कृषी यंत्रसामग्रीची निगा व घ्यावयाची काळजी

0

कृषीअवजारे व यंत्रांच्या सर्व भागाचे परीक्षण व वेळेवर निगा राखणे आवश्यक असते. त्यामुळे हि अवजारे / यंत्रे आपल्याला खात्रीशीर सेवा देऊ शकतात. योग्य वेळेस दुरुस्ती व वंगण आदी कामे केल्यास यंत्राचे आयुर्मान वाढण्यास मदत होते. तसेच अवजारे / यंत्रांची कार्यक्षमता वाढून इंधन, वंगण यांचा खर्च मर्यादित ठेवता येतो. यंत्रे/ अवजारांचीवेळेवर निगा न राखल्याने होणारी झीज नियंत्रित होऊन वारंवार दुरुस्ती करावी लागत नाही. पर्यायाने खूप मोठ्या खर्चात बचत होऊन यंत्रांच्या दुरुस्तीवर होणारा खर्च कमी होतो. शेतीमधील दैनंदिन वापरात येणाऱ्या विविध अवजारांची योग्य प्रकारे काळजी घेऊन त्यांचे आयुर्मान कशा पद्धतीने वाढवता येईल त्याची माहिती पुढे दिलेली आहे.

रोटाव्हेटर                            

१) रोटाव्हेटरच्या सर्व फिरणाऱ्या भागांना वंगण द्यावे व सर्वे ग्रीसिंग पॉइंट्सना ग्रीस लावावे.

२) गिअर बॉक्समधील वंगण ऑईल ची पातळी तपासावी आणि ती कमी असल्यास त्यात योग्य ग्रेडचे ऑईल घालावे. ऑईल संपले असल्यास ते बदलावे.

३) रोटाव्हेटरची फिरणारी पाती सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पाती मोडली अथवा वाकली असल्यास गरजेनुसार ती बदलावीत किंवा दुरुस्त करावीत.

४) चेन स्प्रॉकेट व चेन केसमधील ऑईल तपासावे आणि४५० तास वापरल्यावर ओईल बदलावे.

५) चेनचा ताण योग्य स्थितीत ठेवावा.

६)रोटाव्हेटर वापरण्यापूर्वी त्याची सर्व नट – बोल्ट्स घट्ट आवळावीत.

काम सुरु करण्यापूर्वी प्राथमिक तपासणी.

१) पोलादी पाते व मुख्य चौकटीचे नट – बोल्ट्स तपासून घट्ट करावेत.

२) गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासून आवश्यक असल्यास तेल टाकावे.

३) ऑईल टाकीच्या तळाशी असलेल्या लेव्हल काठीच्यासहाय्यानेतेलाची पातळी तपासून योग्य तेवढी करावी.

४) नेहमी पुरेशी अतिरिक्त पाती व शिफारस केलेले नट – बोल्ट्स ट्रॅक्टरसोबत दिलेल्या अवजारांच्या पेटीत आहे याची खात्री करून घ्यावी.

५)रोटाव्हेटर ट्रॅक्टरला जोडतांना सर्व लिंक्स ( टॉप/ लोवर) व्यवस्थित जोडल्या गेल्या आहेत, कि नाही याची खात्री करून घ्यावी.

प्रत्यक्ष शेतात काम सुरु असतांना

१) रोटाव्हेटर शेतात वापरतांना अथवा वाह्तुकीच्या वेळी तो १० ते १५ से.मी पेक्षा सहसा जास्त उचलू नये. कारण पीटीओ शाफ्ट व कार्डन शाफ्ट यामधील कोण ३० अंशापेक्षा जास्त असता कामा नये.

२) पात्यांचा फिरण्याचा वेग पीटीओ च्या वेगावर आधारित असल्याने अॅक्सलेटर वाढवून तो आवश्यक तेवढा ठेवावा. माती कोरडी व काहीशी टणक असेल तर मात्र पहिल्या लो गेअरमध्ये ट्रॅक्टर चालवावा.

