बाजार सावंगी परिसरात थंडीचा आद्रकाला फटका
बाजार सावंगी / प्रतिनिधी
परिसरात थंडीत चार दिवसांपासून वाढ झाली असून या लाटेचा नागरीक, जनावरांसह आद्रक पिकालाही मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
गत आठ-दहा दिवसांपासून कड्याक्याच्या थंडीची लाट आली असून दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम जाणवत आहे. थंडीच्या लाटेमुळे बाहेर निघणे नागरिकांना कठिण झाले आहे. बाजारपेठ, रस्ते, सुनसान दिसत आहेत. थंडीच्या लाटेमुळे पिण्याचे पाणी, तेल, बर्फासारखे घट्ट जमा झाले आहे. नागरीक दिवस -रात्र उबदार कपडे घालूनच वावरत आहे.
शाळा, ट्युशनला थंडीमुळे उशीराने विद्यार्थी पोहचत आहेत. त्यात नागरीक, गुरा-ढोरांबरोबरच आद्रक पिकाला फटका बसला असून आद्रक पीक करपत आहे. थंडीच्या लाटेमुळे चालणे फिरणे, काम करणे कठिण झाले आहे. ही थंडी अजून किती दिवस राहणार याचीच चर्चा परिसरातील नागरिक करीत आहेत.