बीजोत्पादन करताना घ्यावयाची काळजी
संकरित/सुधारित वाणांचे बीजोत्पादन करताना त्यांच्या उत्पादनाच्या, प्रक्रियेच्या, साठवणुकीच्या तसेच वितरणाच्या वेळी आवश्यक ती सर्व काळजी घेतली गेली तरच शेतकर्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे बियाणे पोहोचू शकेल. यासाठी संकरित तसेच सुधारित वाणे कशी तयार केली जातात आणि ती तयार करताना काही बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.
नेहमीच्या प्रचलित वाणांपैकी जी वाणे चांगले उत्पन्न देतात, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, त्यामधून सुधारित वाणांची निवड केली जाते. शेतकर्याने बियाणे खरेदी करताना त्यांची जात, उगवणक्षमता तपासून घेणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे त्यांचे शरीरशास्त्रीय, रासायनिक व बाह्य गुणधर्म हे एकसारखे असले पाहिजेत. ते पुन्हा पुन्हा पेरणीसाठी वापरले असता त्यांच्या गुणधर्मामध्ये कोणताही फरक येत नाही. असे वाण प्रचलित वाणापेक्षा चांगले उत्पन्न देतात. उत्पादित धान्याची किंवा उत्पादनाची प्रत एकसारखी असल्यामुळे बाजारामध्ये भावसुद्धा चांगला मिळतो.
बीजोत्पादन करताना त्यांचे वितरण, परीक्षण आणि प्रमाणीकरण या सर्वांसाठी जे नियम तयार झाले आहेत, ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे. बियाण्यांच्या निरनिराळ्या बाबींचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये बियाण्याची शुद्धता, रंग, त्यांचा आकार व प्रत या सर्व गोष्टींचे शास्त्रीयदृष्ट्या परीक्षण होणे गरजेचे असते. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच बीजोत्पादन केले पाहिजे. यासाठी प्रथम बियाण्याची प्रत तपासली पाहिजे. याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकर्याला शुद्ध व चांगल्या प्रतीचे बियाणे देणे हा होय.
1. हवामान
आपल्या भागातील वातावरणात चांगल्या प्रकारे येऊ शकणार्या पिकांचीच शक्यतो बीजोत्पादनासाठी निवड करावी. बहुतांश पिकांना मध्यम स्वरूपाचा पाऊस, तापमान आणि आर्द्रता पोषक असते. पिकांना फुलोर्यात असताना स्वच्छ, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान मिळाल्यास परागीकरण चांगल्याप्रकारे होण्यास मदत होते. फुलोर्याच्या काळात जास्त पाऊस किंवा तापमान परागीकरणास अयोग्य असते. त्यामुळे अशा प्रकारचे हवामान असणार्या भागात शक्यतो बीजोत्पादन घेऊ नये आणि घ्यावयाचेच असल्यास अशा प्रकारच्या हवामानात जोमदारपणे येणार्या पिकांचीच निवड करावी.
2. जमीन
बीजोत्पादनासाठी शक्यतो सपाट, मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन शक्यतो तण, कीड, अथवा रोगग्रस्त नसावी. तसेच ज्या पिकाचे बीजोत्पादन घ्यावयाचे आहे, त्या जमिनीमध्ये आधीच्या हंगामात त्या पिकाचे त्याच अथवा दुसर्या जातीचे पीक घेतलेले नसावे. शिवाय बीजोत्पादनासाठी आवश्यक विलगीकरण अंतर असावे.
जमिनीचे प्रामुख्याने हलकी, मध्यम व भारी असे तीन प्रकार पडतात. हलकी जमीन म्हणजे 30 सें.मी. पर्यंत मुरूम असतो. मध्यम जमिनीत 60 सें.मी. किंवा भारी जमिनीत 60 सें.मी. किंवा त्यापेक्षा जास्त खोलीवर मुरूम लागत नाही. अशा जमिनीस भारी व काळी कसदार जमीन असे म्हणतात.
3. विलगीकरण
बीजोत्पादनाचे क्षेत्र शक्यतो त्या पिकाच्या इतर जातींपासून प्रमाणीकरण यंत्रणेच्या नियमाप्रमाणे अलग (अंतर राखून) असावे. विलगीकरण अंतर हे प्रत्येक पिकांसाठी वेगवेगळे असते आणि पिकाच्या परागीभवनाच्या पद्धतीप्रमाणे कमी जास्त होते.
4. पूर्वमशागत
पेरणीपूर्व खोल नांगरट करून घ्यावी म्हणजे जमिनीतील तण कमी होण्यास मदत होते. कुळवाची पाळी घालून जमीन चांगली भुसभुशीत करून पेरणीसाठी तयार करावी.
5. बियाणे
पायाभूत बीजोत्पादनासाठी मूलभूत बियाणे तर प्रमाणित बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावे. बियाण्याच्या पिशवीवरील खूण चिठ्ठी काळजीपूर्वक पाहावी.
मुलभूत (पायाभूत) बियाणे पीक पैदासकाराने वाण निर्माण केल्यानंतर तयार केलेल्या केंद्रक (मूळ) बियाण्यापासून तयार केलेले असते आणि त्याची आनुवंशिक शुद्धता 100 % असते. पायाभूत बियाणे मुलभूत बियाण्यापासून तयार केले जाते. हे बियाणे मुख्यत: कृषी विद्यापीठे, शेती महामंडळ, तालुका बीजगुणन केंद्र व सरकारी प्रक्षेत्रावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तयार केले जाते.
