यावर्षी महाराष्ट्रात सर्वत्र झालेल्या अल्प पावसामुळे सद्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून त्यानंतरही थंडीचा सुरू असलेला लपंडाव यामुळे रब्बीच्या पिकांवरही वाईट परिणाम होत आहे.
कधी बोचरी तर कधी कडाक्याची थंडी पडत असल्याने सद्या राज्यातील सर्वत्रच गहू, हरभरा, मका या पिकांचे उत्पादन घटण्याची धास्ती शेतकर्यांनी घेतली आहे. या थंडीचा ऊस पिकावरही काही ठिकाणी लोकरी मावा, तांबेरा रोग पडून परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे. काही दिवस थंडी तर पुन्हा ढगाळ वातावरण तर मध्येच पाऊस अशा वातावरणामुळे पिकांची हानी होत असल्याने शेतकरीवर्ग संभ्रमात असून किमान दोन महिने थंडी चांगली पडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सद्या राज्यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसाठी थंडी अत्यावश्यक असते. मात्र पावसाळा लांबल्यामुळे या पिकांसाठी आवश्यक असलेली थंडी पडलेली नाही. सद्या कधी उन्हाळ्यासारखे तर कधी पावसाळ्यासारखे वातावरण दिसत असूून या बदलत्या हवामानामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होवू लागला आहे. गहू हे थंड व कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे. त्यामुळे सर्वात जास्त फटका गहू तसेच ऊस या पिकांना बसण्याची शक्यता असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.
दरम्यान, कांदा, टोमॅटो तसेच पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडेही शेतकर्यांचा कल वाढला आसून कांद्याचे दरही कमालीचे खाली आल्याने केंद्र शासनाच्या धोरणामुळे दरात चढ-उतारही होत आहेत. कांद्यांचे दर वाढल्यानंतर रोपांचेही भाव वाढले होते. तथापि, पीक हातात येईपर्यंत दर तेजीत राहतील का याबाबत शेतकरी साशंक असून अस्मानी संकटाला तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे किमान उत्पादित मालास चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकर्यांतून व्यक्त होत आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल