क्षेत्र आणि उत्पादन :
भारतात यापूर्वी या फळपिकाची स्वतंत्र लागवड केली जात नव्हती.
तसेच चारोळी पिकाच्या आर्थिक फायद्याबद्दल व पौष्टिकतेबाबत लोकांना पुरेशा
प्रमाणात माहिती नव्हती. त्यामुळे या फळपिकाखालील उत्पादन क्षेत्रात वाढ झाली नाही, तसेच
उत्पादनाबाबतची पुरेशी माहिती उपलब्ध नाही, भारतात कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरिसा तसेच
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील नांदेड भागातील किनवट
आणि विदर्भातील बुलढाणा, अकोट, वाशिम, रिसोड, लोणार, रामटेक व भंडारा तर कोकणातील रत्नागिरी, राजापूर, मालवण आणि ठाणे जिल्ह्यातील जंगलात, पडरानात, चढ उताराच्या डोंगराळ भागात
नैसर्गिकरीत्या वाढ झालेली चारोळीची पुष्कळ झाडे आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने
फलोत्पादन खात्यामार्फत रो. ह. यो. १००% अनुदान या कार्यक्रमात या फळ पिकाचा
समावेश केला असल्याने या फळ पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.
हवामान आणि जमीन
:
डोंगराळ, हलकी व बरड जमीन चारोळी या झाडाला मानवते. या झाडाला फार पाणी नको असते. जास्त पाऊस, दलदलीच्या जमिनी या झाडाच्या वाढीस अयोग्य असतात. चारोळी ही कोकणातील तांबड्या जमिनीत, डोंगर उतारावरील जमिनीत, दुष्काळी भागातील हलक्या जमिनीत,मध्यम काळ्या अथवा काळ्या जमिनीत, पोयट्याच्या जमिनीत, नदी, नाले, ओढे यांच्या काठांवरील उंचसखल जमिनीत चांगली वाढते.
चारोळीच्या झाडाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. उष्ण आणि दमट हवामानातही चारोळीची झाडे चांगली वाढतात. कमी पावसाच्या तसेच अति पावसाच्या प्रदेशात चारोळीची झाडे वाढलेली दिसून येतात. महराष्ट्रात कृषी खात्याने शिफारस केल्याप्रमाणे.
विदर्भात :
अमरावती – (धारणी, चिखलदरा) , अकोला -(पातूर, अकोट), वाशिम -(वाशीम, मालेगाव, रिसोड), बुलढाणा -(मेहकर, लोणार, चिखली,शेगाव, देऊळगावराजा ), गडचिरोली – (सिरोंचा, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपूरी), यवतमाळ -(माहूर, पुसद, पांढरकवडा, आर्वी), नांदेड -(किनवट)
कोकणात :
रत्नागिरी
-(राजापूर, मालवण आणि ठाणे) इत्यादी जिल्ह्यांतील तालुक्यांत हे फळपीक
लागवडीस अनुकूल वातावरण आणि पोषक जमीन आहे.
जाती :
चारोळीची स्वतंत्रपणे लागवड केली जात नाही. तसेच चारोळीच्या जातीबाबत फारसे संशोधन झालेले नाही. चारोळीच्या जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती उपलब्ध नाहीत. चारोळीची लागवड करताना खात्रीशीर ठिकाणाहून जास्त उत्पादन देणाऱ्या झाडांचे बी मिळवून चारोळीची लागवड करावी किंवा जातिवंत रोपे, शासकीय रोपवाटिका, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका किंवा नोंदणीकृत खाजगी रोपवाटिका येथून पॉलीथिन पिशवीतील रोपे आणून लागवड करावी.
अभिवृद्धीच्या पद्धती:
चारोळीची अभिवृद्धी बियांपासून करतात. चारोळीचे बियाणे योग्य प्रकारे उगवत नाही हा अनुभव बऱ्याच रोपवाटिकांमध्ये येतो. बियांची उगवण योग्य प्रकारे न होण्याचे कारण मिळणारे अपक्व बियाणे हे होय. चारोळीच्या फळाचा मुख्य हंगाम मार्च, एप्रिल, मे हा आहे. त्यावेळेस जर पूर्ण पक्व झालेली फळे निवडली आणि त्यापासून मिळणारे बी वापरले तर अशा बियाण्याची उगवण ५० ते ६० % पर्यंत होऊ शकते. चारोळीची फळे आकाराने करवंदापेक्ष लहान किंवा काही वेळा करवंदाएवढी असतात. चारोळीची फळे सुरुवातीला हिरव्या रंगाची असतात. नंतर काळसर रंगाची होतात. चारोळीच्या फळामधील कठीण कवच असणाऱ्या बियांना ‘चारोळी’ असे म्हणतात. या बियांचा उपयोग चारोळीची रोपे एप्रिल – मे महिन्यात पॉलीथिनच्या पिशव्यांमध्ये तयार करण्यासाठी केला जातो. १५ x २२ सेमी लांबीच्या पॉलीथिनच्या पिशव्या शेणखत आणि गाळाच्या मातीच्या मिश्रणाने भरून त्यामध्ये चारोळीचे बियाणे कठीण भागावर घासून किंवा गरम पाण्यामध्ये जर्मिनेटर ५० मिली प्रति लिटरप्रमाणे उगवणीसाठी वापरल्यास उगवण चांगली होऊ शकते. गादीवाफ्यावर बिया पेरूनही चारोळीची रोपे तयार करता येतात. बियांची पेरणी करण्यासाठी फळामधील कठीण कवच फोडून आतील मऊ बी काढून ते पिशवीत अथवा गादीवाफ्यावर जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून पेरावे. २५० ग्रॅम चारोळीपासून ४५० बी मिळते.
बिया पेरल्यावर पिशव्यांना किंवा गादीवाफ्याला हलकेसे पाणी द्यावे. सुमारे ८ ते १० दिवसांत या बियांची उगवण होते. चारोळीची रोपे, आंबा, चिंच, बोर, काजू या कोरडवाहू फळझाडांच्या रोपांप्रमाणे जोमदारपणे वाढत नाहीत. रोपाची वाढ जोमदारपणे होण्यासाठी पिशव्यांतील माती अधून मधून हलवावी आणि अगदी थोडे थोडे नत्रयुक्त खत व कल्पतरू सेंद्रिय खत रोपांना देऊन ताबडतोब भरपूर पाणी द्यावे. ही रोपे पुढील वर्षीच्या पावसाळ्यात लागवडीसाठी योग्य होतात.
रोपे तयार
करताना महत्त्वाच्या पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात :
१) ज्या
बियाण्यांची उगवण करावयाची आहे ते बियाणे पक्व आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे.
२) बियाणे
स्वच्छ करून नंतरच पेरावे.
३) बियाणे
सुधारित पद्धतीने आणि योग्य हंगामातच पेरावे.
४) बियाण्याची
बीजप्रक्रिया अगोदर करून नंतर बी पेरावे.
५) बियाणे पॉलीथिन
बॅग, परळी (मातीची कुंडी) किंवा गादीवाफ्यावरच पेरावे.
६) नवीन
लागवडीकरिता दर्जेदार रोपांची लागवड करावी.
लागवडीचा हंगाम
आणि लागवड :
चारोळीची लागवड चौरस पद्धतीने करावी. दोन झाडांमधील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ४.५ किंवा ५ x ५ किंवा ६ x ६ किंवा ७ x ७ मीटर अंतरावर रोपांच्या लागवडीसाठी ०.६ x ०.६ x ०.५ मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे भरताना खड्ड्यांच्या तळाशी वाळलेला पाला पाचोळा, वाळलेले गवत, भाताचा पेंढा किंवा उसाचे पाचट यांचा वितभर जातीचा थर द्यावा. त्यात अधून – मधून लिंडेन १०% पावडर मिसळावी. खड्ड्यात ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत, १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरावे. शेणखतात लिंडेन पावडर मिसळावी व खड्डे संपूर्ण भरावेत.
चारोळीची लागवड ही पावसाळ्याच्या सुरवातीला जून – जुलै महिन्यात करावी. ही लागवड करीत असताना तांत्रिक पद्धतीने भरलेल्या खड्ड्यात पॉलीथिन पिशवी फाडून मातीचा गोल ज्या स्थितीत आहे तसाच ठेवून लागवड करावी व लागवडीनंतर रोपांना लगेच पाणी द्यावे.
वळण आणि छाटणी :
चारोळीच्या झाडाला लागवडीनंतर सुरुवातीच्या दोन – तीन वर्षात योग्य वळण देणे हे पुढील उत्पादनाच्या आणि झाडाच्या वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे. चारोळीचे झाड १ मीटर उंचीचे असताना झाडाचे शेंडे खुडावेत व त्यापासून पुढे येणाऱ्या ५ ते ६ जोमदार फांद्या योग्य अंतरावर चारी दिशांना विखुरलेल्या स्थितीत वाढतीत अशाप्रकारे ठेवाव्यात. झाडाची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर ५ वर्षापर्यंत वेड्या वाकड्या वाढणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. चारोळी या फळझाडाची दरवर्षी छाटणी करण्याची आवश्यकता नाही.
आंतर पिकाची
लागवड :
चारोळीच्या बागेमध्ये सुरूवातीची २ ते ३ वर्ष आंतरपिके चांगल्याप्रकारे घेता येतात. त्यामुळे बागेत तण न होता बाग स्वच्छ राहते. बागेमध्ये श्रावणघेवडा, गवार भुईमूग, उडीद, मिरची, तीळ, वाटाणा, कारली, चवळी, झेंडू तसेच चारोळीची झाडे थोडी मोठी झाल्यावर तूर, करडई , एरंडी, शेवगा, कढीपत्ता इत्यादी आंतरपिके घ्यावीत.
तणाचे नियंत्रण :
तणांची मुख्य पिकाबरोबर अन्न, पाणी आणि सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा होते. आणि त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो म्हणून बागेतील तणांचा वेळेवर बंदोबस्त करणे आवश्यक आहे. हिरवळीची खाते उदा. ताग, धैंचा दोन्ही झाडाच्या मधील पट्ट्यात पेरून तणांच्या वाढीस प्रतिबंध करावा. वेळोवेळी निंदणी, खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.
खत व्यवस्थापन:
झाडांच्या जोमदार वाढीसाठी दरवर्षी जून महिन्यात प्रत्येक झाडास ५०० ग्रॅम कल्पतरू खत पहिली ५ – ६ वर्षे बहार लागेपर्यंत द्यावे. नंतर बहार लागल्यावर दरवर्षी जूनमध्ये ५०० ग्रॅम आणि डिसेंबर – जानेवारीमध्ये ५०० ग्रॅम खत द्यावे.
फवारणी :
चारोळीच्या निरोगी वाढीसाठी लागवडीनंतर १ महिन्याच्या अंतराने जुलै, ऑग्स्ट, सप्टेंबरमध्ये सप्तामृत ५०० मिलीची १०० लि.पाण्यातून याप्रमाणे बहार लागेपर्यंत दरवर्षी ३ ते ४ फवारण्य कराव्यात.
अधिक उत्पादनासाठी बहार धरल्यानंतर मार्च ते मे पर्यंत दर
महिन्याला ५०० मिली, ७५० मिली आणि १ लिटरची २०० लिटर पाण्यातून सप्तामृताची फवारणी
घ्यावी. म्हणजे मोहोर जादा लागून त्याची गळ न होता पोषण होईल आणि उत्पादन, दर्जात इतर पिकांप्रमाणे या
तंत्रज्ञानाने निश्चित वाढ होईल. चारोळी पिकावर अद्याप प्रयोग झालेले नसले तरी
व्यापारी तत्वावर उत्पादन घेण्याकरिता डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून निरिक्षण
आम्हाला कळवावीत.
काढणी, हाताळणी आणि प्रक्रिया :
चारोळीच्या रोपापासून लागवडीनंतर ६ ते ७ वर्षानंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. साधारणपणे दहा वर्षानंतर चारोळीच्या झाडापासून १० ते १५ किलो फळे मिळतात व त्यापासून सुमारे १॥ ते २ किलो चारोळीचे बी मिळते. जास्तीत – जास्त उत्पादन २५ किलो फळे मिळू शकतात. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये चारोळीच्या झाडांना मोहोर येतो आणि एप्रिल, मे महिन्यात फळे पक्व होऊन चारोळी मिळण्यास सुरुवात होते. चारोळीच्या फळांचा रंग काळा झाल्यानंतर फळे पक्की झाली असे समजून फळाची काढणी जमिनीवरून काठीने झोडपून करतात. काढणीनंतर फळे पाण्यात सुमारे ३ ते ४ दिवस भिजत ठेवावीत. नंतर फळाचा काळा गर हाताने चोळून टाकावा आणि बी वेगळे करावे. हे कठीण कवच असलेले बी सावलीत वाळवितात. वाळलेली कठीण फळे जात्यावर अगदी हलकेशी भरडतात. त्यामुळे कठीण कवच फुटून आतील बी वेगळे होते. यालाच ‘चारोळी’ म्हणतात. चारोळीच्या चांगल्या वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सुमारे दोन किलो चारोळी मिळते. जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे चारोळीचे उत्पादन वाढत जाते. चारोळी बी चा सध्याचा किरकोळी बाजार भाव सुमारे २२० ते २६० रू. किलो आहे. प्रत्येक झाडापासून ठोक उत्पन्न सुमारे ४०० ते ५०० रू. सहज मिळू शकते. झाडाचे आयुष्य ४० ते ५० वर्षे असते. जुन्या चारोळीचा भाव नवीन चारोळीपेक्षा जास्त असतो. ही झाडे ४० ते ५० वर्षे उत्पादन देतात.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.