विमान वाहतुकीतून शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार

0

मुंबई
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी शेतकर्‍यांचे तसेच किरकोळ उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यात विमान वाहतूक व्यवसायाचा मोठा हातभार लागणार आहे, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले. ग्लोबल एव्हिएशन समिट या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारोहात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू,राज्यमंत्री जयंत सिन्हा उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, जागतिक विमान वाहतूक उद्योग जलद गतीने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेने 2030 पर्यंत जागतिक हवाई प्रवाहात 100 टक्के वाढीची भविष्यवाणी केली आहे. देशातील विमान वाहतूक उद्योग वाढीसाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. देशातील विमान वाहतूक व्यवसाय हा अर्थव्यवस्था वाढीतील एक प्रमुख घटक आहे. गेल्या चार वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात नागरी हवाई वाहतूक आणि रिजनल कनेक्टिव्हीटीचे महत्त्वपूर्ण धोरण आखले गेले आहे. शिर्डीवरुन विमान सेवेचे लोकार्पण करण्यात आले आहे.
पुढील दोन दशकात भारतातील हवाई वाहतुकीचे चित्र बदलणार आहे. सध्या असलेली 187 दशलक्ष प्रवाशांची संख्या दरवर्षी वाढणार आहे. यासाठी आवश्यक असणारे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि गुंतवणुकीसाठी प्रचंड संधी खुल्या होणार आहेत. विमान वाहतूक उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची देखील मोठ्या प्रमाणात आवश्यकता लागणार आहे. पर्यटन वाढीसाठीही विमान वाहतूक व्यवसाय महत्त्वाचा ठरणार असणार आहे. या परिषदेच्या यशस्वितेसाठी राज्य शासनाने केलेल्या आयोजनाचेही राज्यपालांनी कौतुक केले.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंदाजानुसार पुढील दोन दशकांमध्ये विमान प्रवास करणार्‍यांची संख्या 1.12 अब्ज होईल. यामुळे गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या बर्‍याच संधी उपलब्ध होतील, तसेच या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने तज्ञ मनुष्यबळाची गरज भासेल असेही यावेळी राज्यपाल म्हणाले. नागरी उड्डाण क्षेत्र हे पंतप्रधानांच्या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या स्वप्नाला बळ देण्याचे काम करेल. काबुल आणि मुंबई दरम्यान सुरू झालेल्या एका मालवाहतूक विमान सेवेमुळे काबूलहून मुंबईकडे सफरचंदांची तर मुंबईहून काबुलकडे टोमॅटोची वाहतूक शक्य झाली असून याचा दोन्ही देशांना फायदा झाला आहे. असे अनेक मार्ग शोधण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी बोलताना प्रभू यांनी परिषदेत मिळालेल्या सूचना आणि सल्ले भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी उपयुक्त ठरतील असे सांगितले. ते म्हणाले, भारताला विमान वाहतुकीचे हब बनविण्यासाठी वाटचाल सुरु करण्यात आली आहे. एअर कार्गो धोरण, ड्रोन धोरण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर सुमारे 83 देशातील लोकांनी आपले विचार व्यक्त केले. या परिषदेतून प्रत्येकासाठी उडान हे स्वप्न साकार करण्याची दिशा ठरविण्यात आली आहे.
राज्यमंत्री सिन्हा यांनी विमान वाहतूक क्षेत्रात देश जगातील पहिल्या तीन क्रमांकात कायम अग्रेसर राहील, असे सांगितले. विमान निर्मितीच्या क्षेत्रात देशाचे योगदान वाढविण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. यावेळी मेकिंग इंडिया द नेक्स्ट एविएशन हब या मिशन वाक्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.