गुरांचे आरोग्य व्यवस्थापन भाग – १
दूध उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. यशस्वी दुग्धोत्पादनासाठी थोडीशी पण सुनियोजित व वेळेवर काळजी घेतली तर संपूर्ण जगाला पुरेल एवढे दुग्धोत्पादन भारत देशात होऊ शकते. यशस्वी दुग्धोत्पादनाची निरोगी पशुधन, गोठा व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, स्वच्छ दुग्धोत्पादन व योग्य साठवणूक आणि वितरण ही पंचसूत्री आहे.
दुग्धोत्पादनासाठी वापरात येणारे पशुधन गायी, म्हशी स्वस्थ व निरोगी राहिल्यास अधिक प्रमाणात व सकस दुग्धोत्पादन होईल यात शंकाच नाही. यातून शेतकऱ्यांचा फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल व आर्थिक उन्नती होईल. चला जाणून घेऊ यशस्वी दुग्धोत्पादनासाठी गुरांचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे ते.
रोगप्रसार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
रोगी जनावर वेगळे ठेवावे, रोगी जनावराचे मलमुत्र दूर नेऊन पुरून टाकावे. मेलेल्या रोगी जनावराच्या नाकातोंडात व गुदद्वारात निर्जंतुक द्रवाचे बोळे घालून दूर नेऊन पुरावे. संसर्ग झाला असल्याची शंका आलेल्या जनावरांना दुसऱ्या ठिकाणी बांधावे. निरोगी जनावरास रोग प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. जनावरांना शक्यतो घरीच विहिरीचे पाणी पाजावे. रोगी व निरोगी जनावरांची देखभाल एकाच माणसाने करू नये. गोठयाच्या भिंतीना ३ ते ४ महिन्यांनी चुन्याची सफेदी द्यावी. सभोवतालच्या साठवलेल्या पाण्याचा निचरा करावा.
निरोगी जनावर व आजारी जनावर यांमधील फरक
अनु.क्र | तपशील | निरोगी जनावर | आजारी जनावर |
१) | डोळे | पाणीदार, चौफेर नजर | निस्तेज, पाणी व पू वाहणारे |
२) | कान | टवकारलेले व मोकळेपणाने हालचाल करणारे | लाल, अगर फिक्कट पडलेले व हालचाल नसलेले |
३) | त्वचा | मऊ, उबदार, सफेद व केस साफ बसलेली | अति गरम वा थंड, केस उभारलेले व निस्तेज |
४) | शेण | किंचित काळसर, पिंगट, मऊ बांधीव | अति घट्ट किंवा अति पातळ, रक्त मिश्रित, दुर्गंधीयुक्त |
५) | लघवी | किंचित पिवळसर व सफेद | थोडी थोडी, अतिलाल व कष्टाने होते. |
६) | श्वासोछ्वास | संथ व नियमित | अधिक प्रमाणात धापा टाकते |
७) | नासाग्र | ओले, द्रव्युक्त, घर्मबिंदुयुक्त | कोरडे |
८) | खाणेपिणे | शांत व नियमितपणे रवंथ करते | कमी प्रमाणात अगर अजिबात रवंथ करीत नाही |
१) गोठ्यातील जनावरांची संख्या मर्यादित ठेवावी. गोठ्यात जनावरांच्या अंगाखाली पसरलेला चारा, शेण, मूत्रामुळे जनावरांच्या पायाला चिखल्या, जखमा होऊ शकतात. चिखल्यामुळे थंडी वाढते. शिवाय जंत, कृमी, माश्या यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन गोठा स्वच्छ ठेवावा. नियमितपणे गोठ्याचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
२) अतिशय थंडीमुळे जनावरांच्या पायाला भेगा पडून जखमा, चिखल्या होतात आणि अशा जखमांमध्ये संसर्ग होतो. या दिवसांत जनावरांच्या खुरांची विशेष काळजी घ्यावी म्हणजे पायाचे विकार टाळता येतील. खूर वाढलेले असल्यास कापून घ्यावेत.
३) जनावरे आजारी वाटल्यास तत्काळ पशुवैद्यकांमार्फत औषधोपचार करावेत. आजारी जनावरांच्या अंगावर ऊबदार घोंगडी टाकावीत.
६) तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जनावरांचे लसीकरण करावे. सप्टेंबर महिन्यात आंत्रविषाराची लस देणे गरजेची असते. त्या पुढील पंधरवड्यात तोंडखुरी आणि पायखुरीची लसीकरण केलेले असावे. डिसेंबर-जानेवारीत एकटांग्या आणि प्लुरोन्यूमोनियाचे लसीकरण करावे, तसेच कृमीनाशकांचादेखील वापर करावा.
८) डिसेंबर-जानेवारीत दिवसांत जनावरांच्या अंगावरदेखील पिसवा, माशा, डास, गोचीड यांचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून गोठ्याची आणि जनावरांची स्वच्छता ठेवावी.
९) थंडीच्या दिवसांत जनावरांना व्यायामाची जास्त गरज असल्याने त्यांच्या शरीराची जास्तीत जास्त हालचाल होईल यावर लक्ष द्यावे.
आजारी जनावरांची नोंद
जनावर आजारी पडल्यावर कोणती लक्षणे दाखवतात हे पशुपालकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज भासल्यास पशुवैद्यकाची मदत घ्यावी. आपले जनावर आजारी असल्याचे लक्षात आल्यास आजाराची लक्षणे टिपून / नोंदवून ठेवावी व पशुवैद्यकास ही लक्षणे सांगावी. या लक्षणांवरून व इतर माहितीद्वारे आजाराचे निदान करता येऊ शकते. अचूक निदान करून योग्य उपचार झाल्यास जनावर लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते. आपली चूक लपविण्यासाठी पशुवैद्यकास अयोग्य किंवा चुकीची माहिती सांगू नये. त्यामुळे आजाराचे योग्य निदान करण्यास अडचणी निर्माण होतात. अचूक उपचार पद्धतीचा अवलंब करता येत नाही आणि आजार बळावण्याची शक्यता असते.
आजारी जनावरांविषयी पशुवैद्यकाला द्यावयाची माहिती
१) जनावराचे वय काय आहे?
२) जनावर किती काळापासून आजारी आहे.
३) चारा व पाणी यात काही बदल केला होता का?
४) जनावर नेहमीसारखे रवंथ करते का?
५) शेण व मुत्रात काही बदल जाणवतो का?
६) लसीकरण केले आहे की नाही?
७) अगोदर कोणता औषधोपचार केला होता?
८) शरीरक्रियेत कोणता बदल जाणवतो?
९) गावात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे का?
१०) हगवणयुक्त जनावराचे शेण तपासणीसाठी द्यावे.
११) विषबाधा झाल्यास जनावराने सेवन केलेले पदार्थ पशुवैद्यकाला दाखवावेत.
अधिक जाणून घेऊ पुढील भागात…..
सदरची माहिती हि हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव द्वारा प्रसारित केली गेलेली आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.