जलयुक्त शिवारची कामे गतीने पूर्ण करा

0

जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले
बुलडाणा
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत भुजल पातळी वाढविण्यासाठी जल व मृद संधारणाची कामे करण्यात येत आहे. या अभियानातंर्गत सन 2017-18 मधील शिल्लक असलेली कामे पूर्ण करावी व सन 2018-19 मधील कामांना कार्यारंभ आदेश देवून ती प्राधान्याने सुरू करावीत. यंत्रणांनी समन्वयाने जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जलयुक्त शिवार, रोहयो कामे आदींबाबत आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि नेमाने आदी उपस्थित होते.

भारतीय जैन संघटना यावर्षीसुद्धा शासनासोबत गाळमुक्त धरण अभियानात काम करणार असल्याचे सांगत सचिव डवले म्हणाले, बीजेएससोबत सुरू होणारी कामे प्राधान्याने घ्यावीत. एरिया ट्रीटमेंट, गाळ काढणे आदीप्रमाणे कामांचा क्रम असावा. गतवर्षी बीजेएससोबत चांगल्या प्रकारे काम जिल्ह्यात झाले होते. यावर्षी सुद्धा असेच काम अपेक्षित असून मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जलाशये, तलाव गाळमुक्त झाली पाहिजे.

ते म्हणाले, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान पाच कामे सुरू करावीत. यावर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी असल्याने दुष्काळ आहे. दुष्काळी परिस्थितीत कामाची मागणी करणार्‍या प्रत्येकाच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. त्यानुसार रोहयो विभागाने शेल्फवरील कामांची संख्या पर्याप्त ठेवावी. जेणेकरून जास्त मागणी आल्यास कामे पुरविण्यास अडचणी यायला नको. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपजिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी व संबंधित यंत्रणांचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.