३) शेतात मशागतीच्या खोलीचा अंदाज घेऊन त्यानुसार रोटाव्हेटरच्या दोन्ही बाजूकडील खोली ठरविणाऱ्या पट्ट्या वक्रपट्ट्या नंतर जुळवून पक्क्या कराव्यात.

४) पात्यांची व इतर भागांची नट – बोल्ट्स नेहमी तपासून ठेवावीत.नट – बोल्ट्सचे आटे घासले गेले असतील तर नवीन नट – बोल्ट्स बसवावेत.

५) रोटाव्हेटर शेडमध्ये किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा. वापरनंतर ब्लेड्स साफ करावीत.

६) रोटरीगिअर बॉक्सचे गॅसकेट तपासावे व आवश्यक असल्यास ते बदलावे. गिअर बॉक्स साफ करतांना इंजिन बंद ठेवावे.

७) फारच कडक, कठीण व खडकाळ जमिनीवर रोटाव्हेटर चालवू नये.

हे टाळा

१)अतिकडक, खडकाळ जमिनीत वापरू नये. ट्रॅक्टरचा वेग अधिक वाढवून काम संपवण्याची घाई करू नये.

२) मशागतीची खोली अधिक जास्त वाढवू नये. रोटाव्हेटर बंद करूनच दुरुस्तीची कामे करावीत.

३) रोटाव्हेटरचा चालक प्रशिक्षित असणे आवश्यक आहे.

कापणी यंत्र                                  

१) कापणी यंत्र वापरण्यापूर्वी व वापर झाल्यानंतर त्याचे सर्व नटबोल्ट्स तपासून घ्यावे व ती सैल असल्यास घट्ट करावीत.

२) गरज असेल त्या भागांना वंगण म्हणून शिफारस केलेले ऑईल किंवा ग्रीस घालावे.

३) सर्व बेल्ट्स चा ताण ( टेन्शन) तपासून व्यवस्थित करून घ्यावा.

४) झिजलेल्या भागांना त्वरित बदलावे अथवा दुरुस्त करण्याजोगे असल्यास तात्काळ दुरुस्त करावे.

५) वापरण्यापूर्वी चालकाने सोबत टूल किट घेणे आवश्यक आहे.

६) कटिंग ब्लेड ( पाते ) रिपरवर घट्ट बसविले आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी.

७) यंत्राचे सर्व फिरणारे भाग उदा. कटर बार, बिअरिंग, चाके, पातेयांना नियमित व व्यवस्थित वंगण करावे.

८)पात्यांना नियमित धार काढावी. प्रत्येक तीस तासानंतर पात्यांना धार काढणे आवश्यक आहे.

मळणी यंत्र                                  

१) मळणी यंत्र वापरण्यापूर्वी व वापरानंतर त्याची सर्व नटबोल्ट्स तपासून घ्यावीत.

२) हे यंत्र शक्यतोवर शेडमध्येच ठेवावे किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.

३) यंत्र अधिक काळ वापरता येत नसल्यास गरज असलेल्या ठिकाणी वंगण देऊन ठेवावे. जेणेकरून हे भाग गंजणार नाहीत.

४) बेल्टचा ताण व्यवस्थित ठेवावा.

५) जर यंत्र इलेक्ट्रिक मोटार चलित असेल तर मोटरला पाण्यापासून बचावाकरिता व्यवस्थितरीत्या झाकून ठेवावे.

६) मळणी यंत्राच्या थ्रेशिंग ड्रमवरील पाने किंवा ड्रमवर घट्ट बसविले आहेत, कि नाही याची खात्री करूनघ्यावी.

७) प्रत्यक्षड्रमची गती आवश्यक तेवढी आहे, कि नाही हे टेकोमिटरच्यासहाय्यानेतपासून घ्यावे व आवश्यकतेनुसार गती सेट करून घ्यावी. यंत्राच्या सर्व फिरणाऱ्या भागांना नियमित वंगण करून घ्यावे.

