1. काढणी
पिकांतील आंतरमशागती आणि तपासणी झाल्यानंतर पीक जेव्हा पक्व होईल, तेव्हा ते काढावे. बीजोत्पादन पिकांची काढणी पक्कतेस करणे आवश्यक असते; कारण त्या वेळी बियाण्याची पूर्ण वाढ झालेली असते व बियाण्यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने सर्व गुणधर्म असतात. बियाणे पक्व होण्याच्या आधी काढले तर मळणी आणि उफणणीच्या वेळेस त्यातून अपरिपक्व बियाणे जास्त प्रमाणात निघून वाया जाते आणि उत्पन्न कमी होते. काढणी उशिरा झाली तर बियाणे शेतातच गळून पडल्यामुळे नुकसान होते. उत्पन्नात घट येते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण साधारणत: 12 ते 15 टक्के दरम्यान असल्यावर ते काढण्यास तयार होते. काढणी वेळेवर झाल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते.
बियाण्याची शुद्धता ही काढणीनंतर होणार्या हाताळणीवर अवलंबून असते. काढणी आणि मळणी करतेवेळी इतर बियाण्याची भेसळ त्यात होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी बियाणे क्षेत्रातील पीक वेगळे ठेवावे. मळणी शक्यतो सपाट जागेवर ताडपत्रीवर किंवा फरशीवर करावी. सारवलेल्या जागेवर मळणी केल्यास बियाण्याकडून जमिनीतील पाणी / ओलावा शोषला जाण्याची शक्यता असते. मळणीयंत्र बियाण्याच्या आवश्यकतेनुसार व्यवस्थित सेट केलेले असावे.
2. बियाणे वाळवणे
काढणी आणि मळणीच्या वेळेस बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने ते उन्हात वाळवणे आवश्यक असते. त्यामुळे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊन साठवणुकीत बियाण्याची उगवण क्षमता आणि जोम टिकून राहतो. बियाण्यातील पाण्याचे प्रमाण ठरावीक पातळीपर्यंत कमी केल्याने साठवणीच्या वेळी किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
3. तात्पुरती साठवण
थोडे दिवस साठवणीकरिता स्वच्छ केलेल्या कीडविरहित पोत्यात किंवा नवीन पोत्यात बियाणे भरून ठेवावे. पोत्यावर बियाण्याची संपूर्ण माहिती लिहिलेली असावी. पोती जमिनीपासून काही अंतर ठेवून उंचावर तयार केलेल्या लाकडी रॅक्सवर ठेवावी. एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची संख्या 4/5 पेक्षा जास्त असू नये. तसेच बियाणे स्वच्छ, थंड आणि कोरडे हवामान असलेल्या भांडारात साठवावे. आवश्यकतेनुसार कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचा भांडारात वापर करावा. त्यानंतर बियाणे प्रक्रिया केंद्रावर पाठवावे.