हवामान व जमीन :
गाजर हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते. 10 ते 15 अंश से. तापमानाला तसेच 20 ते 25 अंश से. तापमानाला गाजराचा रंग फिक्कट असतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो. परंतु गाजराची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत करता येते. उत्तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे.
गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. म्हणून गाजराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमिन मऊ भुसभुशीत असावी भारी जमिनीची मशागत व्यवस्थित करुन जमीन भुसभुशीत करावी. गाजराच्या लागवडीसाठी खोल भुसभुशीत गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु 6 ते 7 असणारी जमीन निवडावी.
सुधारित वाण –
(अ) यूरोपीय जाती –
थंड हवामानात वाढणा-या या जाती द्विवर्षायू असतात. या गाजराचा रंग केशरी किंवा नारंगी असून आकाराने सारख्या जाडीचे असतात. या जातींच्या पानांची वाढ कमी असते. गाजरे खाताना कोरडी लागतात. लवकर काढणीला तयार होतात. या जातींचे बी भारतात तयार होत नाही.
१) नँटेज – या जातीचे गाजर मध्यम लांबीचे टोकापर्यंत एकसारखे, चांगल्या आकाराचे असते. आतील गाभ्याचा कठीण भाग थोडाच असतो. रंग इतर भागासारखा नारंगी असतो. पाण्याचे प्रमाण कमी असून या गाजरावर तंतूमुळे नसतात. उत्पादन चांगले येते. पेरणीपासून ७० ते १०० दिवसांत पीक तयार होते.
२) चॅटनी – या जातीचे गाजरे आकर्षक गर्द लालसर नारिंगी मध्यम लांबीची (११.५ – १५ से.मी.) आणि ३.५ से.मी. व्यासाची असतात. चव आणि गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट असून गर गोड, मुलायम असतो. ही जात कॅनिंग आणि साठवणीला चांगली आहे. हेक्टरी १५ टन उत्पन्न मिळते.
३) पुसा जमदग्नी – हा वाण ईसी-९९८१ आणि नँटेज यांच्या संकरातून विकसित केला आहे. गाजर १५-१६ से.मी. लांब, केशरी रंगाचे निमुळते असते. आतील भाग एकसारख्या रंगाचा नँटेजसारखा आहे. या वाणात कॅरोटीनचे प्रमाण अधिक असते. लवकर तयार होते आणि उत्पन्न जास्त येते.
याशिवाय डॅनव्हर्स, जेनो इंपेरेटर इत्यादी युरोपीय वाणांची लागवड थंड हवामानात करण्यात येते.
(ब) आशियायी जाती – या जाती उष्ण हवामानात चांगल्या येतात. या जातीचा रंग तांबडा, काळसर पिवळा असतो. गाजरे आकाराने मोठी असून आतील कठीण गाभा मोठा असतो. या जातीची गाजरे वरती जाड आणि टोकावडे निमुळते असतात. गाजरावर तंतूमुळे अधिक असतात. या जातीमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असते. मात्र ही गाजरे चवीला गोड असून जास्त रसाळ असतात. या जातीचे बी महाराष्ट्रात तयार होऊ शकते.
१) पुसा केशर – ही जात लोकल रेड आणि नँटेज या जातीच्या संकरातून विकसित करण्यात आली आहे. गाजराचा रंग आकर्षक, केशरी असून आतील भाग नरम असतो. यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक आहे. प्रतिहेक्टरी २५ टन इतके उत्पादन मिळते. काढणीस उशीर झाला तरी गाजरे चांगली राहतात. पेरणीनंतर ८०-९० दिवसांत तयार होते.
२) पुसा मेघाली – ही जात पुसा केशर आणि नँटेजच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. ही जात रबीसाठी चांगली असून ११०-१२० दिवसांत तयार होते. या
जातीची गाजरे आकर्षक नारंगी असून लांब असतात. या गाजरावर तंतूमुळे नसतात. यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर असते. या जातीचे उत्पादन हेक्टरी २५ ते २८ टन मिळते. याशिवाय सिलेक्शन २२३ नं. २९ हे वाण पंजाबमध्ये विकसित करण्यात आले आहे.
लागवड :
गाजर पिकाच्या वाढीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन योग्य असते. गाजर हे थंड हवामानातील पीक आहे, त्यामुळे रब्बी हंगामात गाजराची लागवड प्रामुख्याने केली जाते. रब्बी हंगामातील गाजरे गोड असतात. गाजराच्या नॉन्टेस, चॅन्टनी, पुसा मेघाली, पुसा केशर या जाती योग्य आहेत.
जमीन चांगली नांगरून, शेणखत मिसळून लागवडीसाठी सपाट वाफे तयार करावेत. सपाट वाफ्यावर १५ X १५ सें.मी. किंवा २० X २० सें.मी. अंतरावर बी पेरावे. पेरणीपूर्वी बी २४ तास पाण्यात भिजत घालावे.
बी पेरताना बारीक वाळूत मिसळून द्यावे. लागवडीसाठी हेक्टरी सहा ते आठ कि.ग्रॅ. बियाणे लागते. गाजराला हेक्टरी २५ कि.ग्रॅ. नत्र, २५ कि.ग्रॅ. स्फुरद, ७० कि.ग्रॅ. पालाश द्यावे. रासायनिक खतांची मात्रा ही माती परीक्षणानुसारच द्यावी.
अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीपूर्वी द्यावे. उरलेली नत्राची मात्रा पाच ते सहा आठवड्यांनी द्यावी. गाजरास पाणी गरजेनुसारच द्यावे, कारण जादा पाणी दिल्यास गाजराची गोडी कमी होते व प्रत ढासळते.
कीड रोग व त्याचे नियंत्रण :
गाजराच्या पिकावर साडया भुंगा (कॅरट विव्हिल) सहा ठिपके असलेले तुडतुडे आणि रूटफलाय या किडीचा उपद्रव होतो. सोंडया भुंगा आणि तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिली मेलॅथिऑन मिसळून फवारावे. गाजरावर रूटफलाय या किडीची प्रौढ माशी गर्द हिरव्या ते काळसर रंगाची असते. या किडिच्या अळया पिवळसर पांढ-या रंगाच्या असून त्या गाजराची मुळे पोखरुन आत शिरतात आणि आतील भाग खात त्यामुळे गाजराची मुळे वेडीवाकडी होतात आणि कुजतात. गाजराची पाने सुकतात. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 3 मिली डायमेथॉएट मिसळून फवारावे. गाजराच्या पिकावर करपा, भुरी, मर पानांवरील ठिपके इत्यादी रोंगाची लागण होते.
पाणी व्यवस्थापन :
बियांची उगवण चांगली होण्यासाठी जमिन तयार झाल्यावर वाफे आधी ओलावून घ्यावेत, पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.
उगवण झाल्यावर नियमित पाणी देऊन पिकाच्या 50 दिवसाच्या कालावधीत जमिनीत चांगला आंलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी.
गाजर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे म्हणजे गाजरात गोडी निर्माण होते.
पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्त होते.
काढणी :
कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नागराच्या ससाहारूयाने गाजराची काढणी करावी.
गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत.
लहान मोठी गाजरे आकारानुसार वेगळी करावीत.
गाजराचे उत्पादन हेक्टरी 8 ते 10 टन इतके मिळते.