८) मोटारची/ इंजिनची गती व ड्रमच्या गतीचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक असते. वापरापूर्वी चालकाने टूल किट व आवश्यक सुटे भाग सोबत घेणे आवश्यक आहे.

९) यंत्र वापरतांना भुशाचा आउटलेट वाऱ्याच्या दिशेने ठेवावा.

१०) यंत्र चालू असतांना हलू नये म्हणून तेवापरापूर्वी सपाट जमिनीवर घट्ट बसवावे.

११) यंत्रे वापरणाऱ्या मजुरास इजा पोहचू नये म्हणून कापलेले पिक यंत्रात टाकतांना त्या ठिकाणी योग्य ते सुरक्षा कवच बसवणे आवश्यक आहे.

१२) तुटलेले, गंजलेले, वाकलेले भाग त्वरित बदलावेत.

१३) धान्य चाळणीसाठी बसविलेल्या सर्व चाळण्या तपासाव्यात. छिद्र बंद असतील तर ती मोकळी करावीत.

१४) यंत्रास कापलेले पिक भरवताना त्यातदगड, खडे, माती, झाडाच्या फांद्या, लाकडाचे तुकडे इ. बाबी असता कामा नये.

१५) शक्यतो वाळलेले पिकाच यंत्रामध्ये मळणीसाठी भरावे.

१६) प्रत्येक ८ ते १० तासाच्या वापरानंतरयंत्रास थोडीशी विश्रांती द्यावी व मगच यंत्र पुन्हा वापरावे.

१७) यंत्र वापरात नसतांना यंत्राचे बेल्ट्स काढून ठेवावेत व यंत्र व्यवस्थित झाकून ठेवावे.

चेन सॉ/ प्रूनर / ग्रास कटर                 

१) चेन सॉ इंजिन हे पेट्रोलचलित असल्यानेत्यात विविध कंपन्यांनी निर्धारित केल्याप्रमाणेच पेट्रोल वा ऑईल मिश्रित पेट्रोलच वापरावे.

२) नेहमी कचराविरहीत ( गाळलेल्या) पेट्रोलचाच वापर करावा.

३) चेन सॉ / प्रूनर / ग्रास कटर माहिती पुस्तकात दिलेल्या वेळेपर्यंतच वापरावा अन्यथा तो गरम होऊन बंद पडू शकतो.

४) चेन सॉ / प्रूनर / ग्रास कटर यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेऊ नये.

५) काम झाल्यानंतर यंत्र साफ करूनच शेडमध्ये झाकून ठेवावे.

६) यंत्राच्या फिरणाऱ्या सर्व भागांना नियमितपणे वंगण करावे.

७)वापरापूर्वीचालकाने यंत्राचे आवश्यक सुटे भागव टूल किट सोबत ठेवावे.

८) यंत्र वापरण्यापूर्वी यंत्राच्या पात्यांना व्यवस्थित धार काढावी.

९) यंत्र प्रत्यक्ष वापरतांनायंत्राचे फिरणारे भाग व्यवस्थितपणे झाकलेले किंवा संरक्षित केलेले असावेत.

खड्डे खोदणी यंत्र :-                           

१) यंत्राची अधिकाधिक कार्यक्षमता मिळविण्यासाठी यंत्राचा वापर सुरु करण्याआधी सोबत दिलेली वापर पुस्तिका नीट वाचावी. जेणेकरून पुढील नुकसान टाळता येते.

२) गिअर बॉक्समधील ऑईल तपासून योग्य वेळी योग्य ग्रेडच्या ऑईलने बदलावे.

३) यंत्राच्या सर्व भागांना वंगण द्यावे.

४) यंत्र शेडमध्ये किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.

५) वापरण्यापूर्वी यंत्राच्या हायड्रोलिक यंत्रणेमधील ऑईल पातळी तपासावी वआवश्यकतेनुसार ऑईल टाकावे.

६) यंत्रवापरापूर्वी चालकास आवश्यक ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

७) खड्डे खोदताना यंत्रावरअतिदाब देता कामा नये,आवश्यकतेनुसारच दाब वाढवत जावा.

८) यंत्र वापरापूर्वी यंत्राचे आवश्यक सुट्टे भाग व टूल कीट चालकाने सोबत ठेवावेत.

स्वयंचलीत भात लावणी यंत्र :-                  

१) यंत्राला आवश्यक त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे ( ग्रीस किंवा ऑईल ) वंगण द्यावे.

२) वापर झाल्यानंतर यंत्र स्वच्छ धुवून व वाळवून ठेवावे.

३) इंजिनऑईल तपासून ते चांगले असल्याची खात्री करावी अथवागरज असल्यास योग्यग्रेडचे ऑईल भरावे.

४)फिरते भाग हवे तेवढे पुसून घ्यावे व त्यांना वंगण द्यावे.

५) यंत्राचे सर्व भाग व्यवस्थित काम करतात का, ते बघावे. आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी. तुटलेल्या, हरवलेल्या, अथवा खराब झालेल्या सर्व भागांच्या जागी लगेच नवीन भाग बसवावेत.

६) यंत्रशेडमध्ये किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.

शून्य मशागत यंत्र                       

१) यंत्राच्या सर्व फिरत्या भागांना वंगण द्यावे.

२) यंत्र वापरण्यापूर्वी सर्व नटबोल्ट्स व्यवस्थित आवळावीत.

३) यंत्र जास्तकाळ वापरायचे नसल्यास ते शेडमध्ये किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.

४)यंत्राच्या सुया झिजल्या किंवा मोडल्या असल्यास त्या दुरुस्त कराव्यात किंवा गरज असल्यास बदलाव्यात.

बियाणे व खत पेरणी यंत्र

१) या यंत्राच्या खताच्या टाकीमध्ये खतचिकटलेले असल्यास ते यंत्राच्या वापरानंतर स्वच्छ धुवावे. त्यात खताचे अवशेष शिल्लक राहता कामा नये.

२) यंत्राच्या सर्व फिरत्या भागांना वंगण द्यावे.

३) चेन व स्प्रोकेटला वंगण द्यावे व चेनचा ताण व्यवस्थित ठेवावा.

४) अवजाराच्या नळ्या ( बियाणे व खत ) खराब झाल्या असल्यास त्या बदलाव्यात.

५) फाळझिजले किंवा मोडले असल्यास ते बदलावे अथवा दुरुस्त करावे.

पल्टी फाळ नांगर                             

१) लोखंडी नांगराचा बाह्य भाग संपूर्ण धुवूनस्वच्छ करावा.

२) शेअर पॉइंट तुटला असल्यास बदलावा आणि घासला गेला असल्यास टोकदार करावा.अन्य सुट्या भागांची मोडतोड झाली असल्यास सुटे भाग न चुकता बदलावेत.

३) फाळांचे गंजण्यापासून संरक्षण होण्यासाठी खराब झालेले इंजिन ऑईल लावून ठेवावे. यामुळे फाळांची चकाकी कायम राहते.

४) कोल्टरला गंजप्रतिबंधक रसायन लावून ठेवावे.

५) शेडची व्यवस्था असल्यास नांगर शेडमध्ये ठेवावा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा.

६) पल्टी नांगराला हवे त्या जागी ग्रीस किंवा ऑईल वंगणास्तव घालावे.

कल्टीव्हेटर

१)कल्टीव्हेटरचा उपयोग करून झाल्यावर त्याचे शॉवेल ( पाते) घासले गेले असल्यास त्याचे टोक वरती उलटवून बसवून घ्यावेत.

२) वापरानंतरअवजार स्वच्छ धुवून व पुसून ठेवावे.

३)शॉवेल्सला गंजप्रतिबंधक रसायन किंवाखराब झालेले इंजिन ऑईल लावावे आणि इतर भागांना ऑईल पेंट द्यावा. त्यानंतर अवजार शेडमध्ये किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.

