हळद पिकावरील रोगांचे नियंत्रण

2

पानावरील ठिपके : ( टिक्का )

प्रथमत: या रोगात पानांवर लंबगोलाकार तपकिरी रंगाचे, अंडाकृती ठिपके पडतात. हे ठिपके वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते सूर्याकडे धरून पाहिल्यास त्यात अनेक वर्तुळे दिसतात. रोगट भाग पूर्णत: वाळून तो तांबूस राखी तपकिरी रंगाचा दिसतो. अनेक ठिपके वाढून एकत्र येतात व संपूर्ण पानच वळून गळून पडते. कधी कधी शेतात संपूर्ण पिकच वाढून एकत्र येतात व संपूर्ण पानच वाळून गळून पडते. कधी कधी शेतात संपूर्ण पिकच वाळून अल्पजीवी ठरते व उत्पादन पूर्णत: घटते. या रोगास अत्यंत ढगाळ वातावरण आणि भरपूर पाऊस अनुकूल असतो. रोगाची तीव्रता जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत जास्त दिसते. कमी निचरा होणारी जमीन ही या रोगास सहाय्यक ठरते. हा रोग झाडाच्या कोणत्याही पानावर येऊ शकतो.

साधारणपणे २१ ते २३ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० टक्के आद्रतेमध्ये हा रोग कोलोटोट्रीकम कॅपसिसी या बुरशीमुळे होतो. ही बुरशी रोगट पाने, गड्डे तसेच जमीन यामार्फत प्रतिकूल परिस्थितीत सुप्तावस्थेत राहते. बुरशीचे बीज सुप्तावस्थेत सुरक्षित राहतात. या बुरशी किंवा बीजाचा प्रसार हा वारा, पाणी याद्वारे प्रामुख्याने होतो. योग्य बाह्य वातावरणात बुरशी कार्यान्वित होवून रोगनिर्मिती व प्रसार होतो.

प्रतिबंधक उपाय व नियंत्रण :

१) रोगमुक्त बियाण्याचा लागवडीसाठी वापर करावा.

२) झायनेब २ ते २.५ ग्राम प्रती लिटर पाण्यात किंवा कार्बन्डॅझीम १ ते १.५ ग्राम प्रती लिटर पाण्यात किंवा एक टक्का बोर्डा मिश्रणाची फवारणी करावी. तसेच प्रॉपीकोनाझोल एक मी. ली. प्रती लिटर पाण्यात किंवा क्लोरोथॅलोनिलची फवारणी करावी.

हवामानाच्या परिस्थितीपासून ऑगस्ट-सप्टेंबारपासून ते नोव्हेंबरपर्यंत १५ ते २० दिवसाच्या अंतराने या बुरशीनाशकाच्या आलटून-पालटून फवारण्या कराव्यात. एकच बुरशीनाशक सतत वापरू नये.

पानावरील ठिपके (लीफ ब्लॉच) :

हा बुरशीजन्य रोग ट्रॉकीना मॅक्युलन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. साधारणपणे ऑगस्ट-ऑक्टोबरच्या कालावधीतील आद्रतायुक्त हवामानामध्ये या रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन वरील पानावर पसरतो. या बुराशीमध्ये तीन प्रकारचे ठिपके पानावर तयार होतात. रोगाची लक्षणे पाने-फुले यांवर आढळतात. पहिल्या प्रकारात रोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पानावर वरच्या पृष्ठभागावर असंख्य लहान गोलाकार दाण्यासारखे तांबूस ठीपके तयार होतात. या ठिपक्यांचा आकार तीन मिलीमिटर एवढा असतो. ठीपक्याच्या मध्यभागी बुरशीची काळी फळे रचलेली असतात. सुरुवातीला ठीपक्याच्या सभोवती पिवळी कडा नसते. परंतु कालांतराने ठिपक्या सभोवती पिवळी कडा तयार होते. पान तांबूस रंगाचे होऊन वाळून जाते.

दुसऱ्या प्रकारात रोगाची लक्षणे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिसू लागतात. पानाच्या वरच्या पृष्ठभागावर अंडाकृती किंवा गोलाकार काळ्या रंगाचे खोलगट ठिपके तयार होतात.

तिसऱ्या प्रकारात ठिपक्याचा मुख्य भाग पांढरा असून, तीन ते आठ मि. मी. दोन ते चार मि. मी आकाराचे असतात. ठीपक्याच्या पांढऱ्या भागावर बुरशीची काळी फळे इतस्तत: पसरलेली असतात. सुरुवातीपासून ठीपक्याभोवती पिवळसर कडा असते. ठिपके कमी प्रमाणात तयार होत असल्याने पाने वाकत नाहीत. तिसऱ्या प्रकारात रोगाची लक्षणे जुलैच्या चोथ्या आठवड्यात दिसू लागतात. पानांच्या वरच्या पृष्ठभागावर हिऱ्याच्या खड्यांच्या आकाराचे ठिपके तयार होतात.

ठिपक्यांची कडा लालसर असते व ठिपक्यांच्या आतील संपूर्ण भाग राखाडी रंगाचा असतो. हे ठिपके ८ ते १७ मी.मी. सहा ते १० मी. मी. आकाराचे असतात. ठिपक्यावर बुरशीची फळे एकावर एक रचलेली असतात. प्रत्येक ठीपक्याच्या भोवती पिवळसर कडा नसते. ठिपके एकमेकात मिसळून अनियमित आकाराचे चट्टे तयार होतात. जास्त प्रमाणात अशा ठिपक्यांची कडा काळसर असते. आणि आतील भाग पांढरा असतो. या भागावर बुरशीची काळी फळे तयार होतात. कधी कधी ठिपके तयार न होता बुरशीची असंख्य काळी फळे तयार होतात.

  प्रतिबंधक उपाय व नियंत्रण :

या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगात पाने, फुले याद्वारे होत असल्यामुळे रोगात पाने व फुले गोळा करून त्वरित जाळून टाकणे आवश्यक आहे.

लागणीपूर्वी हळदीचे बियाणे कार्बन्डाझिम ५० डब्ल्यू पि एक ग्राम प्रती लिटर किंवा मँकोझेब २.५ ग्राम प्रती लिटर पाण्यात घालून या द्रावणामध्ये १० मिनिटे बुडवून वापरावे.

रोगाचा प्रसार दुय्यम हवेमार्फत होत असल्यामुळे अशा रोगाची लक्षणे दिसू लागताच हळदीच्या पिकांवर ५ ते ६ वेळा बुरशीनाशकाची फवारणी १५ दिवसांच्या अंतरावर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तांबरा ( टिक्का ) या रोगासाठी दिलेल्या औषधांचा फवारणीने रोग आटोक्यात येऊ शकतो. त्यासाठी वेगळे नियंत्रण करण्यासाठी आवश्यकता नाही.

कंदकुज किंवा गड्डे कुजव्या :

सुरळीतील पानाचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून १ ते १.५ से.मी. खालीपर्यंत वाळत जातात आणि पुढे पान संपूर्णपणे वाळले जाते. खोडाचा जमिनिलगतचा बुंधा काळपट, राखी पडतो. या ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो.

या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. या रोगात सर्वप्रथम झाडाची सुरळी मरते. हा रोग शेतामध्ये प्रथमत: अल्पशा प्रमाणात येतो आणि लांबूनही वैशिष्ट्पुर्ण पिवळ्या निस्तेज पानांमुळे ओळखता येतो.

रोगास अनुकूल वातावरण :

यां रोगास भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन पोषक ठरते. रोगास दमट हवामान फारच मानवते. भरपूर पाऊस मधूनच कडक ऊन असे वातावरण या रोगास योग्य असते. हा रोग ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

रोगाचा जीवनक्रम :

हा रोग बुरशीजन्य आहे. ही बुरशी बियाण्यावर व जमिनीवर राहते आणि अनुकूल वातावरण मिळताच पिकावर हल्ला करते व रोग निर्मिती करून वाढ करते. या बुरशीपासून शाकीय धागे तयार होतात व तेही रोग निर्मिती करतात. रोगप्रसार प्रामुख्याने पाण्यातून होतो. या रोगावर कालिकत तसेच महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांनी खूपच संशोधन केले आहे आणि त्यातील निष्कषानुसार हा रोग प्रामुख्याने १) बुरशी ( पिथीयम, फ्युजेरीयम ), २) सुत्रकृमी (प्राणीजगत), ३) कंदमाशी ( कीटक ) यांच्यामुळे होतो.

काही वेळा असेही दिसून आले आहे कि, वरील कोणत्याही एकमेव कारणामुळेसुद्धा हा रोग दिसून येतो. प्रतिकूल परिस्थितीत रोगजंतू जमीन किंवा बियाण्यामध्ये सुप्तावस्थेत राहतात.

नियंत्रण :

रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील उपाय करावेत

 • लागवडीसाठी बियाणे निरोगी वापरावे.
 • जमीन हलकी ते मध्यम, परंतु उत्तम निचऱ्याची निवडावी.
 • पावसाळ्यात अगदीच जरूर असल्यास ३५ ते ४० मीटर अंतरावर अर्धा ते पाऊण मीटर खोलीच्या उतारास समांतर असे चर घ्यावेत. म्हणजे अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल.
 • मेटॅलॅक्सील आठ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्राम प्रती लिटर किंवा कार्बेन्डाझिम ( ५० डब्लू पी ) एक ग्राम प्रती लिटर पाण्यात किंवा मॅन्कोझेब २.५ ग्राम प्रती लिटर पाण्यात किंवा १ टक्के बोर्डोर्मिश्रण करून यापैकी एका बुरशीनाशकाची अळवणी करावी.
 • पीक लागवडीच्यावेळी ट्रायडर्मा पाच किलोग्राम प्रती हेक्टरी शेणखतातून मिसळून घ्यावे.
 • पिकांची फेरपालट करावी.
 • कंदवर्गीय पिकावरती किंवा हळदीवरती हळद हे पिक घेऊ नये.

https://krushisamrat.com/control-of-pests-of-turmeric-crop/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
 1. Turmeric Bussiness

  […] हळद पिकावरील रोगांचे नियंत्रण […]

 2. […] हळद पिकावरील रोगांचे नियंत्रण […]

Leave A Reply

Your email address will not be published.