कापसावरील रोग
1) मर : हा रोग फ्यूजेरियम ऑक्झिस्पोरम एफ. व्हॅसिनफेक्टम या बुरशीमुळे होतो.
लक्षणे : या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिसतो. कोवळी रोपे पिवळी पडतात, वाळतात व मरतात. झाडाची जुनी पाने कोमेजतात. झाडाची खालील पाने अगोदर वाळतात व नंतर वरची वाळतात. कालांतराने पूर्ण पानगळ होते. झाडाचे खोडच फक्त शेतात उभे राहते. रोगग्रस्त झाडाचे खोड रंगविरहित होते. तसेच कोवळ्या रोपाचा जमिनीलगतचा भाग काळसर होतो. रोगग्रस्त झाडाच्या मुळाचा अगर खोडाचा उभा छेद घेतला असता खोडाच्या पेशी रंगविरहित झालेल्या दिसतात. कालांतराने पूर्ण झाड मरते व कुजते.
पोषक हवामान : जमिनीतील तापमान 20-30 अंश सेल्सिअस तसेच गरम व कोरडे हवामान या रोगाच्या वाढीस पोषक आहे.
नियंत्रण : या रोगाचा प्रादुर्भाव मातीत असलेल्या बुरशीमुळे तसेच बियाण्यामार्फत होतो. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
1. उन्हाळ्यात खोल नांगरट करावी.
2. शेणखताची मात्रा जास्त द्यावी, त्यामुळे मर रोगाचे बिजाणू कमी होतात.
3. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 0.3 टक्के अथवा कार्बेन्डेझिम 0.1 टक्का या बुरशीनाशकांची अथरा ट्रायकोडर्मा 0.6 टक्के या परोपजीवी बुरशीयुक्त पावडरची प्रक्रिया करावी.
4. पिकास पोटॅशची मात्रा जास्त द्यावी.
5. रोगग्रस्त झाडाचे अवशेष शेताबाहेर टाकावेत.
2) ब्लॅक आर्म : हा रोग झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस पी.व्ही. मालव्हेसियारम या जीवाणूमुळे होतो.
लक्षणे : सुरूवातीस अनियमित आकाराचे हिरवट गोलाकार ठिपके सुरूवातीच्या दोन पानांच्या खालच्या बाजूस दिसू लागतात. रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या वरील बाजूस दिसतो. अनियमित तपकिरी काळसर रंगाचे ठिपके पानांच्या शिरा आणि मुख्य पर्णशिरांमध्ये दिसू लागतात (आकृती क्र.40). बोंडावरसुद्धा अनियमित काळसर ठिपके दिसतात. तसेच झाडाच्या खोडावर अनियमित काळसर ठिपके दिसतात व झाड वाळते.
पोषक हवामान : वातावरणातील तापमान 28 अंश सेल्सिअस, पाऊस आणि जास्त आर्द्रता या रोगास पोषक आहे.
नियंत्रण : बियाणे रात्रभर 100 पी.पी.एम. (10 ग्रॅम 10 लि. पाण्यात) स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट किंवा अॅग्रिमायसीनच्या द्रावणात भिजवावे. त्यानंतर बियाणे सुकवावे व नंतर पेरणी करावी.
उसावरील रोग
1) काणी : हा रोग युस्टिलॅगो स्किटॅमिनी या बुरशीमुळे होतो.
लक्षणे : या रोगामुळे उसाची रोपे बारीक व वजनाने हलकी राहतात. पाने अरूंद व कडक होतात. रोगट उसाच्या पोंग्यातून 1 ते 1.5 मीटर लांबीचा चंदेरी आवरणाचा खोडाचा भाग शेंड्यातून बाहेर पडतो (आकृती क्र.41). कालांतराने हे आवरण फुटते व त्यातून बुरशीचे असंख्य बिजाणू बाहेर पडतात. पाण्यामार्फत आणि हवेमार्फत या बिजाणूंचा प्रसार होतो. बिजाणू इतर उसाच्या डोळ्यांवर पडतात व तेथेच रूजतात. अशा उसाचे बेणे लागवडीसाठी वापरल्यास बेण्याच्या डोळ्यांतून काणीग्रस्त कोंब बाहेर येतात. ऊस पिकाचा खोडवा घेतल्यास काणीचे प्रमाण जवळजवळ 10 पट वाढते.
नियंत्रण :
1. लागवडीसाठी निरोगी बेणे वापरावे.
2. को-7219, को-8014, को-265, को एम 88121, को-6032 या सारख्या काणी रोगप्रतिबंधक जातींची लागवड करावी.
3. उसात काणी रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास खोडवा ठेवू नये.
4. काणीग्रस्त उसाचे बेणे मुळासकट उपटून जाळून नष्ट करावे.
5. उसाची लागवड करण्यापूर्वी बेण्यास 0.1 टक्का कार्बेन्डॅझिम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. कांड्या द्रावणात 10 मिनिटे बुडवाव्यात.
2) गवताळ वाढ : हा रोग मायकोप्लाझमा मुळे होतो.
लक्षणे : या रोगामुळे उसाच्या बुंध्याजवळ असंख्य फुटवे येतात. हे फुटवे फिकट पिवळसर पांढर्या रंगाचे दिसतात. फुटव्याची पाने अरूंद, लहान आणि निमुळती होतात. उसाच्या बेटास गवताच्या ठोंब्याचे स्वरुप प्राप्त होते (आकृती क्र.42). खोडव्याच्या पिकावर या रोगाची तीव्रता जास्त असते. या रोगाचा प्रसार रोगट बेणे, तोडणीचा कोयता तसेच मावा किडीमार्फत होतो.
नियंत्रण :
1. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी उष्ण जल किंवा उष्ण बाष्प प्रक्रिया करून तयार केलेले बेणे लागवडीसाठी वापरावे.
2. रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.
लागवडीसाठी को-7219, को-714, को-86032 या रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा. उष्ण बाष्प प्रक्रियेत ऊस बेणे 54 अंश सेल्सिअस तापमानाच्या उष्ण हवा निर्माण करणार्या यंत्रामध्ये 8 तास ठेवावे व त्यानंतर लागवड करावी.
3) मर : हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॉर्मी या बुरशीमुळे होतो.
लक्षणे : हा रोग ऊस पिकावर लागवडीनंतर 5-6 महिन्यांनी दिसतो. उसाच्या कांड्या सुकलेल्या दिसतात. पाने पिवळी पडतात व वाळतात. रोगग्रस्त ऊस कापून त्याचा उभा छेद घेतला असता काष्ठ उती तपकिरी किंवा लालसर दिसतात. रोगग्रस्त भागावर रोगाची कापसासारखी बुरशी दिसते.
पोषक हवामान : या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बेण्यामार्फत होतो. जमिनीतील तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस तसेच जमिनीतील ओलावा 28-30 टक्के या रोगाच्या वाढीस अनुकूल आहे.
नियंत्रण :
1. जमिनीची खोल नांगरट करावी.
2. लागवडीसाठी निरोगी बेणे वापरावे.
3. मर रोगग्रस्त उसाचा खोडवा ठेवू नये.
4. पाणथळ जमिनीत को-671 या जातीची लागवड करू नये.