6. प्रक्रिया
बियाणे पेरणीपूर्वी त्यावर प्रक्रिया केलेली नसल्यास प्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये बुरशीनाशके, कीटकनाशके, जिवाणू संवर्धक यांची प्रक्रिया करणे गरजेचे असते. अशी प्रक्रिया शेतावर पेरणीपूर्वी करावी.
7. पेरणी
पेरणी शक्यतो पेरणी यंत्राने करावी. त्यामुळे बी एका रेषेत पडते. लहान बी खोलवर पेरू नये. मोठ्या आकाराचे बी खोलवर पडले तरी उगवू शकते; कोरड्या जमिनीत बी खोलवर पेरावे म्हणजे त्याचा ओलाव्याशी संपर्क येऊन ते उगवते. रेताड जमिनीत बी खोल पडले तरी उगवू शकते परंतु भारी जमिनीत खोल पडू नये म्हणून पेरणी यंत्राने पेरणी करावी. बी एका रेषेत पेरल्यामुळे पिके काढणे सोपे जाते. तसेच पिकावर कीटकनाशकांची फवारणी, खते देणे, पिकाची पाहणी यासारखी कामे करणे सोईस्कर होते. तसेच संकरित बीजोत्पादनाच्या वेळी नर आणि मादी वाणांच्या ओळी ठराविक प्रमाणातच पेराव्या लागतात. उदाहरणार्थ, संकरित ज्वारी बीजोत्पादनात 4:2 या प्रमाणात अनुक्रमे मादी आणि नर वाणांच्या ओळी पेराव्यात. अशा ओळी पेरताना नर, मादी वाणाचे बी एकत्र होणार नाही यासाठी पूर्ण काळजी घ्यावी. नर वाणाच्या ओळी ओळखण्यासाठी टोकाला ताग पेरावे अथवा खुंटी रोवावी.
8. खते
रोग आणि कीडमुक्त बीजोत्पादनासाठी कोरडे हवामान चांगले असते. परंतु अशा हवामानात बीजोत्पादन क्षेत्रात गरजेनुसार पाणी देणे आवश्यक असते. भारी जमिनीपेक्षा हलक्या जमिनीस वारंवार पाणी देणे गरजेचे असते. फुलोर्यानंतर एक-दोन पाळ्या देणे बीजोत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. पेरणीनंतर जास्त दिवस ओल राहिल्यास अथवा पुरेसा ओलावा नसल्यास उगवण कमी होते. पिकांच्या वाढीनुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावी.
9. भेसळ काढणे
बीजोत्पादनामध्ये वेळोवेळी भेसळीची झाडे काढणे फारच महत्त्वाचे असते. वेगळ्या जातीची तसेच त्याच जातीची परंतु रोगट, पूर्णपणे न वाढलेली किंवा जास्त उंच किंवा बुटकी झाडे फुलोर्यात येण्यापूर्वी त्वरित पूर्णपणे उपटून काढून टाकावीत. पीक अशा प्रकारच्या भेसळीपासून मुक्त होईपर्यंत दररोज भेसळ काढण्याचे काम चालू ठेवावे. ज्या पिकांत परपरागीभवन होते, अशा पिकांतील भेसळीची झाडे फुलोर्यात येण्यापूर्वीच काढावीत. जी झाडे फुलोर्यात येण्यापूर्वी ओळखता येत नाहीत, अशी झाडे फुलोर्यात आल्यानंतर सहज ओळखता येतात. तसेच संकरित बीजोत्पादनात मादी वाणाच्या ओळीत नर वाणाची झाडे असल्यास तीसुद्धा काढून टाकावीत. पीक पक्क होण्याच्या अवस्थेत सुध्दा भेसळ काढणे महत्त्वाचे असते. वेगळ्या गुणधर्माची झाडे स्वपरागीभवन होणार्या पिकांमध्ये पक्व होण्याच्या अवस्थेतही काढता येतात.
10. बीजोत्पादन क्षेत्र तपासणी
बीजोत्पादन क्षेत्राची प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी झाल्यानंतर प्रमाणीकरण यंत्रणा पिकाच्या परागीभवनाच्या प्रकारानुसार 2 ते 4 क्षेत्र तपासण्या करतात. यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे बीजोत्पादन आहे किंवा नाही, ते तपासले जाते; तसेच बीजोत्पादनाबाबत मार्गदर्शन केले जाते.
11. आंतरमशागत
चांगल्या प्रकारचे बीजोत्पादन घेण्यासाठी बीजोत्पादनाचे क्षेत्र तणविरहित असणे फार आवश्यक असते. तणामुळे बीजोत्पादनाची प्रत कमी होते. काढणीच्या वेळेस बियाण्यांमध्ये तणाचे बी मिसळण्याचा संभव असतो. असे बी वेगळे करणे फारच जिकिरीचे होते. तणांमुळे कीड आणि रोग वाढण्याचा किंवा पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे आवश्यक तेवढ्या निंदण्या-खुरपण्या करून बीजोत्पादन क्षेत्र तणविरहित ठेवावे.
12. पीक संरक्षण
रोग आणि कीड यांचे प्रभावी नियंत्रण हा बीजोत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रोग आणि कीड यांच्या संसर्गामुळे बीजोत्पादन घटते आणि तयार झालेले बियाणे निकृष्ट प्रतीचे होते. रोग अथवा किडींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. त्यासाठी चांगल्या प्रतीची कीटकनाशके अथवा बुरशीनाशके वापरावीत. रोग आणि किडींच्या बंदोबस्तासाठी वेळोवेळी आवश्यक तेव्हा फवारण्या कराव्यात. रोग आणि कीडग्रस्त रोपे / झाडे उपटून काढावीत. बियाण्यापासून होणारे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी नेहमी प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.