पॉवर वीडर/ छोटे पॉवर टिलर

१) इंजिनविषयीचा ‘ कालबद्ध निगा कार्यक्रम ’ राबवावा. उदा: फिल्टर बदल, ऑईल बदल, एअर क्लिनर ऑईल बदल, कार्बोरेटर / इंधन पंपाची स्वच्छता इत्यादी.

२)वापरण्यापूर्वीयंत्राचीसर्व नट – बोल्ट्स तपासूनघ्यावीत व घट्ट आवळावीत.

३) यंत्राच्या सर्व फिरत्या भागांना नियमित व व्यवस्थित वंगण करावे.

४) वापरापूर्वी पात्यांनाव्यवस्थित धार काढावी.

५) यंत्राचे पाते यंत्रावर व्यवस्थित बसवल्या गेले आहेत कि नाही, याची खात्री करावी.

६)वापरापूर्वीचालकाने यंत्राचे आवश्यक सुटे भागव टूल किट सोबत ठेवावे.

७) वापरानंतर यंत्र व्यवस्थित शेडमध्ये उभे करावेजेणेकरूनऊन व पावसामुळे यंत्राचे सुटे भाग गंजणार किंवा झिजणार नाहीत.

तव्याचा नांगर

१) सर्व बेअरिंग्जनानियमित ग्रीस द्यावे.

२) चालकास ट्रॅक्टरचे स्टिअरिंग जड जात असल्यास नांगराच्या सर्व जुळवण्या तपासून पहाव्यात.

३)तव्यांच्या कडा बोथट झाल्या असल्यास धारदार करून घ्याव्यात. तव्यांचा कोन योग्य प्रमाणात ठेवल्यास तव्यांच्या कडा धारदार करण्याची गरज नसते.

४) तव्यांचे सर्व नटबोल्ट्स वारंवार तपासून घट्ट करून घ्यावेत.

५)ट्रॅक्टरच्या पुढील चाकांवर पुरेसे वजन ( बॅलेस्टिंग ) द्यावे, जेणेकरूनट्रॅक्टरचा समतोल राखण्यास मदत होते.

६) उत्पादकाने चालक मार्ग्दर्शिकेत प्रकाशित केलेली खोली हि हायड्रोलिक सिस्टीमद्वारे निश्चित करावी.

कडबाकुट्टी यंत्र

१) यंत्राला लागणारे योग्य व्होल्टेज तपासून मगच यंत्र चालू करावे.

२) यंत्राची पाती ( ब्लेड) व्यवस्थित लावावीत म्हणजे यंत्राची दाढ व पाती ( ब्लेड ) मधील अंतर व्यवस्थित राखावे व पात्यांची धार योग्य ठेवावी.

३) यंत्राच्या कटिंग व्हीलचा व पुलीचाबोल्ट काढून यंत्राचे चाक हाताने फिरवून खात्री करावी.

४) कमी वैरण घालून म्हणजेच साधारण एक पेंडीपेक्षा कमी वैरणघालून यंत्र चालविल्यास वैरण व्हीलच्या मध्यभागी व दोन्ही बाजूला गुंडाळून यंत्रावर लोड जास्त येतो.

घ्यावयाची दक्षता :-

१) मद्यपान किंवा धुम्रपान करून यंत्रावर काम करू नये व लहान मुलांना यंत्रापासून दूर ठेवावे.

२) यंत्र चालू केल्यानंतर मध्येच वीज गेल्यास स्विच बंद करून मशीनचेचाक उलट्या गतीने फिरवून घ्यावे.

३) यंत्राला जनावराचा धक्का लागू नये अशा ठिकाणी यंत्र ठेवावे. यंत्र दररोज स्वच्छ करावे.

४) यंत्राला फौंडेशन फिटिंग करावे लागते.

५) यंत्राच्या फिरत्या भागावर संरक्षक जाळी असावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही. तसेच बेल्ट घट्ट अथवा सैल करण्याची सोय असावी.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com  असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.