या कारणाने जर पूर्व – पश्चिम सरी काढली तर उत्तरेकडे टोकलेले बी सहसा उगवणीच्या प्रमाणात घट देते, कारण सुर्यप्रकाश कमी मिळतो. तेव्हा थंडीमध्ये काकडीची खिर्याची लागवड करायची असेल तर सरी दक्षिणोत्तर काढून बी पूर्वपश्चिम लावले, म्हणजे सर्व बी उगवून येईल.
खते आणि पाणी व्यवस्थापन : काकडी या पिकासाठी एकरी ६ ते ८ टन शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १५० किलो द्यावे. खते वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे. खते वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे. काकडी हे पीक उन्हाळी हंगामात घेतल्यास पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. लागवडीपूर्वी सर्या ओलावून घ्याव्यात आणि नंतर लागवड करावी. लागवड केल्याबरोबर पाणी द्यावे. उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने जमिनीचा मगदूर, पिकाची वाढ व हवामान यांचा विचार करून पाणी द्यावे.
पाणी कसे, किती व केव्हा द्यावे ?
थंडीमध्ये सकाळी १० ते दुपारी २ ह्यावेळेस पाणी द्यावे. तसेच उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ ते १० च्या आत पाणी द्यावे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश ह्या भागांमध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे.
थंडीमध्ये आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी देताना ‘भीज पाणी’ (संपूर्ण पाणी देणे) न देत ‘टेक पाणी’ (हलके पाणी देणे) द्यावे.
किडी :
१) लाल भुंगे : लाल भुंगे, पीक लहान असताना पाने कुरतडून खातात. बियांची उगवण झाल्याबरोबर या किडीचा उपद्रव सुरू होतो. ही कीड सर्वच काकडीवर्गीय पिकांवर येते. कीड पानांचा कोवळा भाग कुरतडून खाते.
२) फळमाशी : फळमाशी ही एक महत्त्वाची कीड असून काकडीवर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान करते. फळमाशी ही फळे लहान असताना फळाच्या सालीखाली अंडी घालते. या अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळातील गर खातात आणि त्यानंतर फळे सडतात.
रोग :
१) भुरी : भुरी हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण झाल्यास पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, फळे वाढत नाहीत, उत्पादन घटते. काकडी हे पीक भुरी रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडते.
२) केवडा : केवडा हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपद्रव झाल्यानंतर काकडीच्या पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणि खोड रोगाला बळी पडतात.
३) करपा : करपा रोगामुळे पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढल्यास हा रोग बळावतो.
‘करपा‘ रोग पडण्याची कारणे : काकडी हे वेलवर्गीय पीक असल्याने वेलींची वाढ जमिनीलगत पसरत चालते तसेच पाने केसाळ लवयुक्त असल्यामुळे थंडीतील दवं, धुके व पाणी दिल्यानंतर निर्माण होणारे बाष्प हे झपाट्याने ह्या भागांवर आकर्षिले जाऊन ‘करपा’ वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे औषधे वेळच्यावेळी फवारणे गरजेचे असते.
काढणी : काकडीची तोडणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे असते. काकडीचा उपयोग कोशिंबिरीसाठी जास्त प्रमाणात होतो. म्हणून काकडी कोवळी, लुसलुशीत अवस्थेतच तोडावी. बी टोकल्यापासून साधारणत: ३० – ४० दिवसांत फळे येतात. दर २ -४ दिवासांनी तोडणी करावी. तथापि नंतर काकडी वाकडी, पिवळी पडते असे प्रकार घडतात. त्यामुळे तिला ‘बदला काकडी’ असे संबोधण्यात येते व अशा काकडीचा दर २ ते ३ रू. किलो असा मिळतो. तर उत्कृष्ट दर्जाच्या काकडीचा दर थंडीमध्ये ८ ते २० रुपये किलोपर्यंत मोठ्या मार्केटमध्ये होलसेल मिळू शकतो.
उन्हाळ्यामध्ये काकडीमध्ये विकृती (पिवळी पडण्याचे प्रमाण) अधिक असते. त्याकरीता ‘कॉपशाईनर’ या औषधाचे प्रमाण सप्तामृतामध्ये थोडेसे वाढविणे व राईपनर निम्या प्रमाणात वापरले तर एक्सपोर्ट दर्जाची काकडी मिळते. अशा काकडीस बाजारभावापेक्षा निश्चितच अधिक भाव मिळतो. असे अनेक शेतकर्यांनी अनुभवल्याचे कळविले आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल