जळगाव: केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या अनुदान धोरणात नुकतेच बदल केले असून महत्त्वाच्या श्रेणींचे अनुदान घटविले आहे.
नव्या धोरणात नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक अशा चारही मुख्य अन्नद्रव्यांच्या अनुदानात किंचित कपात करण्यात आली आहे. अमोनियम फॉस्फेट हे खत पूर्वी अनुदानाच्या यादीत नव्हते. त्याला आता स्थान देत केंद्र सरकारने चांगले पाऊल टाकले आहे. नव्या हंगामासाठी खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान (एनबीएस) धोरणात केल्या जाणाऱ्या बदलाबाबत अनके दिवसांपासून चर्चा सुरु होती.
दरम्यान, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे देशभर खतांचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. दुसऱ्या बाजूला आयात देखील थांबलेली आहे. प्रत्यक्षात व्यवहार सुरळीत होत ऐन हंगामात खतांची मागणी वाढेल तेव्हा खतांची उपलब्धता पुरेशी असेल की नाही हे आताच सांगता येत नाही. कारण, देशांतर्गत खत कंपन्यांचे अनेक प्रकल्प सध्या मनुष्यबळ व कच्च्या मालाच्या वाहतुकीतील अडचणींना सामोरे जात आहेत. यात या नव्या निर्णयामुळे खतांच्या किमतीत वाढ होऊ शकते.
अशी आहे खताचे नवे अनुदान धोरण
श्रेणी | जुने अनुदान दर | नवे अनुदान दर | कपात |
---|---|---|---|
नत्र | १८.९०१ | १८.७८९ | ०.११२ |
स्फुरद | १५.२१६ | १४.८८८ | ०.३२८ |
पालाश | ११.१२४ | १०.११६ | १.००८ |
गंधक | ३.५६२ | २.३७४ | १.१८८ |
(सर्व आकडे रुपये प्रतिकिलोसाठी आहेत.)